सर्व खात्यांच्या सेवा ऑनलाइन करण्यावर भर

0
18

>> मुख्यमंत्री डॉ. सावंत यांची माहिती; पाणी बिले भरण्यासाठी बीबीपीएस सेवेचे उद्घाटन

राज्यातील नागरिकांना चांगली प्रशासकीय सेवा देण्यासाठी सर्व खात्यांच्या सेवा ऑनलाइन पद्धतीने सुरू करण्यावर भर दिला जाणार आहे. सरकारी कार्यालयात नागरिकांना आपल्या कामांसाठी तासन्‌तास रांगेत उभे राहायला लागता कामा नये, हा त्यामागील उद्देश आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

टीजेएसबी सहकारी बँकेकडून एनपीसीआयच्या बीबीपीएस (भारत बिल पेमेंट) प्रणाली मार्फत पाणी बिले भरण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे, त्या सेवेचे उद्घाटन केल्यानंतर मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी बांधकाम मंत्री नीलेश काब्राल, मुख्य सचिव पुनित कुमार गोयल, सार्वजनिक बांधकाम खात्याचे प्रधान मुख्य अभियंता उत्तम पार्सेकर, बांधकाम खात्याचे मुख्य अभियंता संतोष म्हापणे, टीजेएसबी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील साठे, मुख्य व्यवस्थापक सुब्बलक्ष्मी शिराली, बँकेचे गोवा राज्य विभाग प्रमुख अरुण भट यांची उपस्थिती होती.

राज्यातील सुमारे १.३ लाख नळ कनेक्शनधारकांना राज्य सरकारच्या १६ हजार लीटर मोफत पाणी योजनाचा लाभ मिळवून दिला जात आहे. या मोफत पाणी योजनेमध्ये नव्याने आवश्यक सुधारणा करण्यात आल्याने आणखीन नळ जोडणीधारकांना या योजनेचा लाभ मिळेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
राज्य सरकारने मोफत पाणीपुरवठा योजना बंद केलेली नाही. पाणी वाचवा आणि पाणी मोफत मिळवा या योजनेखाली आत्तापर्यत १.३ लाख जोडणीधारकांना लाभ मिळवून दिला जात आहे.

बांधकाम मंत्री नीलेश काब्राल यांनी मोफत पाणी योजना आणखीन सुटसुटीत करण्याचा प्रयत्न केला आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

पाणीपुरवठा खात्याच्या पाणी बिले स्वीकारण्याच्या पद्धतीत आमूलाग्र बदल घडवून आणला जात आहे. नळ जोडणीधारकांना दर महिन्याला बिल दिले जाणार आहे. पाणीपुरवठा विभागाकडून डिमांड ड्राफ्ट, चेकच्या माध्यमातून पेमेंट स्वीकारणे बंद केले जाणार आहे. ऑनलाइन पद्धतीने पेमेंट स्वीकारण्याची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. तसेच, नागरिकांच्या तक्रारीसाठी ऑनलाइन सुविधाही उपलब्ध केली जाणार आहे, असे मंत्री नीलेश काब्राल यांनी सांगितले.