साळगावकरचे गोवा वेल्हावर १५ गोल

0
98

>>बांदोडकर सुवर्ण चषक फुटबॉल; पुणे-चर्चिल ब्रदर्स लढत गोलबरोबरीत

 

गोवा वेल्हा स्पोर्टस क्लबचा १५-० असा धुव्वा उडवीत साळगावकर फुटबॉल क्लबने जीएफए आयोजित बांदोडकर सुवर्ण चषक फुटबॉल (अंडर-२१) स्पधेंत शानदार विजयी सलामी दिली.
धुळेर मैदानावर झालेल्या या सामन्यात साळगावकरने निर्विवाद वर्चस्व गाजविताना मध्यंतराला १०-० अशी आघाडी घेतली होती. जॅसन बार्बोझाने पाचव्याच मिनिटाला साळगावकरचे खाते खोलले आणि नंतर नारू हरी श्रेष्ठ, मायरन बॉर्जिस आणि लिस्टन कुलासो यांनी पूर्वार्धातच आपल्या हॅट्‌ट्रिक्स पूर्ण केल्या.
सुसुत्रबध्द आणि सुनियंत्रित खेळीत प्रारंभापासून नियंत्रण राखलेल्या साळगावकरने पाचव्या मिनिटाला आघाडी घेतली. हरमनज्योत सिंह आणि नारू हरी श्रेष्ठच्या चढाईनंतर जॅसन बार्बोझानेि ‘फिनिशिंग टच’ दिला. दोन मिनिटानंतर हरमनज्योतच्या पासवर नारूने दुसरा गोल नोंदला. मायरन आणि लिस्टनने अनुक्रमे ११ व १७व्या मिनिटाला गोल नोंदवित आघाडी ४-० अशी बनविली. नारू हरी श्रेष्ठ (१८, ४३वे मिनिट), लिस्टन (२०, ३८वे मिनिट) आणि मायरन (२५, ४५वे मिनिट) यानी नंतर प्रत्येकी २ गोल नोंदवित मध्यंतराला आघाडी १०-० अशी बनविली.
साळगावकरने उत्तरार्धातही आपले वर्चस्व जारी राखीत आणखी पाच गोल नोंदले. नारू हरी श्रेष्ठ, मायरन बॉर्जिस, हरमनज्योत सिंह, राखीव डेनिल रिबेलो आणि रोनाल्ड ओलिव्हेरा यानी एकेक गोल नोंदवित साळगावकरला १५-० असा एकतर्फी विजय मिळवून दिला. सामनावीर लिस्टन कुलासोला (साळगावकर) प्रमुख पाहुणे, म्हापसाचे नगराध्यक्ष, संदीप फळारी यांच्याहस्ते पुरस्कार देण्यात आला. जीएफएचे अध्यक्ष एलि०वस गोम्स, कार्यकारिणी सदस्य गजानन केरकर, राजू बाणावलीकर आणि ऍड. डॉमिनिक परेरा आदि यावेळी उपस्थित होते.

पुणे-चर्चिल लढत गोलबरोबरीत
नावेली : दरम्यान, स्थानिक चर्चिल ब्रदर्सला १-१ असे गोलबरोबरीत रोखून पुणे एफसीने गुण विभागून घेतले.
येथील रोझरी मैदानावर झालेल्या या सामन्यात दोन्ही गोल पूर्वार्धात नोंदण्यात आले. चौथ्याच मिनिटाला मॅथ्यू कुलासोच्या क्रॉसवर स्ट्राकर ऍल्ड्रिच कुयेल्याने तेज फटक्यावर पुणेचा गोलरक्षक अनस कुमारला चकवीत चर्चिल ब्रदर्सचा आघाडीचा गोल
केला.
पाहुण्या पुणे एफसीने जोरकस खेळीत आक्रमणे केली आणि तेराव्या मिनिटाला गोलबॉक्सजवळील फ्रीकिवर भूवनंथनकुन सामतेने बरोबरीचा गोल केला. चर्चिल ब्रदर्सने नंतर जोरदार प्रतिहल्ले केले पण मॅथ्यू कुलासोचा फटका बाहेर गेला. उत्तरार्धात पुणे एफसीने जोरकस खेळीत चर्चिल ब्रदर्सवर दडपण आणले पण लालवमपुईयाची हेडर थोडक्याने हुकली.