सागर

0
31
  • – प्रा. संदेश राघोबा नाईक-गावकर

आजपर्यंत सागराचा अभ्यास व संशोधन शास्त्रज्ञ करत आले आहेत. सागराकडून मानव आजपर्यंत सगळ्या प्रकारचे फायदे घेतच आलेला आहे. सागर सहस्र हातांनी देत आहे; घेणार्‍याचे हातच थकून जातात. एवढा महादानी सागर आहे…

सागर किती भव्य व अथांग आहे हे सागराजवळ गेल्यावरच कळते. जमिनीच्या आतल्या भागाला सागराचे दर्शन होत नाही. किनारपट्टीला सागर असतो. आयुष्यभर सागर न पाहिलेली माणसेही आहेत. उत्तरेकडील ‘हिमालय’ न पाहता जशी माणसे संपून गेली, तशीच सागर न पाहताच कित्येक माणसे संपली. पहिल्यांदाच सागर-किनार्‍यावर आलेली माणसे सागराचा अवतार पाहून कशी घाबरतात व दचकतात हे पाहताना मौज वाटते.
सागराचे अस्तित्वच तसे अद्वितीय आहे. सागर किती खोल आणि किती लांब व किती रुंद आहे याचा अंदाज सामान्य माणसाला कसा बरे येईल? सागर आणि महासागर असे विभाजनदेखील त्रोटकच आहे. अरबी समुद्र भारतीयांना परिचित आहे. बंगालचा उपसागर, हिंद महासागर यांचा संपर्क भारतभूमीला लाभलेलाच आहे.

सागराच्या पोटात जाऊन पुढे-पुढे गेल्यास आपल्याला प्रचंड महासागराचे दर्शन घडते. पॅसिफिक महासागर, अटलांटिक महासागर, अंटार्टिका महासागर, आर्कटिक महासागर यांची भव्यता व खोली आपल्या कल्पनेपलीकडील असते.

भूतलावर जमिनीपेक्षा पाण्यानेच मोठा भाग व्यापलेला आहे. समुद्राचे पाणी खारे आहे. ते जर गोड असते तर कमालच झाली असती. समुद्राचे पाणी खारे असण्यासाठीदेखील शास्त्रीय कारण आहे. त्या पाण्यामध्ये जे क्षार व मिनेरल्स आहेत, त्यामुळेच ते खारे बनले आहे. सगळ्या जगाला मीठ याच पाण्यामुळे मिळत असते.
जगाला मोती देणारे शिंपले याच पाण्यामध्ये वावरत असतात. स्वाती नक्षत्रामध्ये जेव्हा पाऊस पडतो, तेव्हा वरून पडणार्‍या पाण्याचे थेंब हे शिंपले आपल्या पोटात घेतात व त्यापासून मोती बनतात. इतर नक्षत्रांमध्ये पडलेल्या पावसाचे तसे नसते. त्यासाठी किनार्‍यावर तेवढा उथळपणा हवा. आपल्या भारत देशात फक्त तामिळनाडू राज्याला तशी किनारपट्टी आहे. तेथे मोती मिळतात. त्याच्या शेजारी असलेल्या सिलोनला किंवा श्रीलंकेला हे मोत्यांचे वरदान देवाने दिले आहे. कारण श्रीलंका हे लहानसे बेट असल्यामुळे तिथली सभोवतालची किनारपट्टी व सागराचा किनार्‍याकडील उथळपणा मोत्यांच्या पिकाला साजेसा आहे.
प्राचीनकाळापासून खैबर खिंडीतून उंटावरून अरब लोक श्रीलंकेला सोन्याचे पेटारे घेऊन यायचे व जाताना मोत्यांच्या थैल्या घेऊन जायचे. मोत्यांना दागिन्यांसाठी सगळ्या जगात विशेष मागणी असते. त्याचमुळे श्रीलंका सोन्याची नगरी बनली आहे. परमेश्‍वराने नैसर्गिक देणगीनेच तिला श्रीमंत व अतिश्रीमंत बनवले आहे.
सागराला ‘रत्नाकर’ म्हणतात. कारण सागर रत्नांचेच माहेर आहे. सागराएवढा ऐश्‍वर्यसंपन्न दुसरा कोणीच नाही. किती जलचर प्राण्यांचे सागर हे वसतिस्थान आहे. सागरात वाढणार्‍या वनस्पतीदेखील आहेत.

