– आर. बी. फडते
गोमंतकीयांचा सर्वाधिक आवडता सण गणेशचतुर्थी अर्थात चवथ! भाद्रपद शुद्ध चतुर्थीला श्री गणेशाचा जन्म झाला म्हणून शंकराने कैलास पर्वतावर जन्मोत्सव साजरा केला. गणपतीची पूजा किती प्राचीन आहे, त्याबद्दल नक्की माहिती मिळत नाही. ती अनार्य संस्कृतीतील देवता होती. आर्यांनी तिला आपल्या देवतांमध्ये स्थान दिले असावे. गणपती या शब्दाचा स्पष्ट उल्लेख ऋग्वेदात सापडतो.
चवथीच्या दिवशी गोव्यात घरोघरी गणपतीच्या मूर्तीची पूजा केली जाते. मूर्ती भोवती सुंदर मखराची आरास केली जाते. वर आढ्याला माटोळी बांधली जाते. बहुतेक गणपती दीड दिवसाचे असतात. कित्येक जण पाच, सात, नऊ, अकरा दिवस ठेवतात. काही कुटुंबीयांचा मिळून एकच गणपती असतो. तसेच गोव्यातील प्रमुख शहरे, तालुक्याची ठिकाणे, मोठी गावे, इथे सार्वजनिक गणपतीचे पूजन करण्याची प्रथा सुरू झालेली आहे. या गणेशमूर्तींच्या जोडीला पौराणिक, ऐतिहासिक तसेच एखाद्या बहुचर्चित घटनेवर आधारित देखावे तयार करण्याची प्रथाही फार पूर्वीपासून चालत आलेली आहे.
या सर्वांहून वेगळा, श्री गणेशाच्याच कलात्मकरित्या तयार केलेल्या मूर्तींच्या प्रदर्शनाचा एक प्रकार गोमंतकातील देवभूमी म्हणून प्रसिद्ध असलेल्या माशेल परिसरात गेली जवळजवळ दहा–बारा वर्षे सुरू झालेला आहे. गणेशचतुर्थीनंतर पुढे एकवीस दिवस हे गणेशदर्शन चालू असते. या क्षेत्रातील काही कलाकार व्यक्ती व संस्था कधी पौराणिक आख्यानांच्या आधाराने, कधी वेगवेगळ्या वस्तूंच्या कलात्मकरित्या वापर करून तर कधी कलावंतांच्या देवदत्त प्रतिभासंपन्न कल्पनेतून श्री गणेशाच्या भव्य मूर्ती साकार करीत असतात. गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक राज्यातील हजारो लोक जणू अष्टविनायकांच्या यात्रेला गेल्याप्रमाणे एक प्रकारची ही अभिनव गणेश यात्राच करत असतात. इथल्या मालिनी पौर्णिमेच्या उत्सवाला जशी लोकांची गर्दी जमते तशी गणेशभक्त आणि रसिकांची येथे झुंबड उडते. राजधानी पणजीपासून अवघ्या वीस किलोमीटरवर असलेले माशेल, गोमंतकाचा मध्यवर्ती भाग असल्यामुळे, स्वत:चे वाहन असलेल्या आणि नसलेल्यांनाही बसने आरामात इथे येऊन ही अभिनव गणेश यात्रा पार पाडून आपल्या गावी परत जाता येते. पूर्वी गोव्यातील लोक गणपतीच्या भव्य मूर्ती पाहण्यासाठी पुण्या मुंबईला जायचे. परंतु आता उलटी गंगा सुरू झालेली आहे. पुणेकर आणि मुंबईकर, इथले कलात्मक गणपती पाहण्यासाठी गर्दी करू लागले आहेत. गेल्या वर्षी गोवा सरकारच्या सांस्कृतिक आणि कला खात्याने या प्रदर्शनीय गणपतीची एक स्पर्धाही घडवून आणलेली होती. या स्पर्धेत माशेल इथल्या मल्लिनाथ स्पोटर्स आणि कला