सर्वपक्षीय पाठिंब्यासाठी गोवा फॉरवर्डचे प्रयत्न

0
89

>> जॅक सिक्वेरांच्या पुतळ्याचा प्रश्‍न

जनमत कौलाचे एक नेते जॅक सिक्वेरा यांचा पुतळा विधानसभा संकुलात बसवण्यात यावा, या गोवा फॉरवर्ड पक्षाच्या मागणी संदर्भात सर्व पक्षांचे मंत्री व आमदार यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी गोवा फॉरवर्ड पक्षाचे प्रमुख व मंत्री विजय सरदेसाई यांच्यासह पक्षाचे तिन्ही मंत्री पाठिंब्यासाठी चर्चा करणार असल्याचे पक्षाचे प्रमुख प्रवक्ते ट्रॉजन डिमेलो यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले. मडगाव येथे झालेल्या पक्षाच्या बैठकीत तसा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आमचे तिन्ही मंत्री वरील मागणी संदर्भात एकमत व्हावे यासाठी भाजपचे मंत्री व आमदार, मगो पक्षाचे मंत्री व आमदार तसेच अपक्ष आमदारांची भेट घेऊन त्यांच्याशी वरील प्रश्‍नी चर्चा करणार असल्याचे डिमेलो म्हणाले. तिन्ही मंत्री सर्व ३७ आमदार-मंत्र्यांची भेट घेऊन त्यांना जॅक सिक्वेरा यांचा पुतळा विधानसभा संकुलात का हवा आहे हे सांगून त्यांचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे डिमेलो यांनी स्पष्ट केले.

गोवा विधानसभा संकुलात जॅक सिक्वेरा यांचा पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणी करणारा खासगी ठराव भाजपचे आमदार व उपसभापती मायकल लोबो हे गोवा विधानसभेच्या येत्या अधिवेशनात मांडणार असल्याचे डिमेलो म्हणाले. हा ठराव संमत व्हावा यासाठी गोवा फॉरवर्ड पक्ष सर्व ते प्रयत्न करणार आहेत. दरम्यान, म्हादईबाबत कोणतीही तडजोड करायची नाही असा निर्णयही पक्षाच्या बैठकीत घेण्यात आल्याचे डिमेलो म्हणाले. कर्नाटकने म्हादईचे पाणी वळवण्याचा प्रयत्न केले तर ते हाणून पाडण्यासाठी पक्ष आपल्यापरीने सर्व ते प्रयत्न करणार तसेच सरकारलाही त्याबाबत कोणतीही तडजोड न करण्याची सूचना करणार आहे. पक्षाचे नेते व जल संसाधन मंत्री विनोद पालयेकर यांनी बैठकीत आपण म्हादईप्रश्‍नी कोणतीही तडजोड करणार नाही व कर्नाटकला म्हादईचे पाणी वळवू देणार नसल्याचे स्पष्ट केल्याचे डिमेलो यांनी यावेळी सांगितले. विजय सरदेसाई यांचे ओएसडी दिलीप प्रभुदेसाई व विनोद पालयेकर यांचे ओएसडी दुर्गादास कामत यांना पदावरून मुक्त करण्यात आले असून त्यांच्यावर पक्ष कार्याची जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे ते म्हणाले.