सर्वोच्च न्यायालयाची फटाके आतषबाजीला सशर्त परवानगी

0
206

नवी दिल्ली
दिवाळी उत्सव नजीक असल्याच्या पार्श्‍वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने काल फटाक्यांच्या विक्री-आतषबाजीला सशर्त परवानगी दिली. त्याचबरोबर फटाक्यांची ऑनलाईन विक्री करता येणार नसल्याचेही न्यायालयाने आदेशात स्पष्ट केले आहे. फटाके आतषबाजीसाठी न्यायालयाने वेळेचे बंधन ठेवले आहे. त्यानुसार दिवाळीत रात्री ८ ते १० वाजेपर्यंतच आतषबाजीची मुभा राहील. नाताळ व नववर्षाला रात्री ११.४५ ते १२.३० या वेळेत आतषबाजी करता येणार.
फटाके विक्रीविषयी अंशतः घालण्यात आलेली बंदी ही संपूर्ण देशासाठी लागू असून पर्यावरण रक्षणासाठी या आदेशांचे नागरिकांनी पालन करावे असे न्या. ए. के. सिक्री व न्या. अशोक भूषण यांच्या खंडपीठाने आदेशात नमूद केले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने देशभरात फटाके विक्रीवर बंदी घालण्यास नकार देतानाच कमी प्रदूषण करणार्‍या फटाक्यांचीच विक्री करावी, असे निर्देश दिले आहेत. ऑनलाईन फटाके विक्रीवर बंद आदेशामुळे ऍमेझॉन, फ्लिपकार्ट यासारख्या ई-कॉमर्स पोर्टलवरून सदर कंपन्यांना फटाके विक्री करता येणार नाही.
न्यायालयाने मोठे फटाके व फटाक्यांच्या माळा यांच्यावरही बंदी घातली आहे. विशिष्ट सुरक्षित ठिकाणी निर्धारीत वेळेतच फटाके उडवण्याचाही उल्लेख आदेशात केला आहे.
आतषबाजीसाठी अटी
दिवाळी सण ः रात्री ८ ते १० पर्यंत
नाताळ व नववर्ष ः रात्री ११.४५ ते १२.३०
अधिक ध्वनी प्रदुषण करणार्‍या व फटाक्यांच्या माळांवर बंदी