साबांखावरील ‘तो’ आरोप मंत्री काब्राल यांनी फेटाळला

0
17

कला अकादमी नूतनीकरण प्रकरण
>> मंत्री गोविंद गावडे यांचा आरोप खोडून काढला
>> कला-संस्कृती खात्यानेच सुचवले बिल्डरचे नाव

राज्यात कला अकादमीच्या नूतनीकरणाचा विषय सध्या चांगलाच गाजत आहे. कला व संस्कृतीमंत्री गावडे यांनी काही दिवसांपूर्वी निविदा न काढता कला अकादमी नूतनीकरण प्रकरणी आपली जबाबदारी झटकून सार्वजनिक बांधकाम खात्याकडे बोट दाखविले होते; मात्र काल सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांनी गावडे यांच्यावर पलटवार केला. कला व संस्कृती खात्याने नामांकन तत्त्वावर ‘टॅकटॉन बिल्डर’ला काम देण्याची सूचना केल्याची प्राथमिक माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकार्‍यांनी आपणाला दिली आहे, असे सांगत काब्राल यांनी आपली बाजू स्पष्ट केली.

राज्य सरकारच्या दक्षता खात्याने कला अकादमीच्या इमारतीच्या नूतनीकरण प्रकरणी खास समितीमार्फत चौकशीची शिफारस केली आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी सत्ताधारी भाजपचे प्रवक्ते सावियो रॉड्रीगीस यांनी कला अकादमीच्या ५० कोटी रुपये खर्चून करण्यात येत असलेल्या इमारतीच्या नूतनीकरणासाठी निविदा जारी न केल्याने गोविंद गावडे यांच्यावर टीका केली होती. तसेच त्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना एक पत्र पाठवून या प्रकरणी कारवाईची मागणी केली.

भाजप प्रवक्त्याच्या ‘त्या’ टीकेला उत्तर देताना गावडे यांनी निविदा न काढता दुरुस्ती प्रकरणी साबांखाकडे बोट दाखविले होते. निविदा न काढताच दुरुस्ती करण्याचा निर्णय आपण नव्हे, तर साबांखाने घेतला होता, असे गावडे त्यावेळी म्हणाले होते.

काय म्हणाले नीलेश काब्राल?

मंत्री गोविंद गावडे यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे बोट दाखविल्याने कला अकादमी इमारतीच्या नूतनीकरण प्रकरणी बांधकाम खात्याच्या अधिकार्‍यांना अहवाल व फाईल सादर करण्याची सूचना करण्यात आली आहे. कला अकादमीच्या नूतनीकरणाचे काम आपल्या कार्यकाळात दिलेले नाही. आपणाला त्या कामाबाबत आता केवळ प्राथमिक माहिती मिळाली आहे.
साबांखाचे वरिष्ठ अधिकारी प्रशिक्षणासाठी राज्याबाहेर आहेत. ते अधिकारी परतल्यानंतर या प्रकरणी सर्व माहिती घेणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांशी या विषयावर चर्चा केली जाणार आहे.