सांगे येथील खून प्रकरणी अद्याप संशयित मोकळेच

0
106

कुयणामळ-सांगे येथे शनिवारी घडलेले पण रविवारी उघडकीस आलेले शांताराम शाणू शिरोडकर यांच्या खून प्रकरणाला चार दिवस उलटले तरी अद्याप सांगे पोलिसांनी कुणालाच अटक केलेली नाही. दुसरीकडे शिरोडकर कुटुंबीय चिंताग्रस्त असून डीएनए अहवाल कधी मिळणार याकडे लक्ष ठेवून आहे.

खूनाच्या संशयावरून सांगे पोलिसांनी घटनेच्या ठिकाणी पुरावे गोळा करण्याचे काम हाती घेतले असून आतापर्यंत शांताराम शिरोडकर यांचे चप्पल, प्लास्टीक मूठ असलेला कोयता, टॉपी जळालेल्या काजू बागायतीत सापडली आहे. तर जिथे शिरोडकर यांचे होरपळलेल्या अवस्थेत प्रेत सापडले त्या ठिकाणी पोलिसांना मोबाइलचे सुटे भाग व घराची किल्ली सापडली आहे. जवळ जवळ सर्व पुरावे शांताराम शिरोडकर यांचेच असल्याचे सिद्ध झाले आहे. फक्त डीएनए अहवाल यायचा बाकी आहे. तरीही शांताराम शिरोडकर यांचे शिल्लक राहिलेले शव हाती घेण्यास कुटुबियांनी विरोध दर्शविला आहे. कारण नियोजन करून त्यांचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी काजू बागायतीला आग लावण्यात आलाचा आरोप कुटुबियांनी केला आहे.

शिरोडकर कुटुंबियात गेली कित्येक वर्षे जमिनीसंदर्भात वाद चालू आहे. त्यातूनच हे प्रकरण घडल्याचा संशय पुतण्या बाबलो शिरोडकर यांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी सखोल चौकशी करून खुन्याला अटक करावी अशी मागणी शिरोडकर कुटुंबियांनी व्यक्त केली आहे. घटनास्थळी भेट देणारे सर्वच जण हा नियोजित खूनच असल्याचे ठासून सांगत आहेत. जिथे शांताराम शिरोडकर यांना होरपळून मारले गेले त्या ठिकाणी काळ्या धुराचे डाग दगडावर स्पष्टपणे दिसत आहेत. अन्य ठिकाणी आग लागली आहे पण धुराचे डाग दिसत नाहीत किंवा घटनेच्या ठिकाणी राखही दिसून येत नाही. यावरून मृतदेहावर एकतर रसायन ओतले होते किंवा पेट्रोल, डिझेल किंवा करोसिनचा वापर केला असवा असा संशय आहे. फॉरेन्सिक पथकाने हे शोधून काढण्याची मागणी शिरोडकर यांचे नातेवाईक करीत आहेत. कुयणामळ-काले या मुख्य रस्त्याच्या अवघ्या पाच मिटर अंतरावर ही घटना घडली आहे. रात्रौ ९.३० च्या सुमारास प्रेत सापडले तिथे आगीच्या ज्वाळा भडकत असल्याचे काहीजणांनी पाहिले होते असे सांगितले जात आहे. शिरोडकर कुटुंबियांच्या वाढत्या मागणीमुळे काल सांगे पोलिसांनी शांताराम यांच्या दोघा विवाहीत मुलींना डीएनए चाचणीसाठी गोमेकॉत पाठवले. अहवाल मिळेपर्यंत इतर पुरावे प्राप्त करण्यासाठी सांगे पोलीस शिकस्त करीत आहेत. जर संशयित खूनी मोकळेच राहिले तर आम्हालाही आमच्या काजू बागायतीत एकटेच फिरण्यास धोका आहे. काजू हंगामात पुन्हा अशा प्रकारची घटना घडू शकते, अशी भीती शांताराम शिरोडकर यांचे पुतणे बाबलो शिरोडकर यांनी व्यक्त केली आहे.

संपूर्ण सांगेवासियांचे आणि शिरोडकर कुटुंबियांचे या एकूण प्रकरणात पोलिसांच्या तपासाकडे लक्ष लागून आहे. त्यादृष्टीकोनातून सांगे पोलीस संशयितांच्या जबान्या नोंदवून घेत आहेत. या प्रकरणात पोलीस अधीक्षक अरविंद गावस, उपअधीक्षक उत्तम राऊत देसाई, पोलीस निरीक्षक सागर एकोस्कर, कुडचडेचे निरीक्षक रवींद्र देसाई तपास करीत असून लवकरच सत्य बाहेर पडणार असल्याचा दावा पोलिसांनी केला.