सलोख्याला सुरुंग

0
121

राज्यात प्रार्थनास्थळांची मोडतोड करण्याचे सत्र पुन्हा एकवार सुरू झाले आहे. यापूर्वीही अधूनमधून अत्यंत पद्धतशीरपणे रस्त्याकडेच्या अशा ठिकाणांची नासधूस करण्याचे प्रकार घडले होते आणि पोलीस तपासाला दिशा मिळताच गूढरीत्या एकाएकी बंदही झाले होते. आता पुन्हा एकवार या प्रकारांनी राज्यात डोके वर काढले आहे. विशेषत्वाने ख्रिस्ती समाजाच्या क्रॉसना प्राधान्याने लक्ष्य करण्यात आल्याचे दिसते. अशा वेळी काही घुमट्यांची, मूर्तींचीही नासधूस केली जाते. जणू काही दोन समाजांमध्ये परस्परांच्या प्रार्थनास्थळांची नासधूस करण्याचे सत्र सुरू झाले आहे असे चित्र निर्माण करण्याचा आणि त्याद्वारे धार्मिक ध्रुवीकरण घडवण्याचा हा प्रयत्न असतो. या सार्‍या प्रकाराचे स्वरूप पाहिल्यास एक गोष्ट सहज कळून चुकते ते म्हणजे या ज्या घटना राज्यात पुन्हा एकवार घडत आहेत वा यापूर्वी घडल्या होत्या, त्या एखाद्या माथेफिरू व्यक्तीचे कृत्य असू शकत नाहीत. एखादीच माथेफिरू व्यक्ती असे प्रकार करीत असती, तर ठराविक भागालाच तिने लक्ष्य केले असते, परंतु अशा घटना वेगवेगळ्या ठिकाणी आणि सातत्याने केल्या गेल्या आहेत. त्यामुळे यामागे एखादी संघटित शक्ती असावी अशी शक्यता अधिक वाटते. परिसराची पूर्ण पाहणी करून, प्रार्थनास्थळे आणि पोलिसांच्या गस्तीच्या वेळा टाळून ही नासधूस केली जाते. अर्थातच, त्यासाठी वाहनांचा वापरही होत असला पाहिजे. परंतु एवढ्या जय्यत तयारीनिशी ही मोडतोड, नासधूस आणि विद्रुपीकरण होत असूनही पोलिसांना त्यांचा पत्ता लागत नाही ही आश्चर्याची बाब आहे. गोव्याच्या एकूण गुप्तचर यंत्रणेबाबत काय बोलावे, पण आज सीसीटीव्ही ही तर आम बात झालेली आहे. गावोगावी विविध आस्थापनांमध्ये सीसीटीव्ही सर्रास असतात. किमान एटीएम, बँका, हॉटेले आदी ठिकाणी तर असतोच. समोरच्या परिसरावरही त्यातून नजर राहते. मग ज्या भागांत ही मोडतोड झाली, त्या परिसरातील प्रमुख नाक्यांवरची सीसीटीव्ही फुटेज तपासली तरीही या मोडतोडीमागे कोण असेल याचा अंदाज येऊ शकला असता, परंतु अद्याप तपासात प्रगती झालेली दिसत नाही. स्थानिक नागरिकांकडूनही संशयितांची माहिती मिळालेली नाही. म्हणजे एवढ्या शिताफीने आणि सगळ्या खबरदार्‍या घेऊन ही मोडतोड करणारे या कलेत बरेच पारंगत असावेत. या सगळ्याचा उद्देश काय आहे? अर्थात एकच उद्देश आहे तो म्हणजे गोव्याचा पारंपरिक सलोखा आणि सामाजिक शांतता यांना सुरूंग लागावा. त्याला अर्थातच राजकीय परिमाणही असू शकते, परंतु या मोडतोडीला धार्मिक वळण देण्याचा हा पद्धतशीर प्रयत्न आहे आणि गोमंतकीयांनी या चिथावणीला बळी पडता नये. विशेषतः सोशल मीडियावर यासंदर्भात चाललेल्या अपप्रचाराला खमकेपणाने उत्तर देण्याचे धैर्य दाखवले गेले पाहिजे. सोशल मीडियावरील अशा गोष्टी आंधळेपणाने ‘फॉरवर्ड’ करणे कायदेशीरदृष्ट्याही खूप महाग पडू शकते याचा विसर पडू नये. या ध्रुवीकरणातून आपली ईप्सिते साध्य होतात असे एकदा का या प्रकारांमागे असलेल्यांना कळले की मग अशा प्रकारांना अंतच राहणार नाही. माकडाच्या हाती कोलीत असावे तसे अलीकडे सोशल मीडियाचे झाले आहे. त्यामुळे अशा माध्यमांचा यासंदर्भात चिथावणीसाठी गैरवापर तर होत नाही ना यावर सरकारची नजर हवी. अशा घटनांबाबत जनतेने कसोशीने संयम बाळगणे आणि आपला क्षोभ आवरणे अत्यंत गरजेचे आहे. गोव्याच्या भावूक समाजमानसाचा आजवर खूप अंत पाहिला गेला. आता यामागे कोण आहे त्याचा छडा लावण्याची वेळ आली आहे. शांत, सुंदर गोव्यामध्ये विद्वेषाची ही विषवल्ली रुजवू पाहणार्‍यांसंदर्भात सरकारने कठोर व्हावेच लागेल.