‘झुआरी’ स्फोट प्रकरणी सुपरवायझरला अटक

0
15

>> निष्काळजीपणाचा ठपका ठेवत पोलिसांची कारवाई; अधिकार्‍यांविरुद्ध गुन्हा नोंद

झुआरीनगर येथील झुआरी ऍग्रो केमिकल्स लिमिटेड या कंपनीत झालेल्या भीषण स्फोटात तीन कंत्राटी कामगारांच्या मृत्यू प्रकरणी बोकारो इंडस्ट्रीयल वर्क्स या कंत्राटदार कंपनीच्या साईट सुपरवायझरला पोलिसांनी काल अटक केली. निष्काळजीपणाचा ठपका ठेवून ३०४ (ए), ३३६ कलमाखाली सुपरवायझर ए. प्रधान याला अटक करण्यात आली. तसेच बोकारो इंडस्ट्रीयल वर्क्स या कंत्राटदार कंपनीच्या व झुआरी ऍग्रो केमिकल्स लिमिटेड या कंपनीच्या संबंधित अधिकार्‍यांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

एका टाकीचा बोल्ट काढण्यासाठी हॉट गॅस कटरचा वापर केल्याने टाकीमध्ये तयार झालेल्या गॅसमुळे भीषण स्फोट होऊन तीन कंत्राटी कामगारांचा मृत्यू झाला होता. ही दुर्घटना मंगळवारी घडली होती. त्यात इंद्रजीत घोष (४०, मूळ पश्चिम बंगाल), रंजन चौधरी (२८, मूळ बिहार), अवकाश करण सिंग (३२ पंजाब) या तिघांचा मृत्यू झाला होता.

ज्वालाग्राही रसायनांचा वापर ज्या ठिकाणी होतो, त्या ठिकाणी धातू कापण्यासाठी हॉट गॅस कटरचा वापर केला जात नाही. त्यासाठी कोल्ड गॅस कटर वापरले जाते. त्यातून स्पार्किंग होऊन आगीच्या ठिणग्या उडत नाहीत. म्हणूनच अशा धोकादायक ठिकाणी ‘कोल्ड गॅस कटिंग’ सर्वांत सुरक्षित मानली जाते. टाकीचा वरचा भाग संपूर्णपणे बंद केलेला असतो. त्यामुळे तेथील बोल्ट काढण्यासाठी कामगारांनी हॉट गॅस कटर वापरला. परिणामी टाकीमध्ये गॅस तयार होऊन त्याचा भीषण स्फोट झाला. यात तिन्ही कामगार उसळून टाकीपासून सुमारे ३० मीटर अंतरावर जमिनीवर आपटून जखमी झाले होते. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला होता. या कामगारांनी बोल्ट काढण्यासाठी कोल्ड गॅस कटरचा वापर केला असता तर प्राण वाचला असता. तसेच सेफ्टी बेल्टचा वापर केला असता तरी त्यांचे प्राण वाचले असते, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

दरम्यान, मृत कामगारांचे कुटुंबीय गुरुवारी गोव्यात पोचणार असून, शवचिकित्सेनंतर मृतदेह त्यांच्या कुटुंबाच्या ताब्यात देणार असल्याचे पोलीस निरीक्षक डायगो ग्रेसियस यांनी सांगितले. तिन्ही कामगारांचे मृतदेह सध्या मडगाव हॉस्पिसिओ इस्पितळात ठेवण्यात आले आहेत.

या घटनेत ज्या तीन कामगाराचा मृत्यू झाला, त्यांच्या कुटुंबीयांना कंपनी व कंत्राटदाराने योग्य तो मोबदला द्यावा, अशी मागणी साकवाळचे सरपंच गिरीश पिल्ले यांनी केली आहे.