मुंबईचा आज गुजरातविरुध्द ‘जिंकू किंवा मरू’ मुकाबला

0
93

‘प्ले-ऑफस’च्या अपेक्षा जिंकण्यासाठी निर्णायक विजयाची आवश्यकता असलेल्या मुंबई इंडियन्सला आज गुजरात लायन्सविरुध्दच्या मुकाबल्यात ‘जिंकू किंवा मरू’ निर्धाराने झुंजावे लागेल.

तेरा सामन्याअखेंर मुंबई १४ गुणासह पाचव्या (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाइटरायडर्सचेही प्रत्येकी १३ गुण आहेत पण धावसरासरीवर ते अनुक्रमे तिसर्‍याव चौथ्या क्रमावर आहेत) क्रमावर आहे. अखेरच्या लीग सामन्यातील पराभव मुंबईला इंडियन्ससाठी ‘प्ले ऑफस’ चे दरवाजे बंद करू शकतो. महिनाभरापूर्वी (१६ एप्रिल) स्वमैदानावर झालेल्या सामन्यात मुंबईला गुजरातकडून ३ गडयानी हार पत्करावी लागली होती आणि त्या पराभवाचे उट्टे काढण्याची नामी संधीही रोहित आणि कंपनीला आहे.
गुजरात १६ गुणांसह दुसर्‍या क्रमावर आहे आणखी एक विजय म्हणजे त्याचे अंतिम चार संघातील स्थानच पक्के होईल. तथापि, त्यांची हार दुसर्‍या संघासाठी बाद फेरीचे स्थान उघडे करू शकते आणि त्यामुळें अंतिमपूर्व सामन्यात योग्य लय साधलेला सुरेश रैनाच्या नेतृत्वाखालील लायन्स संघ़ कुठल्याही प्रकारची आत्मसंतुष्टता बाळगणार नाही.
दोन वेळचा विजेता मुंबईकर संघ या मोसमात विजयी लय सलग राखण्यात असफल ठरलेला आहे. त्याचे बहुतेक विजय हे बहुश: पराभवानंतरच झळकलेले आहेत. गेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली डेयरडेविल्सवर ८० धावांनी विजय मिळविलेला असून या आत्मविश्‍वासासह रोहित आणि साथीनी बाद फेरीतील स्थान निश्‍चित करण्यासाठी झुंजायला हवे. मुंबईची मदार प्रामुख्याने कर्णधार रोहित शर्मा (५४९ धावा) आणि अंबाती रायुडूवर (३३४) आहे. गेल्या सामन्यात ३७ चेंडूत ८६ धावा चोपलेला युवा अष्टपैलू कृणाल पांडयानेही (२३३ धावा आणि ६ बळी) आपण ‘मॅचविनिंग’ कामगिरीचा वकुब राखून असल्याचे स्पष्ट केले आहे. जोस बटलर (त२२) आणि किरॉन पोलार्डही (१९८) या महत्वपूर्ण मुकाबल्यात अपेक्षित योगदान देण्यास सज्ज असतील. गोलंदाजीत मिशेल मॅक्लिंघन (१७) आणि जसप्रित बुमराह (१४) यानी ठसा उमटविलेला आहे.