पावसाळ्यातील आपत्तींसाठी सरकारी यंत्रणा सज्ज

0
4

>> मुख्यमंत्र्यांची माहिती; 30 मेपर्यंत पणजी स्मार्ट सिटीची कामे पूर्ण करण्याची सूचना

राज्य सरकारने आगामी पावसाळ्यातील सर्व प्रकारच्या आपत्तींना तोंड देण्यासाठी सरकारी यंत्रणा सज्ज केली आहे. सरकारी यंत्रणेला मदत करण्यासाठी आपदा मित्र, आपदा सखी यांची नियुक्ती केली आहे. तसेच आपत्तीच्या वेळी सरकारला सहकार्य करू इच्छिणाऱ्या व्यक्तींची नोंदणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पणजी स्मार्ट सिटीमधील सर्व कामे 30 मेपर्यऐत पूर्ण करण्याची सूचना करण्यात आली आहे. मळा-पणजी येथे पुराची समस्या निर्माण होऊ नये म्हणून जास्त पाणी खेचणारे पंप बसवावे. याशिवाय शापोरा, साळ नदीतील गाळ उपसण्याची सूचना करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना काल दिली.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी महसूल मंत्री बाबूश मोन्सेरात यांच्या उपस्थितीत गोवा राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांची बैठक पर्वरी येथील सचिवालयातील सभागृहात घेऊन राज्यातील पावसाळ्यापूर्वीच्या कामाचा आढावा घेतला.

रोगांचा प्रादुर्भाव टाळा
आरोग्य खात्याने पावसाळ्यात साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात. तसेच, ‘नैसर्गिक आपत्ती अलर्ट पोर्टल’ लोकांना आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रमांबद्दल माहिती देण्यासाठी उपयुक्त ठरेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

दोषारोपाचा खेळ चालणार नाही : मोन्सेरात
महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आणि कोणत्याही आपत्तीला सामोरे जाण्यासाठी तयार राहण्याची सूचना केली. तसेच यापुढे दोषारोपाचा खेळ खपवून घेतला जाणार नाही. सरकारने राज्य आणि जिल्हा स्तरावर घटना प्रतिसाद प्रणाली अधिसूचित केली आहे. समुद्रात मोठ्या प्रमाणावर बचाव कार्यासाठी स्थानिक आकस्मिक योजना तयार केल्या आहेत, असेही मोन्सेरात यांनी सांगितले

आपदा मित्र, आपदा सखींची नियुक्ती करा
जनतेने आपत्तीच्या वेळी मदतकार्यात सक्रिय सहकार्य करण्यासाठी पुढे आले पाहिजे. जे लोक स्वेच्छेने जिल्हा यंत्रणेसोबत काम करण्यास इच्छुक आहेत त्यांची नोंदणी करण्याचे निर्देश राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला देण्यात आले आहेत. अग्निशमन आणि आपत्कालीन सेवांच्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षित आपदा मित्र आणि आपदा सखींना नियमितपणे नियुक्त करण्याच्या सूचना दिल्या आहेत, जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत त्यांच्या सेवांचा वापर करता येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.