उपजिल्हाधिकाऱ्यांकडून सुनावणी; अंतिम निर्णयाकडे सर्वांचे लक्ष
डिचोली पालिका क्षेत्रातील प्रभाग रचनेवरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर उपजिल्हाधिकारी शुभम नाईक यांनी नागरिकांच्या हरकती ऐकून घेतल्या. पालिका क्षेत्रात 14 प्रभागांची रचना जाहीर झाल्यानंतर अनेक नागरिकांनी या प्रक्रियेवर आक्षेप नोंदवत लेखी हरकती उपजिल्हाधिकारी कार्यालयात सादर केल्या होत्या. निर्धारित सात दिवसांची मुदत संपल्यानंतर संबंधित अर्जदारांना स्वतंत्रपणे बोलावून त्यांचे म्हणणे सविस्तरपणे समजून घेण्यात आले.
एकूण नऊ प्रभागांमधून नागरिकांनी सूचना, तक्रारी व दुरुस्तीच्या मागण्या मांडल्या.प्रभाग रचनेदरम्यान काही ठिकाणी मतदार याद्यांमध्ये विसंगती आढळल्याचा आरोप नागरिकांनी केला. काही भागांतील मतदार वेगवेगळ्या प्रभागांत समाविष्ट केल्याने संभ्रम निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच काही ठिकाणी एका प्रभागाचे दोन भाग केल्याने एकाच क्षेत्रात दोन नगरसेवकांसाठी मतदानाची परिस्थिती निर्माण झाल्याची तक्रारही करण्यात
आली.
या सर्व मुद्द्यांवर उपजिल्हाधिकारी शुभम नाईक यांनी अर्जदारांचे म्हणणे काळजीपूर्वक ऐकून घेतले असून आवश्यक ते बदल करण्याबाबत विचार केला जाईल, असे संकेत मिळत आहेत. मात्र अंतिम निर्णयाबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने नागरिकांचे लक्ष या प्रक्रियेकडे लागले आहे.
दरम्यान, काही नागरिकांनी मागण्या मान्य न झाल्यास न्यायालयात जाण्याची तयारी दर्शवली आहे. या संदर्भात आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी सांगितले की, नागरिकांना हरकती नोंदवण्याची संधी देण्यात आली असून सर्व बाजू विचारात घेऊन अंतिम निर्णय निवडणूक आयोगाकडून घेतला जाईल.
पूर्वी प्रभाग रचना नगरनियोजन विभागामार्फत केली जात होती. मात्र यंदा ही प्रक्रिया निवडणूक विभागाकडून राबवण्यात आल्याने भौगोलिक समतोल राखण्याचा प्रयत्न झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. तरीही अनेक ठिकाणी रचनेबाबत तक्रारी समोर आल्याने या सुनावणीला विशेष महत्त्व प्राप्त झाले
आहे. आता उपजिल्हाधिकारी स्तरावरील निर्णयानंतर प्रभाग रचनेत नेमके कोणते बदल होतात, यावर आगामी निवडणुकांचे चित्र अवलंबून राहणार आहे.