मंडळाने तयार केलेल्या ‘वसुंधरा धातू गणेश’ या गणेशमूर्तीला पहिल्या नंबरचा पुरस्कार मिळाला होता. माशेल गावच्या मध्यभागी असलेल्या मल्लिनाथ मंदिराच्या रंगमंचावर सिद्धेश च्यारी आणि भिसाजी गडेकर या गोवा आर्ट्स कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी ९ फूट उंचीची फिक्या तांबूस रंगाच्या पत्र्यापासून ही सुंदर गणपतीची मूर्ती तयार केली होती. पत्र्यांच्या जोडणीसाठी वेल्डिंगचा वापर केल्यामुळे हे एक जुनेपुराणे धातूशिल्प असल्याचा आभास निर्माण करण्यात कलाकार यशस्वी झाले होते. मूर्तीच्या अंगावरील वस्त्रालंकार, वेगवेगळ्या आकाराचे लोखंडी गोल वापरून तयार केलेले होते. त्याच्या गळ्यातील यज्ञोपवीत म्हणजे सायकलीची चेन आहे, ही बाब मूर्तीच्या निकट जाऊन नीट निरखून पाहिल्याशिवाय लक्षात येत नव्हते. गणरायाच्या अंगावरील शाल आणि डोक्यावरील फेटासुद्धा बारीक पातळ लोखंडी तारेपासून बनविलेला होता.
कला युवक संघ टोंकवाडा – सांत इस्तेव्हचा अष्टविनायक गणपतीही रसिक प्रेक्षकांकडून खूपच वाखाणला गेला होता. गेली सतत चार वर्षे तुकाराम चोडणकर आणि त्यांच्या सहकार्यांनी तयार केलेल्या उत्तमोत्तम गणेशमूर्ती पाहून रसिक तृप्त होऊन जात असतात. पहिल्याच वर्षी त्यांनी ‘श्री कल्पवृक्ष गणेश’ ही सहा मीटर रुंदीची भव्य गणेशमूर्ती उभारली होती. अनादिकालापासून कल्पवृक्ष अर्थात माडाची महती संत महंत, ऋषिमुनींनी सांगितली आहे. त्याच्या प्रत्येक भागाचा काही ना काही उपयोग होत असल्याने त्याला कल्पवृक्ष म्हटले जाते. कुठलेही शुभकार्य कल्पवृक्षाच्या अमृतफळाविना अपुरे आहे. याच माडाच्या बुंध्यापासून चुडतापर्यंत प्रत्येक भागाचा वापर करून ही मूर्ती बनविलेली होती. खाली भव्य कलश, कलशावर कल्पवृक्षाचे फळ आणि त्या अमृतफळाच्या आत श्री गणेशाची सुंदर सुबक मूर्ती पाहणार्यांच्या मनात आपोआप श्रद्धाभाव जागृत करायची. गेल्यावर्षी तर त्यांनी अर्ध्या एकरच्या निसर्गरम्य भू – भागात खर्याखुर्या पाषाणांवर अष्टविनायकांच्या सुंदर मूर्ती जडवून भाविक गणेश भक्तांना एकाच वेळी एकच दृष्टिक्षेपात थेऊरचा चिंतामणी, लेण्याद्रीचा गिरिजात्मक, मोरगावचा मयूरेश्वर, महाडचा वरदविनायक, पालीचा बल्लाळेश्वर, रांजणगावचा महागणपती, सिद्धटेकचा सिद्धिविनायक आणि ओझरचा विघ्नेश्वराचे दर्शन घडविण्याचे अभिनव कार्य केलेले होते. भाविक प्रेक्षकांना श्री गणेशाच्या मूर्तीवर अभिषेक करण्याची संधी मिळालेली होती. आणि यातील उल्लेखनीय बाब म्हणजे अभिषेक पात्रात अर्पण केलेल्या दुधाचा एकाच वेळी, या आठही गणपतींच्या मस्तकांवर अभिषेक होत असल्याचे अद्भुत दृश्य पाहावयास मिळत होते.
