सर्वांचे लक्ष आता मगोच्या भूमिकेकडे

0
7

>> मगोचा पाठिंबा मिळवण्यासाठी भाजप आणि कॉंग्रेसमध्ये रस्सीखेच; सुदिन ढवळीकर यांनी घेतली पी. चिदंबरम यांची भेट

मतदानोत्तर चाचण्यांतून राज्यात कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळणार नाही, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेची स्वप्ने पाहणार्‍या भाजप आणि कॉंग्रेसने आतापासूनच किंगमेकरची भूमिका बजावण्याची शक्यता असलेल्या मगोला आपल्या बाजूने ओढण्याचा प्रयत्न चालवला आहे. मगोच्या पाठिंब्यासाठी केंद्रीय नेते चर्चा करतील, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे. दुसरीकडे कॉंग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी पक्षाला बहुमत मिळाले तरी मगोला सोबत घेणार असे म्हटले आहे. या सार्‍या घडामोडींमध्ये मगोच्या नेत्यांनी आपली भूमिका पूर्णपणे स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे मगोच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

मतदानोत्तर चाचण्यांतून राज्यात भाजप आणि कॉंग्रेसला जवळपास समसमान जागाच मिळतील. तसेच त्रिशंकू परिस्थिती निर्माण होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे मगो किंगमेकरच्या भूमिकेत असणार आहे. या पार्श्‍वभूमीवर काल मगो नेते सुदिन ढवळीकर यांनी कॉंग्रेस नेते पी. चिदंबरम यांची पणजीत भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यात कोणालाच बहुमत मिळणार नाही. कॉंग्रेस असो किंवा भाजप यापैकी कोणालाही राज्यात सरकार स्थापन करायचे झाल्यास मगोची गरज भासणार आहे. त्यामुळे जो पक्ष मगो वाढवण्यासाठी आम्हाला मदत करेल, त्या पक्षालाच आम्ही पाठिंबा देऊ, असे सुदिन ढवळीकर यांनी सांगितले.

कॉंग्रेस पक्षासोबत देखील आपली चर्चा सुरू असल्याची माहिती ढवळीकर यांनी दिली. मगो पक्ष ६ ते ९ जागा जिंकेल, तर तृणमूल कॉंग्रेसला ३ ते ४ जागा मिळू शकतात, असा अंदाजही त्यांनी वर्तवला.
निवडणूक निकालानंतर कुणाबरोबर युती करायची याचा निर्णय मगो व तृणमूल कॉंग्रेस एकत्र मिळून घेणार आहे. मगो पक्षाच्या वाढीला पोषक ठरू शकेल अशाच पक्षाला मगो पाठिंबा देईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. १९८४ सालापासून मगो राज्यात किंगमेकरची भूमिका बजावत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

मगोने घेतली उमेदवारांची बैठक
उद्या मतमोजणी होणार असल्याच्या पार्श्‍वभूमीवर मगोने पुढील रणनीती ठरवण्यासाठी काल पक्षाच्या उमेदवारांची बैठक घेऊन चर्चा केली.

तृणमूलच्या योजना लागू करणार्‍या
पक्षाला सरकार स्थापनेसाठी पाठिंबा

निकालाच्या पार्श्‍वभूमीवर काल तृणमूल कॉंग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यांचे काल राज्यात आगमन झाले. तसेच निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर हेही दाखल झाले आहेत. तृणमूलने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यातून ज्या तीन योजनांची घोषणा केली होती, त्या योजना जो पक्ष सरकार स्थापनेसाठी मगो-तृणमूलची मदत घेईल, त्यांना लागू कराव्या लागतील, असे तृणमूलच्या नेत्यांनी स्पष्ट केले आहे.

