सहा तालुक्यांत पावसामुळे हाहाकार

0
9

>> सत्तरी, डिचोली, पेडणे, फोंडा, धारबांदोडा, केपे तालुक्यांत पूरस्थिती; घरे, बाजारपेठा, रस्ते जलमय; अनेक नद्यांना पूर

बुधवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे गुरुवारी सकाळी सत्तरी, डिचोली, पेडणे, फोंडा, धारबांदोडा, केपे या तालुक्यांत पूरस्थिती निर्माण झाली. रात्रभर अविश्रांत पाऊस बरसल्याने या सहा तालुक्यांतील अनेक घरे, दुकाने, बाजारपेठांमध्ये पाणी घुसले. त्यामुळे लोकांचे मोठे हाल व नुकसान झाले. तसेच पुराच्या पाण्यामुळे अनेक रस्ते आणि पूलही पाण्याखाली गेले. त्यामुळे वाहतूक ठप्प होऊन लोकांची गैरसोय झाली. म्हादई, वाळवंटी, रगाडा, शापोरा, साळ, दूधसागर, कडशी, कुशावती या नद्यांना पूर आला. राज्यात चोवीस तासांत तब्बल 5.33 इंच पावसाची नोंद झाली. दरम्यान, हवामान विभागाने 2 आणि 3 ऑगस्टसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

बुधवारी रात्रीपासूनच पावसाने राज्याच्या विविध भागांत जोर धरला होता. जोरदार पावसामुळे विविध भागांतील नद्या, नाले, ओहोळांना पूर येऊन त्याचे पाणी लगतची घरे, बाजारपेठा, दुकाने येथे घुसले. त्यामुळे नागरिक व दुकानदारांना मोठा फटका बसला. तसेच राज्यभरात अनेक ठिकाणी रस्त्यांवर पावसाचे पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले. म्हादई, कुशावती, दूधसागर, वाळवंटी आदी नद्यांतील पाण्याची पातळी वाढल्याने काही ठिकाणी घरांमध्ये पावसाचे पाणी घुसले.

राज्यात मागील चोवीस तासांत पेडणे, केपे, म्हापसा, फोंडा, साखळी, वाळपई, मडगाव, मुरगाव, सांगे, पणजी आदी भागात जोरदार पावसाची नोंद झाली. राज्यात आत्तापर्यंत एकूण 121.71 इंच पावसाची नोंद झाली असून, पावसाचे प्रमाण 55.1 टक्के जास्त आहे. चोवीस तासांत केपे येथे सर्वाधिक 7.87 इंच पावसाची नोंद झाली. म्हापसा येथे 4.53 इंच, पेडणे येथे 4.62 इंच, फोंडा येथे 5.51 इंच, पणजी येथे 4.78 इंच, जुने गोवे येथे 4.77 इंच, साखळी येथे 5.09 इंच, वाळपई येथे 6.87 इंच, काणकोण येथे 3.36 इंच, दाबोळी येथे 4.30 इंच, मुरगाव येथे 5.44 इंच, मडगाव येथे 5.35 इंच, सांगे येथे 6.55 इंच पावसाची नोंद झाली.

केपे तालुका

>> केपे तालुक्यातील कुशावती नदीला पूर आल्याने पारोडा, शिरवई या गावात पुराचे पाणी घुसले.
>> शिवनगर-शेल्डे येथे संरक्षक भिंत कोसळून घराचे नुकसान झाले.
>> पारोडा येथे पहाटेच्या सुमारास एक कारचालक पुराच्या पाण्यात अडकून पडला. नंतर कुडचडे अग्निशामक दलाने त्याची सुटका केली.
>> कुशावती नदीला आलेल्या पुरामुळे कुडचडे-जांबावली रस्ता पाण्याखाली गेला.