वाहन अपघातांत वर्षभरात ३०० बळी

0
86

राज्यात सरत्या वर्षात वाहन अपघातात आत्तापर्यंत तीनशेच्यावर लोकांचा मृत्यू झाला आहे. जानेवारी ते नोव्हेंबर २०१७ या काळात २९७ जणांचा मृत्यू झाला आहे.
नोव्हेंबर या एका महिन्यात तीस जणांचा वाहन अपघातात मृत्यू झाला आहे. सरत्या वर्षात १५ डिसेंबरपर्यंत २८६ फॅटल अपघातांची नोंद झाली आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ३० नोव्हेंबर २०१७ पर्यंत एकूण ३५०५ अपघातांची नोंद झाली आहे. यात नोव्हेंबरपर्यंत २९७ जणांचा मृत्यू झाला आहे. चालू डिसेंबर महिन्यात अनेकजण मृत्युमुखी पडले आहेत. त्यात दोन विदेशी नागरिकांचा समावेश आहे.

राज्यातील वाहन अपघातात अकरा महिन्यांत १७९ दुचाकी चालक, ३२ दुचाकीच्या मागे बसलेले, ४२ पादचारी, १९ वाहनचालक, १३ प्रवासी, ९ सायकल स्वार व इतर ३ जण मृत्युमुखी पडले आहेत. फक्त नोव्हेंबर महिन्यात १९ दुचाकी चालक, ५ दुचाकी स्वार, ४ पादचारी आणि २ चालकांचा मृत्यू झाला आहे.

बेशिस्त वाहतुकीमुळे अपघातांचे प्रमाण वाढलेले आहे. वाहतुकीत शिस्त आणण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहेत. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍यांविरोधात कारवाई केली जात आहे. पोलीस खात्याच्या एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी वाढत्या वाहन अपघातातील मृत्यूबाबत चिंता व्यक्त केली आहे. अपघाती मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने उपक्रम राबविण्याचा निर्णय जाहीर केला आहे. डिसेंबरच्या अखेरीस आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला बेशिस्त वाहतुकीमुळे अपघात होतात. वाहन चालकांनी शिस्तीचे पालन करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.