साडेतीन महिन्यांनंतर प्रथमच राज्यात कोरोनाने मृत्यू नाही

0
241

राज्यात सुमारे साडेतीन महिन्यांनंतर काल गुरुवारी कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली नाही. नोव्हेंबर महिन्यात आत्तापर्यंत ५२ कोरोना रुग्णांचा बळी गेला आहे. राज्यात आत्तापर्यंत ६५६ कोरोना बळींची नोंद झाली आहे. दरम्यान, चोवीस तासात नवे १०७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४५ हजार ६०५ एवढी झाली असून सध्याची रुग्णसंख्या १७२८ एवढी आहे. राज्यात २२ जूनला पहिल्या कोरोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली. त्यानंतर कोरोना रुग्णांचे अधूनमधून मृत्यू होत होते. २९ जुलै २०२० या दिवसापासून दरदिवशी कोरोना रुग्णांच्या निधनाची नोंद होत होती. राज्यात नोव्हेंबर महिन्यात आत्तापर्यंत ५२ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गत सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक २३६ कोरोना मृत्यूची नोंद झालेली आहे. ऑक्टोबरमध्ये १७६ तर ऑगस्टमध्ये १४७ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून नवीन कोरोना रुग्ण आणि कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण कमी होत आहे. राज्यात दिवाळी उत्सवापूर्वी कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे.

दरम्यान काल आणखी १९२ रुग्ण बरे झाले आहे. राज्यातील बरे झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या ४३ हजार २२१ एवढी झाली आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.७७ टक्के एवढे आहे.

बांबोळी येथील कोविड प्रयोगशाळेत नवीन १३११ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यातील १०७ नमुने पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. कोरोनाचे सौम्य लक्षण असलेल्या नवीन ५५ जणांनी होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारला आहे. कोरोना पॉझिटिव्ह नवीन ३२ रुग्णांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहेत.

पणजीत नवे ४ रुग्ण
पणजी महानगरपालिका परिसरात नवे ४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून पणजीतील सध्याची रुग्णसंख्या ९९ झाली आहे. मिरामार, करंजाळे आणि दोनापावल येथे नवीन रुग्ण आढळून आले आहेत.

दक्षिण गोव्यातील फोंडा येथील सध्याची रुग्णसंख्या १५५ आहे. मडगाव परिसरात १४२ आणि वास्को येथे १०७ रुग्ण आहेत. राज्यातील इतर भागातील रुग्णांची संख्या शंभरांपेक्षा कमी आहे.