सांतइनेज खाडी साफसफाईच्या प्रस्तावाला पूर्ण सहकार्याचे सरकारचे आश्‍वासन

0
63

>>आमदार मोन्सेर्रात, कुंकळकरांच्या उपस्थितीत महापौरांची माहिती

सांतइनेज खाडीत साचून राहिलेला सगळा गाळ उपसून काढून खाडीची साफसफाई करण्यासाठीच्या पणजी महापालिकेच्या प्रस्तावाला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्‍वासन गोवा सरकारने दिलेले असून त्यामुळे सगळ्यांची मदत घेऊन ही योजना मार्गी लावण्यात येणार असल्याचे पणजीचे महापौर सुरेंद्र फुर्तादो यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले. सांताक्रुझ मतदारसंघाचे आमदार बाबुश मोन्सेर्रात व पणजीचे आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर हेही यावेळी हजर होते. खाडीची साफसफाई कशी केली जाईल याची माहिती देणारी चित्रफित पत्रकारांना दाखवल्यानंतर सुरेंद्र फुर्तादो बोलत होते.
मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनाही सांतइनेज खाडीची साफसफाई कशी केली जाणार आहे त्याची माहिती देणारी चित्रफित दाखवण्यात आलेली असून त्यांनी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले असल्याचे फुर्तादो म्हणाले.
यावेळी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर म्हणाले की हे काम हाती घेण्यापूर्वी सांतइनेज खाडीच्या आजुबाजूस राहणार्‍या लोकांना विश्‍वासात घ्यावे लागेल. खाडीवर काही लोकांनी अतिक्रमणे केलेली असून तिही काढून टाकावी लागतील. शिवाय खाडीला संरक्षण भिंतही बांधावी लागेल.
बाबुश मोन्सेर्रात म्हणाले की या खाडीची साफसफाई करायची झाल्यास बांध या भागातील सुमारे ४० कुटुंबियांचे पुनर्वसन करावे लागेल. या खाडीची साफसफाईचे काम होणे ही काळाची गरज असल्याचे ते म्हणाले.
‘रिसोर्सिस इंटरनॅशनल’ या कंपनीचे मालक भाविक रजानी यानी यावेळी खाडीची साफसफाई करण्यात येईल व त्यासाठी कसली यंत्रसामुग्री वापरली जाईल त्याची माहिती दिली.
१२ कोटींची यंत्र सामुग्री
या नाल्याची साफसफाई करण्यासाठी १२ कोटी रु.ची यंत्रसामुग्री लागणार असल्याचे ते म्हणाले. मात्र, ही यंत्रसामुग्री गोवा सरकार विकत घेणार की ज्याला साफसफाईचे कंत्राट मिळेल ती कंपनी ती विकत घेईल हे अजून काहीही ठरलेले नसल्याचे यावेळी सांगण्यात आले.