सानिया ‘टॉप १०’ बाहेर

0
116

भारताच्या युकी भांब्री याने काल सोमवारी जाहीर झालेल्या नवीन एटीपी क्रमवारीत पुरुष एकेरीत १३९वे स्थान मिळविले आहे. मागील आठवड्यात तो १४२व्या स्थानी होता. तसेच रामकुमार रामनाथन याने चार स्थानांची उडी घेत १४६व्या स्थानी हक्क सांगितला आहे. महिलांमध्ये सानिया मिर्झा ‘टॉप १०’ बाहेर फेकली गेली आहे. तिची १२व्या स्थानी घसरण झाली आहे.

पुरुष दुहेरीत रोहन बोपण्णा याने तीन क्रमांकांची सुधारणा करत १४वे स्थान मिळविले आहे. मागील आठवड्यात रोहनच्या खात्यात ३७४० गुण होते. ४१० गुणांची कमाई करत त्याने आपली गुणसंख्या ४१५० केली आहे. व्हिएन्ना येथे काल संपलेल्या ईस्ट बँक ओपन स्पर्धेत त्याने पाब्लो कुएवास याच्यासह विजेतेपदाला गवसणी घातली होती. अन्य भारतीय खेळाडूंमध्ये दिविज शरण ५१व्या स्थानी कायम असून दोन क्रमांकांच्या नुकसानीसह पूरव राजा ६२व्या क्रमांकावर पोहोचला आहे.
डब्ल्यूटीए क्रमवारीमध्ये महिला एकेरीत भारताची सर्वोत्तम स्थानावरील खेळाडू अंकिता रैना २८१व्या क्रमांकावर घसरली आहे. तिला पाच स्थाने गमवावी लागली आहेत. करमन थंडी हिने पाच स्थाने वर सरकताना ३०७वा क्रमांक प्राप्त केला आहे. महिला दुहेरीत प्रार्थना ठोंबरे (-१८, १५०वे स्थान) ‘अव्वल १५०’ बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे.

पुरुष एकेरीतील ‘टॉप १०’ खेळाडूंचा विचार केल्यास जर्मनीच्या आलेक्झांडर झ्वेरेव याने क्रोएशियाच्या मरिन चिलिच याला पाचव्या स्थानी ढकलताना चौथे स्थान मिळविले आहे. १०४६५ गुणांसह स्पेनचा राफेल नदाल पहिल्या स्थानी कायम आहे.
डब्ल्यूटीए फायनल्स जिंकून कॅरोलिन वॉझनियाकी हिने तीन क्रमांकाची उडी घेत थेट तिसरे स्थान मिळविले आहे. काही आठवड्यांपूर्वी पहिल्या स्थानी असलेल्या झेक प्रजासत्ताकच्या कॅरोलिना प्लिस्कोवा हिची घसरण सुरूच असून ती चौथ्या स्थानी पोहोचली आहे. दोन स्थानांचा फटका बसल्याने युक्रेनची इलिना स्वितोलिना सहाव्या क्रमांकावर आहे.