सांतिनेजमध्ये बनावट कॉल सेंटरवर छापा

0
7

>> पणजी पोलिसांकडून 13 जणांना अटक, 30 लाखांच्या वस्तू जप्त

पणजी पोलिसांनी अमेरिकन नागरिकांना गंडा घालणाऱ्या बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश काल केला असून या प्रकरणी सांतिनेझ येथे छापा टाकून 13 जणांना अटक केली. त्यांच्याकडून सुमारे 30 लाख रुपयांच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त करण्यात आल्याची माहिती काल उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सांतिनेझ येथील एका इमारतीत बनावट कॉल सेंटर सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुरूवारी मध्यरात्री सदर कॉल सेंटरवर छापा टाकला. या टोळीतील संशयित गोव्यात कॉल सेंटरमार्फत आपण मायक्रोस्फॉट कंपनीचे कर्मचारी असल्याचे भासवून अमेरिकन नागरिकांशी संपर्क साधायचे. संशयित अमेरिकन नागरिकांचे लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर हॅक करायचे. त्या नागरिकांना यंत्रणेत व्हायरस घुसल्याचे सांगून यंत्रणा दुरुस्ती करण्यासाठी ठरावीक शुल्क जमा करण्यास भाग पाडत होते. त्यानंतर त्यांना पुन्हा संपर्क साधून यंत्रणेच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त सेवा देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून 500 अमेरिकन डॉलर वसूल करायचे. पोलिसांनी संशयितांकडून 25 लॅपटॉप, 25 मोबाईल व इतर वस्तू जप्त केल्या आहेत अशी माहिती पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन यांनी दिली.