अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारच्या पत्रकार परिषदेमध्ये इराणला येत्या 48 तासांत समझोता करणार नसाल तर तुमचे सर्वच्या सर्व वीजप्रकल्प आणि पूल उडवून देऊ अशी जाहीर धमकी दिली आहे. ट्रम्प यांच्या आजवरच्या अशा धमक्या, नंतरचे घूमजाव, अचानक जाहीर केलेला युद्धविराम, पुन्हा त्यात दिलेली मुदतवाढ आणि आता ही पुन्हा निर्वाणीची धमकी हे सगळे त्यांच्या सध्याच्या वैफल्यग्रस्त स्थितीचेच निदर्शक आहे. युद्धातून लवकरात लवकर बाहेर तर पडायचे आहे, परंतु त्यासाठी निमित्त सापडत नाही, अशी सध्या अमेरिकेची स्थिती बनली आहे. त्यामुळे बाहेर पडताना इराणचे अपरिमित नुकसान करून त्यांची लढण्याची ताकद संपुष्टात आणल्याचा आणि त्यातून आपणच हे युद्ध जिंकल्याचा आभास ट्रम्प यांना निर्माण करायचा आहे. इराणच्या हवाई हद्दीवर आता आमचे संपूर्ण नियंत्रण आहे अशी शेखी ट्रम्प यांनी गेल्या महिन्यात मिरवली होती, परंतु नुकतीच त्यांची कोट्यवधी डॉलरची अत्याधुनिक लढाऊ विमाने इराणने धुळीस मिळवली. त्यातील वैमानिकाचा शोध घेऊन त्याला माघारी आणण्यासाठी अमेरिकेला अत्यंत जिकिरीची मोहीम राबवावी लागली. ह्या मोहिमेचा उघड झालेला तपशील पाहिला तर जवळजवळ 176 विमानांना त्यात सहभागी करून घेणे भाग पडल्याचे दिसते. बॉम्बफेकी विमाने, लढाऊ विमाने, हवेतल्या हवेत विमानांत तेल भरणारी विमाने, हेलिकॉप्टरे, द्रोन असा सगळा जामानिमा वापरून आणि इराणला चकवा देत शेवटी ह्या वैमानिकाला सुरक्षित परत आणल्याच्या फुशारक्या मारण्यासाठी ट्रम्प यांनी ही पत्रकार परिषद घेतली. तेथे ह्या आपल्या मोहिमेचे त्यांनी आणि पीट हेगसेथ वगैरेंनी काय गोडवे गायिले. युद्ध लांबत चालल्याने अस्वस्थ असलेल्या अमेरिकी जनतेला गुड फ्रायडे आणि ईस्टरच्या सणासुदीच्या दिवसांत वैमानिकाला सुरक्षित परत आणल्याची गोड बातमी देण्यासाठी हा आटापिटा होता. मात्र, ट्रम्प यांच्या तोंडची भाषा अत्यंत उद्दामपणाची आणि अत्यंत असभ्य तर आहेच, शिवाय ती आता अश्लीलतेकडेही झुकू लागली आहे. एखाद्या राष्ट्रप्रमुखाच्या तोंडी शोभणारी तर ती नक्कीच नव्हे. स्वतः एखादा काऊबॉय असल्यागत ट्रम्प वागत – बोलत आहेत. इराणची आण्विक क्षमता नष्ट करून तेथे सत्तापालट घडवण्यापुरते मर्यादित उद्दिष्ट जर अमेरिकेने समोर ठेवले होते, तर आता सर्वच्या सर्व पूल आणि वीज प्रकल्प उद्ध्वस्त करून इराणच्या सर्वसामान्य जनतेला अंधारात लोटण्याचे कारणच काय? इराणच्या खर्ग बेटावरील तेलावर आणि अणुप्रकल्पांतील विकसित युरेनियमवर अमेरिकेचा डोळा आहे. त्यामुळे खर्ग बेटावर हल्ले चढवून ते ताब्यात घेण्याचा प्रयत्न अमेरिका करू पाहील. होर्मुझच्या सामुद्रधुनीतील तेलवाहतुकीत इराणने आणलेली बाधा हे केवळ निमित्त आहे, कारण ह्या सामुद्रधुनीतील तेलवाहतुकीशी अमेरिकेचा काही संबंध येत नाही. इस्रायल वगळता ज्या देशांचा संबंध येतो, त्यांना इराणने तेलवाहतुकीस परवानगी दिलेली आहे. अमेरिकेचे मित्रदेशही तिच्या समवेत युद्धात उतरायला तयार नाहीत. ‘नाटो’ ने देखील वेगळी वाट पत्करली आहे. त्यामुळे ‘नाटो’ला कागदी वाघ म्हणून हिणवण्यासही ट्रम्प यांनी मागेपुढे पाहिले नाही. पाकिस्तानच्या माध्यमातून जे काही समझोत्याचे प्रयत्न चालले होते, ते पूर्णत्वास गेले नाहीत. इराणने अमेरिकेचा एकतर्फी युद्धविरामाचा प्रस्ताव फेटाळून लावला आणि आपल्या अटी पुढे केल्या होत्या. आता इराणने पुन्हा आपल्या ृदहा अटी समोर ठेवल्या आहेत. त्यामध्ये युद्ध कायमचे थांबवावे, सर्व निर्बंध अमेरिकेने हटवावेत, हिज्बुल्ला, हौथी आदी आपल्या समर्थक गटांना अभय द्यावे, त्यांच्यावरील हल्ले बंद करावेत अशा मागण्या पुढे केल्या आहेत. त्याच्या बदल्यात होर्मुझची सामुद्रधुनी सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी खुली करू, त्यावर वीस लाख डॉलरचे शुल्क आकारण्यास आपल्याला परवानगी मिळावी म्हणजे त्या पैशातून आम्ही आमच्या देशाची पुनर्बांधणी करू, ह्या शुल्काचा वाटा शेजारच्या ओमानलाही देऊ असा प्रस्ताव इराणने दिला आहे. ह्याला सकारात्मक प्रतिसाद देत काही सुवर्णमध्य काढायचा की युद्धोन्मादात इराणच्या समूळ विद्ध्वंसाची आपली प्रतिज्ञा खरी करायची हे ट्रम्प यांनी ठरवायचे आहे. ज्या उद्दिष्टांना पुढे करून हे युद्ध लादले गेले, ती बाजूलाच राहिली आहेत. आम जनतेच्या रोजच्या जगण्याला दुष्कर करणारा सर्वतोपरी विनाश घडवून हाती काय लागणार आहे हा खरा प्रश्न आहे. दिवसेंदिवस चिघळत चाललेला हा संघर्ष अवघ्या जगासमोर इंधनसंकट उभे करण्याआधीच संपुष्टात यावा ह्यासाठी ह्या सगळ्या वेडाचारावर नियंत्रण आणण्यासाठी आंतरराष्ट्रीय जगताने पुढे होण्याची वेळ नक्कीच आली आहे.