साखळी नगराध्यक्षपदी रश्मी देसाई बिनविरोध

0
3

>> उपनगराध्यक्षपदी आनंद काणेकर यांची निवड; आज होणार अधिकृत घोषणा

साखळी नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी रश्मी देसाई यांची, तर उपनगराध्यक्षपदी आनंद काणेकर यांची अपेक्षेप्रमाणे बिनविरोध निवड झाली. आज (मंगळवार दि. 16) औपचारिकता पूर्ण होऊन अधिकृत घोषणा होणार आहे. काल दोन्ही पदांसाठी या दोघांचेच प्रत्येकी एक-एक अर्ज झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली.

सोमवारी सकाळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सर्व 11 भाजप नगरसेवसकांच्या उपस्थितीत नगराध्यक्षपदासाठी रश्मी देसाई, तर उपनगराध्यक्षपदासाठी आनंद काणेकर यांच्या नावाची घोषणा केली. अधिकृत निवड प्रक्रिया मंगळवारी पूर्ण होणार आहे.
नगराध्यक्षपदासाठी रश्मी देसाई आणि उपनगराध्यक्षपदासाठी आनंद काणेकर यांनी काल आपापले उमेदवारी अर्ज निर्वाचन अधिकाऱ्यांकडे दाखल केले आहेत. त्यांना अनुक्रमे सिद्धी पोरोब व दयानंद बोर्येकर यांनी अनुमोदन दिले.

साखळी पालिकेत भाजपने 12 पैकी 11 जागा जिंकून इतिहास घडवला आहे. त्यामुळे दोन्ही पदांसाठीची निवड बिनविरोध होणार हे निश्चित होते. नगराध्यक्षपद महिलांसाठी राखीव असून, पहिला मान रश्मी देसाई यांना मिळणार आहे. तीनवेळा नगरसेवक म्हणून त्यांनी विजय संपादन केलेला असून, सुस्वभावी व सामाजिक जाणीव ठेवून लोकांची कामे करण्यासाठी त्या सतत अग्रणी असतात. भाजपच्या अन्य महिला नगरसेविकांमध्ये सिद्धी पोरोब, निकिता नाईक, विनंती पार्सेकर, दीपा जल्मी, अंजना कामत यांचा समावेश आहे.

उपनगराध्यक्षपदासाठी आनंद काणेकर यांचे नाव निश्चित झाले असून, दुसऱ्यांदा ते विजयी झालेले आहेत. भाजपच्या अन्य नगरसेवकांमध्ये रियाज खान, दयानंद बोर्येकर, यशवंत माडकर, ब्रम्हा देसाई यांचा समावेश आहे.
टुगेदर फॉर साखळी गटाचे प्रवीण ब्लेगन एकमेव नगरसेवक निवडून आले आहेत.

विकासाला चालना देऊ : मुख्यमंत्री
साखळी शहराला नवा साज चढवण्यासाठी आमचे पालिका मंडळ अधिक जोमाने कार्यरत राहणार आहे. अनेक नवे प्रकल्प, नावीन्यपूर्ण उपक्रम शहरात राबवण्यात येतील, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी संगितले. पालिकेत सत्ता नसतानाही आम्ही साखळी शहराचा कायापालट केला असून, गोव्यातील छोट्या शहरांत पहिल्या क्रमांकाचे शहर म्हणून विकसित केलेले आहे. आता तर पूर्णपणे भाजपचे पालिका मंडळ असल्याने विकासात कोणतीही अडचण येणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.

फोंडा पालिका नगराध्यक्ष निवडीसाठी आज निवडणूक

>> दोन्ही पदांसाठी प्रत्येकी दोन अर्ज सादर

फोंडा नगरपालिकेचे नूतन नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष निवडण्यासाठी आज (मंगळवार दि. 16 मे) सकाळी 11 वाजता निवडणूक घेण्यात येणार आहे. नगराध्यक्षपदासाठी भाजप पुरस्कृत गटातर्फे कृषीमंत्री रवी नाईक यांचे पुत्र रितेश नाईक यांनी, तर विरोधी गटाकडून शिवानंद सावंत यांनी काल आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उपनगराध्यक्षपदासाठी भाजप पुरस्कृत गटातर्फे दीपा शांताराम कोलवेकर आणि विरोधी गटाकडून वेदिका वळवईकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

फोंडा नगरपालिका मंडळाच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत भाजप पुरस्कृत गटाला 10 जागा आणि विरोधी गटाला 5 जागा मिळाल्या आहेत. फोंड्यात भाजप पुरस्कृत गटाला बहुमत मिळाल्याने नगराध्यक्षपदासाठी भाजपच्या गटातील रितेश नाईक, विश्वनाथ दळवी यांच्या नावांची चर्चा सुरू होती. रवी नाईक यांनी नगरपालिका निवडणुकीत भाजपला यश मिळवून दिल्याने नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांची निवड करताना त्यांच्या मताचा विचार करण्यात आल्याचा माहिती सूत्रांनी दिली.

केतन भाटीकर यांच्या नेतृत्वाखालील रायझिंग फोंडा गटातर्फे शिवानंद सावंत यांनी नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला असला तरी भाजप गटाकडे बहुमत असल्याने नगराध्यक्षपदी रितेश नाईक यांची निवड निश्चित आहे. नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना रितेश नाईक यांच्यासमवेत विश्वनाथ दळवी, दीपा कालवेकर, आनंद नाईक, रुपक देसाई यांची उपस्थिती होती.