‘जो न देखे रवी, वो देखे कवी’ अशी एक म्हण आहे. कवीच्याच नव्हे तर प्रत्येक कला प्रकारातील कुठल्याही सर्जनशील कलाकाराच्या बाबतीत ही म्हण खरी ठरू शकते. एकाच गोष्टीचा ध्यास घेऊन प्राचीन ऋषिमुनींसारखी तप:श्चर्या अर्थात बारा वर्षे विषयावर लक्ष केंद्रित केल्यामुळे त्याची दृष्टी सूर्याच्या तेजापेक्षाही अधिक तेज:पुंज होत असते. सर्वसामान्य माणसाला जे अशक्य वाटते ते या कलाकाराने आपल्या तेज प्रज्ञेच्या बळावर शक्य करून दाखविलेले असते. तो कलाकार थोडासा भावुक असेल तर मग विचारायलाच नको. त्याला जळी स्थळी, काष्ठी, पाषाणी त्याची ध्यास देवताच दिसत असते. कुंभारजुवे येथील चैतन्य तारी या युवा कलाकाराच्या बाबतीत असाच प्रकार घडलेला आहे. चित्रकला, मूर्तिकला, स्थापत्यकला या विषयांचे कुठलेही महाविद्यालयीन शिक्षण न घेतलेला हा ऐन पंचविशीतील कलाकार शालेय शिक्षणाच्या बळावर गेली सोळा वर्षे उत्तमोत्तम गणेशमूर्ती घडवीत आलेला आहे. श्री शंकराच्या अंगावर असलेली त्रिशूल, कमंडलू, सर्प, व्याघ्राजीन, चंद्र, गंगा, इत्यादी आभूषणे आम्ही नित्य पहात असतो. परंतु या आभूषणांचा वापर करून त्याच्याच लाडक्या पुत्राची श्री गणेशाची मूर्ती घडवावी असा विचार चैतन्य तारी सारख्या कलाकाराच्याच मनात येऊ शकतो. या विचाराला मूर्त स्वरूप देऊन तो आमच्यासमोर श्री शंकराभूषणरूपी श्री गणेशाची मूर्ती उभी करतो तेव्हा या युवा कलाकाराला दाद द्यावीच लागते. इथे श्री शंकराच्या हातातील कमंडलू गणपतीबाप्पाचे विशाल उदर दाखवतो. पायातील खडावा श्रीचे चरणयुगुल बनतात. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे एरव्ही एखादा भला भोठा सर्प फडा उभारून समोर उभा राहिला तर भल्याभल्यांच्या अंगाला थरकाप सुटू शकतो. पण श्री शंकराच्या गळ्यातील हाच सर्प हत्तीच्या सोंडेचा आकार धारण करणारे गजमुख बनतो तेव्हा नमस्कारासाठी समोर उभ्या राहिलेल्या भाविक भक्तांच्या मनातील भिती दिगंतरा जाते. ते वज्रासारखे निर्भय बनतात. अशा प्रकारे गेल्या वर्षीचा चैतन्य तारी यांचा ‘श्री शंकराभूषणरूपी श्री गणेश’ जाणकार प्रेक्षकांमध्ये एक चर्चेचा विषय बनला होता. कुंभारजुवे येथील श्री राम देवस्थानचा गेल्या वर्षीचा ‘गणराज रंगी नाचतो’ हा भक्त गणपतीही, रसिक प्रेक्षकांना खूपच आवडला होता. फाईन आटर्समधील मास्टर ही डिग्री तसेच जर्मनीला जाऊन चलचित्र निर्मितीचे विशेष प्रशिक्षण घेतलेल्या प्रदीप परब, या नामवंत कलाकाराने ही मूर्ती तयार केली होती. त्यांच्या गणपतीच्या मूर्ती पाहणे ही रसिक प्रेक्षकांच्या दृष्टीने एक पर्वणीच असते. जनमानसात रूढ असलेल्या एखाद्या पौराणिक कथेला, स्वत:च्या अफलातून कल्पकतेची जोड देऊन प्रेक्षकांसमोर ते एक नयनमनोहर दृश्य उभे करतात. त्याला उचित संगीत, चित्र, नृत्य, गीत संवाद अशा कलाकाराची जोड देऊन सजवतात.