हजार जातींचे व प्रजातींचे मासे तसेच अतिभव्य देवमासे यांना सागरानेच सांभाळले आहे. पृथ्वीवरील माणसांचेदेखील प्रमुख अन्न सागरी माशांमुळेच बनलेले आहे.

किती होड्या, किती जहाजे, किती तराफे, किती गलबते आपल्या अंगावर सागर रात्रंदिन खेळवत असतो. सागरात गेल्याशिवाय माणसाला चैनच पडत नाही. वर्षातील कित्येक महिने सागरातच राहणारी माणसे आहेत. सागरातील जहाजांवर काम करतच कित्येकांचे पोट चालत असते. कित्येक मेकेनिकल इंजिनिअर जहाजावरील नोकरीसाठी तळमळत असलेले आपण पाहतो.
आजपर्यंत सागराचा अभ्यास व संशोधन शास्त्रज्ञ करत आले आहेत. सागराच्या तळाशी तेलाचे साठे सापडले आहेत. सागराकडून मानव आजपर्यंत सगळ्या प्रकारचे फायदे घेतच आलेला आहे. सागर सहस्र हातांनी देत आहे. घेणार्‍याचे हातच थकून जातात. एवढा महादानी सागर आहे.

नारळी पौर्णिमेला सागराची पूजा करण्याची आपली परंपरा आहे. सागराला आपण नारळ, फुले, नाणी वाहतो. खरे म्हणजे सागराला याची गरज नाही. सागर हा फक्त देणारा आहे, घेणारा नाही. आपण माणसे जे देतो ते श्रद्धेने व भक्तिभावाने देतो. सागरासाठी कृतज्ञतेची भावना आपण व्यक्त करत असतो. सागराला आपली प्रार्थना असते की, ‘पावसाळा संपत आला आहे आणि आपल्या अंगावर आम्हाला मत्स्यधनासाठी खेळायचे आहे. हे दयाघना, हे करुणानिधी, आमचा सांभाळ कर; कारण तूच आमचा पोशिंदा, तारणहार आणि रक्षणकर्ता आहेस.’

अमेरिगो व्हिस्पीसी हा मानव अमेरिका खंडात पोहोचला. कोलंबसने अमेरिकेला शोधून काढले. या सगळ्या चमत्कारचा सागरच कर्ता आहे. कारण सागरातूनच त्यांना पुढे जावे लागले आहे.

तुर्कांनी कॉन्स्टेन्टिनोपल बंद केल्यावर सागरी मार्ग शोधणे हे सगळ्यांसाठीच अपरिहार्य होते. युरोपच्या थंड प्रदेशात मसाल्याची गरज होती. पौर्वात्य देशांकडे आल्याशिवाय त्यांना ते मिळणे अशक्य होते. सागरानेच त्यांना वाट दाखवली. वास्को-द-गामा गोव्यात पोहोचला. आफोंस-द-आल्बुकेर्क गोव्यात आला. सगळ्या युरोपीयनांनी आपल्या प्राणप्रिय भारतभूमीला वेढा घातला. कोण-कोण आले? पोर्तुगालमधून पोर्तुगीज आले, ब्रिटनमधून ब्रिटिश आले. फ्रान्समधून फ्रेंच आले, होलंडमधून डच आले, स्पेनमधून स्पेनीश आले… सगळ्यांना सागरानेच मार्गदर्शन केले.

परकीयांनी सागरातूनच जहाजांमार्फत सैनिक आणले, दारूगोळा आणला आणि इथल्या लोकांना शेकडो वर्षे गुलाम बनवले हा इतिहास आपल्या डोळ्यांसमोर जिवंतच आहे. इंग्लंडच्या किनार्‍यावर बसून सागराला पोटतिडकीने विनवणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी अजरामर कविता- ‘ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला…’ लिहिली. ही कविता आजदेखील डोळे ओले करते. सागर आपला महादेव आहे… तुफान, वादळ, त्सुनामी यांना थोबवून आम्हा सर्वांचे रक्षण करणारा सागर महान परमेश्‍वर आहे.