सहकार खाते ॲपद्वारे रोखणार थकित कर्जाचे प्रकार

0
8

>> मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती; ॲपद्वारे कर्जदाराचे किती बँकांत किती कर्ज याची विद्यमान स्थिती कळणार

सहकारी पतसंस्था व बँकांमध्ये कर्जे घेऊन नंतर ती बुडविणाऱ्या ठग मनोवृत्तीच्या लोकांवर नियंत्रण आणण्यासाठी सहकार खाते येत्या 31 मार्चपर्यंत अनोखा ॲप आणणार आहे. त्याद्वारे ठराविक व्यक्ती किती पतसंस्थांमध्ये कर्जदार आहे व त्याच्या कर्जाची विद्यमान स्थिती काय आहे, याची माहिती मिळणार आहे. त्यामुळे पतसंस्थांना अशा कर्जदारांबाबत सतर्कता बाळगण्यास मदत होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळी येथे काल दिली.

साखळी अर्बन सहकारी पतसंस्थेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सहकारमंत्री सुभाष शिरोडकर, साखळीच्या नगराध्यक्षा रश्मी देसाई, संस्थेचे अध्यक्ष अनिल काणेकर, उपाध्यक्ष दत्ताराम पोकळे, संचालक प्रदीप मळीक, प्रेमानंद चावडीकर, संजय देसाई, रामनाथ काणेकर, गीता शिरोडकर, श्रध्दा सुर्लकर, सरव्यवस्थापक कांचन पर्येकर आदींची उपस्थिती होती.
कर्ज बुडविणाऱ्या कर्जदारांविरोधात 138 कलमान्वये चालविण्यात येणाऱ्या खटल्याची कारवाई आता आणखी कठोर केली जाणार आहे. कारण अशा पतसंस्थांमधून कर्ज स्वरूपात देण्यात आलेले लोकांचे पैसे सहजासहजी कोणीही बुडवू शकत नाही. यासाठी 138 कलमान्वये कर्जदाराला अटक करून त्याच्याकडून वसुली करण्यासाठी सरकारचे गृहखातेही आता कठोर पावले उचलणार आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
साखळी अर्बनचे साखळी शहराच्या विकासात मोठे योगदान असून, अर्बनने अनेकांना गरजेच्या वेळी आर्थिक मदत केली आहे. याच विश्वासामुळे आज ही संस्था यशोशिखरावर पोहोचली आहे. या संस्थेने गरजवंतांना यापुढेही मदतीचा हात देताना अंत्योदय तत्वावर काम करावे, असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी दिला.

देशात प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने सहकार क्षेत्राला खात्याचे स्वरूप दिले आहे. यापूर्वी देशात सहकार खाते नव्हते. त्याची धुरा सांभाळत असलेल्या अमित शहा यांच्याकडून या खात्याला येणाऱ्या काळात खरोखरच चांगले दिवस येणार आहेत. सरकारचे या खात्याकडे गांभीर्याने लक्ष आहे. त्यासाठी या क्षेत्रातून जास्तीत जास्त समाजाला लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.

साखळी हा संपूर्ण राज्यातील एक आदर्श मतदारसंघ बनविण्यासाठी साखळीतील प्रत्येक व्यक्तीने झटायला हवे. साखळी अर्बनच्या सर्व संचालक व कर्मचाऱ्यांनी या संस्थेकडून शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचून त्यांना लाभ देण्याचे कार्य करावे. निस्वार्थ भावनेने केलेल्या कार्याचे फळ म्हणजे या संस्थेची स्वतःची नवीन इमारत आहे. या संस्थेचा आदर्श राज्यातील इतर संस्थांनी घेताना संस्थेबरोबरच समाज कशाप्रकारे प्रगती करणार याचा विचार करून काम करावे, असे आवाहन सहकारमंत्री सुभाष शिरोडकर यांनी यावेळी केले.
या सोहळ्यात मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते सुशांत पोकळे, दत्तगुरू जोशी, अनुप देसाई, योगेश दिवानी, प्रकाश शेट्ये यांचा गौरव करण्यात आला. फित कापून आणि समई प्रज्वलित करून, तसेच कोनशिला अनावरण करून या संस्थेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष अनिल काणेकर यांनी स्वागत केले. राधिका कामत सातोसकर यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष दत्ताराम पोकळे यांनी आभार मानले.