प्रदर्शनीय, कलात्मक गणेशमूर्ती तयार करण्याच्या क्षेत्रात कुंभारजुवे येथील थापणेश्वर सांस्कृतिक मंडळाचा एक वेगळाच दबदबा आहे. मांडवी आणि जुवारी या गोव्यातील दोन मोठ्या नद्यांना जोडणार्या कुंभारजुवे कालव्याचा कल्पकतेने वापर करून, या मंडळाचे कलाकार गणेशमूर्ती तयार करत असतात. गेल्या वर्षी त्यांनी श्री गणेशाचे वाहन असलेल्या उंदरांनी घडवून आणलेल्या ‘श्री गणेशाचा नौका विहार’ या प्रेक्षणीय देखाव्याची निर्मिती केलेली होती.
माशेल कलाप्रेमी संस्थेनेही, आपले ब्रीद कायम राखून, पर्यावरणाचे महत्त्व लक्षात ठेवून आपली वैशिष्ट्यपूर्ण ‘शुभ चिन्ह गणेश’ ही कलाकृती निर्माण केली होती. देवदेवतांच्या मिरवणुकीत मिरविल्या जात असलेल्या छत्र्या, अब्दागिर, कळस, गोफ, फुगे, इतकेच नव्हे तर ढोल, ताशे, झांज, या वस्तूंना भारतीय संस्कृतीत शुभ चिन्ह मानण्याची प्रथा आहे. याच शुभ चिन्हांचा वापर करून माशेलचे ख्यातकीर्त कलाकार किर्तीकुमार प्रभू यांनी ही कलात्मक गणेशमूर्ती तयार केली होती. या वस्तूंच्या तांबड्या पिवळ्या तसेच पावित्र्याचे निदर्शक असलेल्या पांढर्या रंगामुळे या मूर्तीची रंगसंगती आपोआप साधली गेली होती. या कामी त्यांना सिद्धेश च्यारी, भिसाजी गडेकर, रोहित भोसले, प्रताप गावकर, पंकज नावेलकर, विभाकर धूपकर, विकास फडते, मंजीनाथ दड्डणकर, दीपेश गावकर या युवा कलाकारांनी सहकार्य केले होते.
गेली कित्येक वर्षे नावेलकर बंधू सातत्याने रसिकांचे तसेच बुद्धीवंतांचे आकर्षण ठरत असलेल्या अभिनव अशा भव्य गणेशमूर्ती तयार करत असतात. त्यांचा गणपती नेहमीच बर्या वाईट चर्चेचा विषय बनत असतो. माशेल परिसरातील प्रदर्शनीय गणपती पाहण्यासाठी प्रेक्षक जेव्हा माशेल गावात प्रवेश करतात तेव्हा शुभारंभी त्यांना देवकीकृष्ण देवालयासमोर असलेल्या नावेलकर बंधूच्या गणपतीचे दर्शन घडते. गेल्या वर्षी त्यांनी पंधरा सुंदर मोरांच्या मूर्तींचा कलात्मक वापर करून ‘केकी मयूर गणेश’ ही गणेशमूर्ती घडविली होती. गणराज कला मंडळ माडापै यांचा ‘तांदुळाचा गणपती’ही गेल्या वर्षी प्रेक्षकांना खूपच आवडला होता. शेतात पिकणारे भात, त्यापासून तयार केलेले पांढरे तांदूळ, करड्या रंगाचा कुंडा, सुकलेले पिवळे धम्मक तण, हिरवे रोप या सर्वांचा कलात्मक वापर करून गणेश गावडे आणि त्याच्या युवा सहकार्यांनी एक प्रेक्षणीय गणेशमूर्ती तयार केली होती.
