पार्किंग शुल्क वाढ विरोधात मोर्चाचा भाजप नगरसेवकांचा इशारा

0
112

>>महापौर फुर्तांदोंवर पत्रकार परिषदेत आरोप

पणजीचे महापौर सुरेंद्र फुर्तादो यांनी आपल्या मर्जीतील एका माजी नगरसेवकाला फायदा करून देण्यासाठी वाहन पार्किंग शुल्कात प्रचंड वाढ केली आहे. महापालिकेच्या या निर्णयास भाजप नगरसेवकांचा तीव्र विरोध आहे. दि. २८ रोजी होणार्‍या सर्वसाधारण सभेत वरील प्रस्ताव मंजूर करण्याचा प्रयत्न झाल्यास राजधानीतील नागरिकांचा मोर्चा आणणार असल्याचा इशारा नगरसेवक मिनिन द क्रूज, रुपेश हळर्णकर व शेखर डेगवेकर यानी काल पत्रकार परिषदेत दिला.
शहरातील वाहतूक व्यवस्थेत शिस्त आणण्याच्या हेतूने महापालिकेने यापूर्वी चार चाकी वाहनांना चार तासांपेक्षा कमी वेळेसाठी प्रत्येकी १० रुपये व बारा तासांसाठी १५ रुपये व २४ तासांसाठी २० रुपये तसेच दुचाकींसाठी चार तासांत कमी वेळेसाठी चार रुपये, ४ ते १२ तासांसाठी ८ रुपये व २४ तासांसाठी १५ रु. शुल्क निश्‍चित केली होती. परंतु आता महापौरांनी चार चाकी वाहन पार्किंग शुल्क एका तासासाठीच २० रुपये तर दुचाकी वाहनांसाठी १२ तासांपर्यंत प्रत्येक तासासाठी १० रुपये भाडे निश्‍चित केले आहे. या प्रचंड शुल्क वाढीस नागरिकांचा विरोध आहे, असे मिनिन द क्रुज यांनी सांगितले.

पार्किंग शुल्क भरमसाठ नाही : आमदार मोन्सेर्रात

पणजी महापालिकेने शहरातील काही रस्त्यांवर पार्किंगसाठी ठरवलेले शुल्क जास्त नसल्याने त्याबाबतचा निर्णय मागे घेण्याचा प्रश्‍नच येत नसल्याचे आमदार बाबुश मोन्सेर्रात यांनी काल पत्रकारांशी बोलताना सांगितले.

चारचाकी गाड्यांसाठी दोन तासाला २० रु. एवढे शुल्क असून ते भरमसाठ म्हणता येणार नसल्याचे मोन्सेर्रात म्हणाले. दोन तासानंतर १२ तास होईपर्यंत प्रत्येक तासामागे १० रु. आकारण्यात येणार आहेत. दुचाकींसाठी पहिल्या चार तासांसाठी १० रु व नंतर प्रत्येक तासामागे ५ रु. (१२ तासांपर्यंत) असे दर असून हे भरमसाठ म्हणता येणार नाहीत, असा दावा त्यांनी केला.