सर्वांगीण विकासासाठी भाजपला साथ द्या

0
30

>> केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आवाहन

>> फोंड्यात भाजप कार्यकर्ता सभा

भारतीय जनता पक्ष सरकारच्या माध्यमातून गोव्याचा विकास झाला आहे. आता समृद्धीकडे वाटचाल करताना ‘सुवर्ण गोवा’ ही संकल्पना साकारण्यासाठी भाजपला सहकार्य करा. गोव्याच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपला साथ द्या असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी फोंड्यात काल केले. काल रविवारी फोंडा येथे कार्यकर्ता सभा आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते.
या सभेच्यावेळी व्यासपीठावर भाजपचे फोंड्यातील उमेदवार रवी नाईक, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, किशन रेड्डी तसेच भाजप मंडळ अध्यक्ष विश्वनाथ दळवी आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना केंद्रीय गृहमंत्री श्री शहा यांनी, गोव्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेहमीच स्नेहाचे संबंध राहिले आहेत. त्यामुळेच गोव्याच्या विकासासाठी मोदी सरकारने अंदाजपत्रकात तब्बल २५६७ कोटी रुपये मंजूर केले. कॉंग्रेस सरकारच्या काळात मात्र हीच रक्क फक्त ४३२ कोटी होती. गोव्यातील कृषी उद्योग रोजगाराला चालना मिळावी, तंत्रज्ञान आणि आयटी क्षेत्रात विकास व्हावा हाच उद्देश भाजपच्या केंद्र सरकारने ठेवला आणि पूर्ण केला असल्याचे सांगितले. यावेळी विरोधकांवर जोरदार टीका करताना श्री. शहा यांनी, इतर राजकीय पक्षांना गोवा म्हणजे पर्यटनाची जागा वाटत असते. कॉंग्रेस, तृणमूल, आप या विरोध पक्षांनी जनतेला केवळ फसवी आश्वासने दिली आहेत. हे पक्ष सतेवर येणारच नाहीत. त्यामुळे त्यांनी दिलेल्या आश्वासनपूर्तीचा प्रश्नच उपस्थित होत नाही असे सांगून शहा यांनी, भाजप जे बोलतो ते करून दाखवतो असा दावा केला. गोव्यात डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकार पुन्हा आणण्यासाठी रवी नाईक यांना बहुमतांनी निवडून आणा असे आवाहन केले.
मुखमंत्री डॉ. सावंत यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारमुळेच गोव्याचा विकास झाला असून यावेळेलाही पंतप्रधानांचे हात बळकट करूया असे प्रतिपादन केले.
उमेदवार रवी नाईक यांनी यावेळेला फोंड्यात कमळ फुलेल असा विश्वास व्यक्त केला.

वास्कोत पत्रकारांना प्रवेेश नाकारला

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वास्कोतील सभेत स्थानिक पत्रकारांना डावलण्यात आले. केंद्रीय मंत्री अमित शहा काल दुपारी फोंडा व नंतर संध्याकाळी सावर्डे मतदारसंघात दौरा करून रात्री ८ वाजता वास्कोच्या रेल्वे कम्युनिटी सभागृहात सभेसाठी आले. यावेळी मोजक्याच भाजप कार्यकर्त्यांना पास देण्यात आले होते. यामुळे अनेक कार्यकर्ते बाहेर ताटकळत होते. या सभेला स्थानिक पत्रकार आले असता त्यांना प्रवेशद्वाराजवळच पोलिसांकडून अटकाव करण्यात आला. नगरसेवक गिरीश बोरकर यांना याबाबत विचारले असता त्यांनी स्थानिक पत्रकारांना आमंत्रण नसल्याचे सांगितले.

पोस्टर हटवले
मुरगांव तालुका भरारी पथकाकडून अमित शहा यांचे पोस्टर हटवण्यात आले. रेल्वे उड्डाण पुलाजवळ तसेच इतर ठिकाणी मंत्री शहा यांचे फलक लावण्यात आले होते. मात्र भरारी पथकाने सदर होर्डिंग्ज हटवले.