धार्मिक हिंसा खपवून घेणार नाही

0
96

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इशारा
धार्मिक हिंसा आणि असहिष्णुता याबाबत पंतप्रधान मौन धारण करतात अशी टीका विरोधकांकडून होत असताना काल मोदींनी याविषयी रोखठोक भूमिका मांडताना देशभरात कोणत्याही प्रकारची धार्मिक हिंसा खपवून घेणार नाही असे प्रतिपादन केले.कॅथॉलिक चर्चतर्फे येथील धर्मोपदेशक कुरियाकोसे ऊर्फ चावरा आणि मदर युफ्रशिया यांना संतपद देण्याच्या निर्णयानंतर आयोजित समारंभामध्ये मोदी यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली.
कोणत्याही धर्माच्या कोणत्याही समूहाने जर धर्माच्या आधारे हिंसा पसरवण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. सरकार कोणत्याही धार्मिक गटाच्या छुप्या किंवा उघड हिंसेला खतपाणी घालणार नाही असा इशारा त्यांनी कट्टर धार्मिक संघटनांना यावेळी बोलताना दिला. मोदी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्यापासून घर वापसीचा मुद्दा, ख्रिश्‍चन शाळा, चर्चवरील हल्ले तसेच इतर संवेदनशील मुद्यांसंदर्भात पंतप्रधानांनी बाळगलेल्या मौनावर भारत तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रखर टीका करण्यात येत होती. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनीही भारत दौर्‍यानंतर या संदर्भात उल्लेख केला होता. या पार्श्‍वभूमीवर मोदी यांची भूमिका महत्त्वपूर्ण मानली जात आहे.