सामाजिक प्रश्‍नांविषयी जागृतीसाठी नाटक प्रभावी माध्यम

0
56

अभिव्यक्ती संकल्पित, कला संस्कृती संचालनालयाच्या सहयोगाने मा. दीनानाथ कला मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या फोमेंतो फाऊंडेशन प्रस्तुत ‘अभिजात’ या शास्त्रीय नाट्य महोत्सवाचे उद्घाटन केल्यानंतर राज्यपाल वांछू प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर सन्माननीय पाहुणे कला अकादमीचे अध्यक्ष आमदार विष्णू सूर्या वाघ, कला आणि संस्कृती संचालनालयाचे संचालक प्रसाद लोलयेकर, फोमेंतोचे कार्यकारी अधिकारी श्रीधर कामत व अभिव्यक्तीच्या अध्यक्ष प्रतिभाताई देशपांडे हे मान्यवर उपस्थित होते.

आपल्या जुन्या अभिजात रंगभूमीचे वैभव रसिकांसमोर आणण्याचा प्रयत्न या नाट्यमहोत्सवाद्वारे अभिव्यक्तीने केल्याबद्दल राज्यपाल वांच्छु यांनी संस्थेला दुवा दिला. इथला समृद्ध सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे कार्य शासन व इतर संस्था करीत आहेत यांचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला.

विष्णू वाघ म्हणाले, आधुनिक नाटकांवर पाश्‍चात्य नाटकांचा प्रभाव आहे. या पार्श्‍वभूमीवर आपले प्राचीन नाट्य शास्त्रानुसार नाटक कसे होते व कसे सादर व्हायचे याचा प्रत्यय ‘अभिजात’ नाट्य महोत्सवातून येईल कालौघात भरतमुनींचे नाट्यशास्त्र जीवंत आहे याची जाणीव देवून श्री. वाघ यांनी सांगितले की, अनेक प्रकारचे नाट्यमहोत्सव होतात परंतु हा त्याहून आगळा आणि संकल्पनेच्या दृष्टीने स्तुत्य आहे.

प्रतिभाताई देशपांडे यांनी स्वागतपर भाषणात सांगितले, की आमची रंगभूमीची जी उज्ज्वल परंपरा आहे त्याचे दर्शन घडविण्याचा प्रयत्न या महोत्सवातून केला आहे. ६० गोव्यातील व ३५ गोव्याबाहेरील कलाकारांना एकत्रित आणून शास्त्रीय नाटकांचा आनंद देण्याचा हा प्रयत्न रसिकांना अभिजाततेची अनुभूती देईल.

याप्रसंगी या महोत्सवात सादर होणार्‍या लक्ष्मण पित्रे यांच्या ‘त्रिपूर दहन’ व अनघा देशपांडे यांच्या ‘चित्रलेखा’ या नाटकांच्या संहितांचे प्रकाशन विष्णू वाघ यांच्या हस्ते करण्यात आले व त्यांचा सन्मान राज्यपालांहस्ते करण्यात आला. प्रसाद लोलयेकर यांच्या हस्ते नाट्य महोत्सवानिमित्त काढलेल्या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

सिद्धी उपाध्ये यांनी संस्कृत, हिंदीतून उद्घाटन सत्राचे सुविहित सूत्रसंचालन केले. सौ. जीना कामत व सौ. गीता मंगेशकर यांनी मान्यवरांना छोटे तुळशीवृंदावन देवून त्यांचे स्वागत केले. उद्घाटन सोहळ्याचे आयोजनही अभिजात पद्धतीने करण्यात आले होते.

उद्घाटनानंतर ‘त्रिपूरदहन’ मराठी नाटकाचा प्रयोग प्रभाकर सांस्कृतिक संस्थेने सादर करून रसिकांची दाद घेतली. त्यातील अभिजात आविष्कार प्रभावी होता.

साईश देशपांडे यांनी दिग्दर्शन, नेपथ्य, संगीत या बाजू समर्थपणे सांभाळल्या होत्या. सिद्धार्थ हळर्णकर यांची प्रकाश योजना व अनघा देशपांडे यांची वेशभूषा दोन्ही बाजू अत्यंत पुरक होत्या. सूत्रधार आणि कमलाक्ष – ओंकार चांदेलकर, नटी आणि रंभा – प्रियांका वेरेकर, शंकर – ज्ञानेश्वर गोवेकर, पार्वती – दीपलक्ष्मी मोघे, नारद – कमलाक्ष खेडेकर, ब्रह्मदेव – संजय मापारे, इंद्र – सलील नाईक, मयासूर – प्रेमानंद नाईक, कोषाध्यक्ष – राजा खेडेकर, ताराक्ष – कौस्तुभ देसाई, विघुन्माली – अंकुश पेडणेकर, प्रतिहारी – विनू देसाई, नर्तक आणि मातली – श्रीकांत गावडे, नर्तिका – गौरी काणकोणकर, अक्षया शेट्ये व प्रेरणा पालेकर या सर्वांनी आपापल्या भूमिका सुरेख वठविल्या व दिग्दर्शकानी पात्राची निवड व त्या छान बसवून घेतल्या होत्या.