डॉ. सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकारला पाठिंबा नाही

भाजप डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करणार असेल, तर आपला त्यांच्या सरकारला पाठिंबा नसेल. सावंत यांनी आपणाला मंत्रिमंडळातून काढून टाकले होते. तसेच मगोच्या आमदारांना फोडले होते. त्यामुळे आपण कोणत्याही परिस्थितीत त्यांना मुख्यमंत्री होण्यासाठी पाठिंबा देणार नाही, असे सुदिन ढवळीकर म्हणाले. मात्र भाजपने मगोला चर्चेसाठी बोलावले, तर आपण जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मगोने कॉंग्रेसला पाठिंबा देण्याबाबत आश्‍वस्त केले आहे. कॉंग्रेसला बहुमत मिळेल; परंतु बहुमत मिळाले तरी भाजप सोडून अन्य पक्षांना आम्ही सोबत घेऊ. निवडणूक निकालानंतरच्या युतीसाठी मगो, तृणमूल व आपसाठी कॉंग्रेसचे द्वार खुले आहे.

  • पी. चिदंबरम, ज्येष्ठ कॉंग्रेस नेते.

गरज भासल्यास मगोची मदत घेणार

पंतप्रधान मोदींसोबतच्या भेटीवेळी मुख्यमंत्र्यांकडून स्पष्ट

विधानसभा निवडणूक निकालाच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांच्याशी सरकार स्थापनेबाबत चर्चा केली. राज्यात भाजपचेच सरकार सत्तेवर येईल, असा विश्‍वासही मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांशी बोलताना व्यक्त केला. तसेच गरज पडलीच, तर राज्यातील प्रादेशिक पक्ष असलेल्या मगोची सरकार स्थापनेसाठी मदत घेतली जाईल, असेही डॉ. सावंत यांनी पंतप्रधानांसमोर स्पष्ट केले. दरम्यान, काल मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री अमित शहा व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचीही भेट घेतली.

पंतप्रधानांसोबत झालेल्या चर्चेविषयी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, मंगळवारी दिल्लीत निवडणूक निकाल व सरकार स्थापनेविषयी पंतप्रधानांशी चर्चा झाली. भाजपला बहुमत प्राप्त होणार असून, भाजपच राज्यात पुन्हा सत्तेवर येईल, असा आपणाला विश्‍वास आहे. आणि हा विश्‍वास आपण पंतप्रधानांशी बोलताना व्यक्त केला.

नेतृत्व आपल्याकडेच
पक्षाने पुन्हा एकदा नेतृत्व आपल्याकडेच सोपवण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे निवडणूक निकालानंतर पक्ष पुन्हा एकदा आपणाला राज्यात मुख्यमंत्री म्हणून नेतृत्व करण्याची संधी देईल, असा विश्‍वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

मतदानोत्तर चाचण्यांबाबत चर्चा
गोवा विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली नव्हती. त्यामुळे मंगळवारी त्यांची भेट घेऊन निवडणुकीविषयीची सगळी माहिती त्यांना दिली. मंगळवारी वेगवेगळ्या वाहिन्या व संस्थांचे मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज माध्यमांद्वारे प्रसिद्ध झालेले असून, त्याबाबतही पंतप्रधानांशी चर्चा केली, असेही डॉ. सावंत यांनी सांगितले. दरम्यान, मतदानोत्तर चाचण्यांमध्ये भाजप व कॉंग्रेस या दोन्ही पक्षांना जवळपास १४ ते १६ एवढ्या जागा मिळणार आहे, तरी देखील डॉ. सावंत यांनी पुन्हा एकदा आपलेच सरकार सत्तेवर येणार असल्याचा विश्‍वास व्यक्त केला.

केंद्रातील नेते मगोशी चर्चा करणार : डॉ. सावंत

मगोकडून पाठिंबा मिळवण्यासाठी केंद्रातील नेते मगोच्या नेत्यांशी संपर्क साधून त्याबाबत त्यांच्याशी चर्चा करतील. आम्ही सरकार स्थापनेसाठी गरज पडल्यास अपक्ष व प्रादेशिक पक्ष अशा सगळ्यांचाच पाठिंबा घेऊ, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल स्पष्ट केले.