Home बातम्या साखळीच्या नाडकर्ण्यांची चवथ!

साखळीच्या नाडकर्ण्यांची चवथ!

0

संजीव प्रभू खानोलकर

भाद्रपद शुद्ध चतुर्थीला श्री गणेशाचे आगमन म्हणजे आबालवृद्धांचा आवडता सण! प्रत्येकाच्या तोंडी चवथ आयलीअसे म्हणत घरातील मंडळीची धावपळ सुरू होते. सामान, माटोळी आणणे, घर सजवणे यात कुटुंबातील प्रत्येकजण रमतो. परगावी असलेली मंडळी मोठ्या उत्साहाने आपल्या मुळगावी परततात. दीड दिवस, पाच, सात, अकरा दिवस कुटुंबातील लहानापासून थोरांपर्यंत सर्व सदस्यांना एकत्रित करणारा हा सण.

विश्‍वातील सर्व कलांचा अधिपती असलेला देव म्हणजे श्री गणपती. सगळे ताणतणाव दूर करून मनाला शांती आणि आनंद देणारा असा हा विघ्नहर्ता. हा सिद्धिविनायक अर्थात लंबोदर कुटुंबांना एकत्रित करून, त्यांच्यात आपलेपणा आणि स्नेह वाढविण्यासाठीच वर्षातून एकदा या जीवनदृष्टीत प्रकटतो. आता या श्री गणेशाने सार्वजनिक रूप धारण केले आहे. मात्र, एकत्रित कुटुंबाला हा सण प्रिय वाटतो. हा सण आजही परंपरा आणि श्रद्धा कायम ठेवून आहे. उत्साहात अख्खे कुटुंब एकत्र येऊन चवथ साजरी केली जाते. यातच कौटुंबिक महत्त्व व पावित्र्य जपले जाते.

वाजे शिरोडा येथील वाजेकर कुटुंबीय, आडपईचे नाईक कुटुंबीय, सुर्ला पाळी येथील घाडी, कुडणेचे मळीक कुटुंब यांच्या एकत्रित गणपतीचे खास वैशिष्ट्य आहे. सुर्ला येथील घाडीवाड्यावर व्हडलो घाडी व धाकटो घाडी अशा दोन घाडी कुटुंबात, राजांगणाच्या घरात दोन वेगवेगळे गणपती पुजले जातात. सणानिमित्त सुमारे दीडशे सदस्य एकत्र येतात. पूर्ण घाडीवाडा या काळात आनंदाने न्हाऊन निघतो. सत्तरीतील तुळशीमळा पर्ये येथील नाडकर्णी कुटुंबीय या गोष्टीला अपवाद नाही. गोव्याच्या विविध भागात तसेच मुंबई, बेळगाव, अमेरिका, पुणे या ठिकाणी कामधंद्यानिमित्त स्थायिक झालेली नाडकर्णी मंडळी चतुर्थीला जुन्या घरात एकत्र येतात. तब्बल १५० च्या आसपास कुटुंबातील सदस्यांची सख्या असते. शेकडो वर्षांची परंपरा लाभलेले कुटुंबवत्सल जमीनदारांचे हे घराणे! जुन्या घराची डागडुजी केल्यास आज १२५ वर्षे पूर्ण झाली आहेत. वाळवंटीच्या काठी, कुळागर बागायतीत नाडकर्णी कुटुंबीयांचे राजांगणाचेसुबक असे घर आहे. मूळ कर्नाटक येथील नाडकर्णी यांना साखळीचे तत्कालीन राणे राजेयांनी सरदारकीपदी आणले असल्याचा इतिहास आहे. या घराण्याला इतिहास, परंपरा व नावलौकिक होता व आजही आहे.

