कॉम्रेड गोविंद पानसरे यांचे हल्लेखोर अद्याप मोकळेच

0
98

पानसरेंच्या प्रकृतीत सुधारणा
महाराष्ट्रातील नामांकित पुरोगामी नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हल्लेखोरांचा शोध लावण्यात पोलिसांना अद्याप अपयश आले आहे. मात्र, पोलिसांनी चौकशीसाठी ५० जणांना ताब्यात घेतले आहे. पिस्तुल तस्कर मनीष नागोरी आणि विकास खंडेलवाल यांचाही त्यात समावेश आहे. मुंबई आणि पुणे येथील दहशतवादविरोधी पथके कोल्हापूरमध्ये दाखल झाली आहेत.सोमवारी सकाळी कॉम्रेड पानसरे व त्यांच्या पत्नी उमा पानसरे यांच्यावर मोटारसायकलने आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला होता. हल्लेखोरांच्या शोधार्थ वीस पोलीस पथके स्थापन करण्यात आली आहेत. प्राथमिक चौकशीसाठी सोमवारी रात्रीपर्यंत पाचजणांना ताब्यात घेण्यात आले होते. काल आणखी काहीजणांना ताब्यात घेण्यात आले. ज्या भागात पानसरे यांच्यावर हल्ला झाला, तो निवासी भाग असल्याने तेथे सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते. त्यामुळे हल्लेखोरांचा कोणताही धागादोरा पोलिसांना मिळू शकलेला नाही.
पानसरे यांच्यावर गोळ्या झाडण्यासाठी गावठी कट्टा पिस्तुलाचा वापर झाल्याचे दिसून आले आहे. ज्या प्रकारे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नेते डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची हत्या झाली होती, त्याच प्रकारे कॉम्रेड पानसरे यांच्यावर हल्ला झाल्याने या हल्ल्यामागे कोणती प्रवृत्ती असावी याचा अंदाज पोलिसांना आला आहे, मात्र, त्यासंदर्भात ठोस पुरावे हाती आलेले नाहीत. पानसरे यांच्यावर ज्या एस्टर आधार रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तेथे खास पोलीस सुरक्षा देण्यात आली आहे. पानसरे यांचे शेकडो कार्यकर्ते रुग्णालयाबाहेर ठाण मांडून आहेत. काल कोल्हापुरात पानसरे यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ मोठा मोर्चा निघाला. त्यात एन. डी. पाटील, राजन गवस यांच्यासह अनेक पुरोगामी नेते व कार्यकर्ते सहभागी झाले होते. दरम्यान, पानसरे यांच्या प्रकृतीत सुधारणा दिसून आली असून धोका टळल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. काल पानसरे यांनी आपल्या नातेवाईकांनाही ओळखले, मात्र ते अद्याप व्हेंटिलेटरवर आहेत.