सावध व्हा

0
170

गोव्यातील कोरोना पूर्ण नियंत्रणाखाली आला असल्याचे चित्र जरी सरकारी आकडेवारीवरून भासत असले, तरी शेजारच्याच महाराष्ट्रामध्ये सध्या देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत आणि कोरोना विषाणूची किमान दोन नवी रूपे तेथे आढळून आलेली आहेत. त्यामुळे गोव्यासाठी ही अतिशय चिंतेची बाब आहे. ज्या मुंबईशी गोव्याचा सर्वाधिक संबंध येतो, तेथे दिवसागणिक रुग्णसंख्या वाढत चालली असल्याने बृहन्मुंबई महानगरपालिकेने अगदी कडक निर्बंध लागू केले आहेत. एखाद्या इमारतीमध्ये पाचपेक्षा अधिक कोरोनाबाधित आढळले तर संपूर्ण इमारत सील करण्याचे आदेश तर देण्यात आलेले आहेतच, परंतु वाढदिवस, विवाह वा अन्य कोणत्याही घरगुती समारंभामध्ये जर पाहुण्यांकडून कोविडविषयक निर्बंधांचे उल्लंघन होत असल्याची तक्रार आली, तर अशा ठिकाणी छापे मारण्याची कारवाईही केली जाणार आहे. रत्नागिरीसह अनेक जिल्ह्यांमध्ये रात्रीच्या संचारबंदीचे आदेश जारी झाले आहेत, काही शहरांत लॉकडाऊनची तयारी चालली आहे. हे सगळे पाहिले तर गोव्याने यासंदर्भात ‘सुशेगाद’ राहून चालणार नाही.
इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रानेही कोरोनावर चांगल्या प्रकारे नियंत्रण मधल्या टप्प्यात मिळवले होते. अगदी धारावीसारख्या आशियातील सर्वांत मोठ्या झोपडपट्टीत पसरलेल्या कोरोना संसर्गावर मात करणे ही काही सोपी गोष्ट नव्हती, परंतु आता पुन्हा एकवार त्या राज्यामध्ये कोरोना नियंत्रणाबाहेर जाऊ लागल्याचे दिसत आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, जलसंसाधनमंत्री जयंत पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे, त्यांच्या सूनबाई खासदार रक्षा खडसे अशी बरीच नेतेमंडळीही कोरोनाबाधित झालेली दिसत आहेत. देशात सर्वाधिक कोरोनाबाधित असलेले राज्य म्हणून केंद्र सरकारच्या आरोग्य खात्याने महाराष्ट्राचे नाव घेतले. त्या खालोखाल केरळचा क्रमांक लागला. त्यामुळे या सार्‍या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पुन्हा एकदा कंबर कसलेली दिसते. ज्या राज्यांत कोरोना नियंत्रणाबाहेर गेल्याचे केंद्र सरकार सांगते आहे, ती सगळी भाजपचे सरकार नसलेली राज्येच आहेत हेही लक्षात घेण्याजोगे आहे. त्यामुळे या सरकारी आकडेवारीवर किती विश्वास ठेवायचा हा भाग वेगळा, परंतु महाराष्ट्रातील – विशेषतः मुंबईतील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता ‘पुढच्यास ठेच, मागचा शहाणा’ या न्यायाने गोव्याने पुन्हा पूर्ण खबरदारीच्या उपाययोजना करणे आवश्यक आहे.
गोव्यामध्ये सध्या पर्यटन हंगाम असल्याने पर्यटकांची रीघ लागली आहे. विनामास्क, विना सामाजिक अंतर ते सर्वत्र हिंडता – फिरताना दिसत आहेत. अशा बेबंद पर्यटकांना आवरणार कोण? सध्या राज्यातील प्रमुख शहरांत विनामास्क जाणार्‍या वाहनचालकांना रोखून वाहतूक पोलीस तालांव जरूर देत आहेत, परंतु येथे खुद्द राज्याच्या मंत्र्यांकडूनही मास्क आणि सामाजिक अंतर पालनाचे सर्रास उल्लंघन होताना स्पष्ट दिसते. त्यामुळे आधी स्वतः पालन करा आणि मग जनतेला सांगा असे या नेतेमंडळींना सांगण्याची वेळ आज आलेली आहे. महाराष्ट्रात अमरावती, यवतमाळ आणि अकोल्यामध्ये कोरोना विषाणूची नवीच रूपे आढळून आलेली आहेत. ती नेमक्या कोणत्या प्रकारीच आहेत, किंवा ह्याहून ती वेगळी आहेत का याची चाचणी सध्या घेतली जात आहे. ते निष्कर्ष यायला दहा पंधरा दिवस लागतील, परंतु हे लोण गोव्यात पसरू नये यासाठी आरोग्य खात्याने पुन्हा एकदा कंबर कसण्याची आवश्यकता आहे. देशात जवळजवळ एक कोटी आरोग्य कर्मचार्‍यांना कोरोना लस दिली गेली आहे. गोव्याने तर शंभर टक्के आरोग्य कर्मचार्‍यांचे कोरोना लसीकरण करून आघाडी घेतली. हीच आघाडी कोरोनाच्या नियंत्रणातही पुन्हा एकदा दिसली पाहिजे, कारण गोव्यात उतरणारे बहुतांश पर्यटक आणि प्रवासी हे मुंबईमार्गे अवतरलेले असतात. त्यामुळे गोव्यासाठी ही पूर्वसूचना आहे आणि ती सरकारने वेळीच ओळखणे हितावह ठरेल.