गेल्या वर्षीचा विठ्ठल सांस्कृतिक मंडळ, बाजारवाडा माशेल यांचा ‘सुपर्ण श्री गणेश’ही खूपच गाजला होता. ही सुंदर गणेशमूर्ती घडवताना ॐकार नार्वेकर, अमोघ फुलारी, तेजीत बांदेकर, सिद्धेश गावकर, रितेश फुलारी, विवेक कुंडईकर, भावेश फुलारी, अरुण शिरोडकर या तरुण होतकरू कलाकारांनी इथल्या कुळागरात मुबलक प्रमाणात सापडणार्या फक्त पोफळीच्या पोवल्यांचा वापर केला होता. कुळागराच्या मध्यभागी डोक्याला मुंडासे बांधलेला भारदस्त श्री गजानन एखाद्या पोर्तुगीजकालीन भाटकारासारखा निवांत बसलेला प्रेक्षकांना दिसत होता. त्याची अंगकांती, पेहराव, इथल्या प्रदेशाशी सुसंगत होता. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे ही गणेशमूर्ती दोन हातांची होती. इथल्या भूमिपुत्रांना तो आपल्यापैकीच एक असल्यासारखा वाटत होता. लहानथोरांना आपल्या घरातील एखाद्या जाणत्यासारखा वाटत होता. ‘गणपतीबाप्पा’ या आपुलकीच्या संबोधनाला सार्थ ठरवीत होता.
माता–पित्या भोवती घातलेली प्रदक्षिणा पृथ्वी प्रदक्षिणे इतकीच तोलामोलाची असते हे सत्य दाखवून देणार्या एका पौराणिक कथेवर आधारित असलेला श्री शांतादुर्गा कला मंडळ खांडोळा या संस्थेने लक्ष्मण गावकर यांच्या नेतृत्वाखाली तयार केलेला ‘बाल गणेश पृथ्वी प्रदक्षिणा’ हा गणपतीही गेल्या वर्षी चोखंदळ प्रेक्षकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला होता. श्री गणेश आणि कार्तिकेय हे दोघे शिवपार्वतीचे पुत्र. दोघेही एकापेक्षा एक वरचढ, हुशार आणि बुद्धिवान. कार्तिकेयाला वाटले होते की तो मोराच्या पाठीवर बसून उडणार आणि सहज पृथ्वीप्रदक्षिणा करणार. ढेरपोट्या गणपती इटुकल्या उंदराच्या पाठीवर बसून त्याच्याशी स्पर्धा करूच शकणार नाही. परंतु शास्त्रार्थ जाणणार्या नारदाने शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ठरवली आणि श्रीगणेशाला या स्पर्धेत विजेता ठरविला. या परिसरातील कलावंत आज मोठा प्रमाणात जे देखाव्याचे गणपती बनवीत असतात, त्याचे प्रेरणास्रोत, साई कला मंडळ तारीवाडा – माशेलचा २००१ सालचा श्रीफळाचा गणपती होता असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. गेल्या वर्षी या मंडळाचे मुख्य कलाकार नामदेव तारी आणि त्यांच्या सहकार्यांनी श्री विष्णूचे मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बौद्ध, कलंकी असे दहा अवतार दाखविणार्या दशमुखी श्री गणेशाची मेणाची भव्य मूर्ती तयार केली होती. ती पाहण्यासाठी वर्षपद्धतीप्रमाणे प्रेक्षकांनी गेल्यावर्षीही फार मोठी गर्दी केली होती. नावेंकर बंधूंचा ‘पंकजरूपी श्रीगणेश’, प्रकाश आपा माशेलकर यांचा ‘श्री गणेशाचे सचिनला वरदान’, भारत जल्मीचा ‘सूर्यरूपी श्रीगणेश’ आणि माशेलकर पिता–पुत्रांचा ‘श्रीकृष्णरूपी श्रीगणेश’ हे प्रदर्शनीय गणपतीही गेल्या वर्षी प्रेक्षकांना खूप आवडले होते.