आतिथ्यशीलतेला बट्टा

0
18

मुरगाव बंदरात दाखल झालेल्या ‘ओशन ओडिसी’ या विदेशी पर्यटक जहाजावरील पर्यटकांच्या बाबतीत स्थानिक टॅक्सीवाल्यांनी जो काही प्रकार केला, तो आतिथ्यशील गोव्याची मान शरमेने खाली घालायला लावणारा आहे. सरकारने यासंदर्भात जी कडक भूमिका स्वीकारली आहे, ती सर्वस्वी रास्त आहे. टॅक्सी लॉबीची ही दादागिरी आता पूर्णपणे मोडीत काढण्याची वेळ आलेली आहे. आतापर्यंत प्रत्येक बाबतीत ही मंडळी केवळ राजकीय वरदहस्ताच्या जोरावर आजवरच्या सरकारांना नमवत आली. आम्ही मीटरप्रमाणे भाडे आकारणार नाही, आम्ही आमच्या टॅक्सींना वेगनियंत्रक बसवणार नाही, आम्ही ऍप आधारित टॅक्सींना गोव्यात पाऊल ठेवू देणार नाही, गोवा सरकारने सुरू केलेल्या गोवा माईल्स सेवेलासुद्धा चालू देणार नाही, विमानतळावर आणि हॉटेलमध्ये उतरणार्‍या पर्यटकांना न्यायला त्यांच्या नातेवाईकांना सुद्धा स्वतःचे वाहन घेऊन येऊ देणार नाही, कदंबला विमानतळ आणि रेल्वेस्थानकावरून शटलसेवा सुरू करू देणार नाही, आम्ही म्हणू तोच कायदा आणि आम्ही सांगू तेच नियम अशी ही मुजोरी आजवरच्या सरकारांनी केवळ मतांसाठी फार फार खपवून घेतली. शिवाय या व्यवसायात स्वतः राजकारण्यांचे हितसंबंध गुंतलेले आहेत ते तर वेगळेच. त्यामुळे लाडावलेल्या या बाळांना आता या राज्यात कायद्याचे राज्य चालते, दादागिरी आणि गुंडगिरीचे नव्हे हे सांगण्याची वेळ निश्‍चितच आलेली आहे. स्थानिक टॅक्सी व्यवसायाला केवळ ते स्थानिक असल्याने आणि त्यांचीही कुटुंबे या व्यवसायावर अवलंबून असल्याने जनतेची जी थोडीफार सहानुभूती आजवर मिळत असे, तीही या अशा गुंडगिरीतून ते गमावून बसतील. गोव्यात पाऊल टाकणार्‍या पर्यटकाने अथवा प्रवाशाने, येथे उतरल्यावर कसा प्रवास करायचा, कुठे जायचे, काय पहायचे हे ठरविण्याचे पूर्ण स्वातंत्र्य त्याला असले पाहिजे. त्यांनी आपल्याच टॅक्सीने प्रवास करायला हवा हे सांगणारे, नव्हे धमकावणारे हे महाभाग कोण?
एकेकाळी गोव्याच्या पर्यटनाची, निसर्गसौंदर्याची सर्वत्र वाहवा होत असे. मात्र, अलीकडे, गोव्यात येणार्‍या देशी – विदेशी पर्यटकांना येथे फार वाईट अनुभव आल्याचे सर्वत्र ऐकायला मिळते. गोव्यात पाऊल ठेवल्यापासून टॅक्सीवाले, हॉटेलांचे दलाल, भिकारी, फिरते विक्रेते वखवखल्यासारखे त्यांच्या मागे लागतात. त्यांना भंडावून सोडतात. सरकारने अलीकडेच हे प्रकार रोखण्यासाठी कायद्याची कडक कार्यवाही करण्याचा इशारा दिला, परंतु अजूनही हे प्रकार थांबलेले नाहीत. स्थानिक पोलीस यंत्रणेला अशा प्रकारांना जबाबदार धरल्याखेरीज हे प्रकार थांबणारही नाहीत. त्यातच मुरगाव बंदरात घडलेला प्रकार तर लाजीरवाणा आहे. गोव्याची कीर्ती ऐकून मोठ्या उत्सुकतेने या भूमीत पाऊल ठेवलेल्या पर्यटकांना, त्यांना न्यायला आलेल्या बसचालकांवर तुटून पडलेल्या टॅक्सीवाल्यांना पाहून आल्या पावली पुन्हा क्रूजवर परतावे लागले. गोव्याची ही अत्यंत कटू आठवण या प्रवासांच्या मनातून आयुष्यात पुसली जाईल काय? या प्रकारामुळे संबंधित क्रुज पर्यटन कंपन्यांनी गोव्यात आपली जहाजे आणायची की नाही याबाबत पुनर्विचार चालवला आहे आणि त्यात त्यांची मुळीच चूक नाही. आपल्या ग्राहकांना वाईट अनुभवाला सामोरे जावे लागू नये यासाठी कोणत्याही जबाबदार संस्थेने तेच केले असते. एकीकडे राज्याचे पर्यटन खाते गोव्यात पर्यटकांना आकृष्ट करण्याच्या मिशाने कोट्यवधी रुपयांचा चुराडा करते आहे. रोड शोंच्या नावाने नुसती चैन चालली आहे. आणि गोव्यात येणार्‍या पर्यटकांना मात्र अशा प्रकारच्या कटू अनुभवाला सामोरे जावे लागते याला काय म्हणायचे? सरकारने हा विषय खरोखरच अतिशय गांभीर्याने घ्यावा. हा गोव्याच्या जागतिक प्रतिमेचा आणि प्रतिष्ठेचा प्रश्‍न आहे. आधीच येथील असुरक्षितता, वाढती गुन्हेगारी, अमली पदार्थांचा सुळसुळाट यामुळे गोव्याचा पर्यटनव्यवसाय दिवसेंदिवस बदनाम होत चालला आहे. गोव्याकडे पाठ फिरवून पर्यटक पर्यायी ठिकाणे निवडत आहेत. त्यात असे सरळसरळ गुंडगिरीचे प्रकार होत असतील तर त्यावर केवळ ‘गैरसमजातून घडलेला प्रकार’ म्हणून पांघरूण टाकले जाऊ नये. बसचालकांशी गैरवर्तन करणार्‍या टॅक्सीचालकांविरुद्ध कोणतीही दयामाया न दाखवता भारतीय दंडसंहितेखालील दखलपात्र गुन्हे नोंदवले जावेत, तरच अशा प्रकारच्या मुजोरीला आळा बसेल. आज संपूर्ण देशात ऍप आधारित टॅक्सीसेवा चालतात, पण गोव्यातच त्यांना आडकाठी का म्हणून? सरकारने ऍप आधारित टॅक्सीसेवांना गोव्यात दार मोकळे करून द्यावे. स्थानिक टॅक्सीचालक अशी ऍप आधारित टॅक्सीसेवा चालवायला तयार असतील तर त्यांनाही सर्वतोपरी सहाय्यही द्यावे, परंतु ही जी काही बेबंदशाही चालली आहे ती संपुष्टात आणावी.