या घराण्यातील निवृत्त सरकारी अधिकारी श्री. बापू नाडकर्णी यांच्या म्हणण्यानुसार सध्याची त्यांची २५ वी पिढी. ते स्वत: २३ व्या पिढीतील आहेत. सत्तरीत अनेक ठिकाणी त्यांच्या जमिनी व बागायती आहेत. परंतु त्यांची कधी विक्री झालेली नाही. त्यासाठी कुटुंबात दुही माजलेली नाही. केवळ घराण्याच्या नावावरच व वाडवडिलांच्या आशीर्वादाने व पुण्याईने नाडकर्णी कुटुंब आजही एकत्र येते. याच कुटुंबातील दत्ताराम विठ्ठल नाडकर्णी यांनी २१ सप्टेंबर १८४३ साली समाधी घेतली. घरात त्यांची समाधी आहे. आजही त्यांचे स्मरण केले जाते. गणेश चतुर्थीच्या चौथ्या किंवा पाचव्या दिवशी तिथीनुसार या महापुरुषाची पुण्यतिथी साजरी केली जाते. चतुर्थीच्या काळात पुण्यतिथी उत्सव येत असल्याने कुटुंबात एक वेगळेच घरगुती नातेसंबंध दृढ होत असल्याने विशेष महत्त्व येते असे या घरातील डॉक्टर गुरुदास नाडकर्णी सांगतात. नाडकर्णी कुटुंबातील काहीजणांची पोर्तुगीज राजवटीत सरकारी अधिकारी म्हणून नोकरी केल्याचा इतिहास आहे. या घराण्यात डॉक्टर, वकील, शिक्षण तज्ज्ञ, इंजिनिअर आहेत. सामाजिक क्षेत्रातील पंच, सरपंच पदेही या कुटुंबातील सदस्यांनी भूषविलेली आहेत. पण याचा कुठेच मीपणा कधी त्यांच्यात दिसला नाही. हीच खरी नाडकर्णी घराण्याची खासियत आहे.

घराण्यातील पिढीजात व्यवहार, कुटुंब एकसंध राहण्याकरिता, त्याची देखभाल, व्यवस्था राखून ठेवण्यासाठी १९८७ साली नाडकर्णी संयुक्त कुटुंबनावे ट्रस्ट स्थापन करण्यात आला आहे. या ट्रस्टद्वारे नाडकर्णी कुटुंब सोनेरी धाग्याने बांधले गेल्याचे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. वार्षिक धार्मिक विधी, कुटुंबातील लग्नकार्य विधी, वार्षिक उत्सव या ट्रस्टमार्फत आयोजित केले जातात. त्यात गणेश चतुर्थीमोठ्या उत्साहात व धूमधडाक्यात साजरी केली जाते. या ट्रस्टची दर महिन्याला बैठक होऊन आढावा घेतला जातो.

वर्षपद्धतीप्रमाणे चतुर्थीनिमित्त या घराण्याची रंगरंगोटी केली जाते. श्रावणात चवथीची लगीनघाई सुरू असते. चतुर्थीला १००१५० जणांचे कुटुंब चार दिवसांसाठी तुळशीमळ्यात जमणार आहे. यासाठी कारवारहून खास स्वयंपाकी आणले जातात. तशी परंपरा असून ती पूर्वापार चालत आली आहे. चार दिवस नाडकर्णी मंडळी एकत्र येतात. खास सजविलेल्या मखरात श्री गणरायाचा दीड दिवस मुक्काम असतो. मंगलमय वातावरण, लगबग आणि उत्साहाला उधाणाचे भरते आलेले असते. उत्सव काळात या राजांगणाच्या एकूण २५ खोल्यांमधून आबालवृद्धांचा आवाज, गप्पागोष्टी, धावपळ असते. पूजाअर्चा, आरत्या, भजन आदींनी नाडकर्ण्यांचे जुने घर गजबजून जाते. या अशा एकत्र कुटुंब गणेश उत्सवाला श्री विघ्नहर्त्या सुखदात्याने अशीच प्रेरणा, बुद्धी व आपलेपणा द्यावी ही प्रार्थना! आजच्या आधुनिक काळातही अशी कुटुंबे एकत्र येवो हीच सदिच्छा!