सांगेत २० कोटी खर्चून हस्तकला ग्राम

0
4

>> मुख्यमंत्री; १६ हजार चौरस मीटर जागेत प्रकल्प

सांगे येथे हस्तकला ग्राम उभारण्यात येणार असून, १६ हजार चौरस मीटर जागेत उभ्या राहणार्‍या या हस्तकला ग्रामवर २० कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून १० कोटी रुपयांचा निधी मिळणार असून, गोवा सरकार १० कोटी रुपये खर्च करणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल दिली.

पणजीतील इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा सभागृहात कुणबी हस्तकला पुनरुज्जीवित करण्यासंबंधीच्या एका कार्यक्रमाचा शुभारंभ केल्यानंतर ते बोलत होते. कुणबी हस्तकला पुनरुज्जीवित करण्याचा कार्यक्रम कुणबी हँडलूम्स ऑफ फार्मर्स प्रोड्युसर्स संघटनेने आयोजित केला होता.
या प्रकल्पासाठी नाबार्डने ५० लाख रुपये दिलेले असून, कोरगाव-सांगे येथे दोन हस्तकला केंद्रे उभारण्याची गोवा सरकारची योजना असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

सरकारी कार्यक्रमात सत्काराच्यावेळी १०० टक्के कुणबी शालचा वापर करणे बंधनकारक करून कुणबी शाल लोकप्रिय बनवावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला केले. कुणबी हस्तकलेसाठी उत्तर व दक्षिण गोव्यात प्रत्येकी ५०० महिलांना प्रशिक्षण देण्यात आले असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.