विद्यार्थी बाधित सापडल्यास सरकार जबाबदार ः राष्ट्रवादी

0
230

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीने राज्य सरकारने दहावी आणि बारावीचे वर्ग घेण्यासाठी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या कडक अंमलबजावणीबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित केला आहे. राज्यात विद्यालयाचे वर्ग घेताना विद्यार्थी कोरोना बाधित झाल्यास त्याला सरकारला जबाबदार धरले जाणार आहे, असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जुझे डिसोझा यांनी पत्रकार परिषदेत काल दिला.

राज्यात कोरोना महामारी सुरू असताना विद्यालयाचे वर्ग घेणे धोक्याचे आहे. विद्यालय व्यवस्थापनाकडून मुलांच्या सुरक्षेची जबाबदारी घेतली जात नाही. विद्यालय व्यवस्थापनाने मुलांची पूर्ण जबाबदारी स्वीकारली पाहिजे. राज्यात दहावी आणि बारावीसाठी सुमारे ३६ हजार विद्यार्थी आहेत. या मुलांना वर्ग घेण्यासाठी शाळेत बोलाविणे योग्य नाही. मुलांच्या सुरक्षेची पूर्ण जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे. अन्यथा, वर्ग सुरू करण्याचे पाऊल उचलू नये. ऑनलाइन पद्धतीने वर्ग घ्यावा, अशी मागणी डिसोझा यांनी केली. कोरोनाच्या काळात वर्ग सुरू केल्यास मुलांना धोका संभवतो, असा दावा आमदार चर्चिल आलेमाव यांनी केला.