सरकार पाडण्याचा विचार नाही : सरदेसाई

0
111

>> पर्रीकर सरकार कोसळणार असल्याच्या अफवांना पूर्णविराम

गोवा फॉरवर्ड पक्षाचा मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार पाडण्याचा कोणताही विचार नसल्याचे गोवा फॉरवर्ड पक्षाचे सर्वेसर्वा तथा नगर नियोजनमंत्री विजय सरदेसाई यांनी काल विदेश दौर्‍यावरून परतल्यानंतर मडगाव येथे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. त्यांच्या या स्पष्टीकरणामुळे गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री पर्रीकर अमेरिका दौर्‍यावर गेल्यापासून सरकार कोसळणार असल्याच्या पसरलेल्या अफवांना पूर्णविराम मिळाला आहे.
काल विदेश दौरा आटोपून परतल्यानंतर मडगाव येथे मंत्री विजय सरदेसाई पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, कॉंग्रेस केवळ प्रसिद्धीसाठी सरकार पाडणार असल्याच्या अफवा पसरवीत आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान कॉंग्रेसने गोवा फॉरवर्ड पक्षापासून दूर राहणे पसंत केले होते. त्यामुळे गोवा फॉरवर्डने भाजपबरोबर आघाडी सरकार स्थापन केले असून ते पाडण्यात आम्हांला मुळीच रस नाही. पर्रीकर सरकार पाडण्यासाठी कोणतेही कारण नसल्याचे ते म्हणाले.
कॉंग्रेस आणखी कुणाच्या मदतीने सरकार पाडण्याच्या तयारीत असल्याचे माहीत नसल्याचे ते एका प्रश्‍नावर म्हणाले. मात्र, यावेळी गोवा फॉरवर्डला विद्यमान पर्रीकर सरकार पाडण्यात स्वारस्य नसल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. कॉंग्रेस पक्षाला गोव्यात फक्त अस्थिरता निर्माण करण्यात आनंद असल्याचा आरोपही सरदेसाई यांनी यावेळी केला.
कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींनी निवडणुकीच्या पूर्वीच गोवा फॉरवर्डशी हातमिळवणी न करण्याचा निर्णय घेतला होता याची आठवण श्री. सरदेसाई यांनी केली. त्यामुळे पर्रीकर सरकार अस्थिर करून नवे सरकार स्थापन करण्याच्या कॉंग्रेस पक्षाच्या प्रयत्नांना गोवा फॉरवर्ड पक्ष कदापिही साथ देणार नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. पर्रीकर सरकारला कोणताही धोका नसल्याचा निर्वाळा त्यांनी यावेळी दिला.
राज्यसभेसाठी भाजप
उमेदवाराचा उद्या अर्ज
भाजपाने राज्यसभेसाठी पक्षाचे उमेदवार म्हणून प्रदेशाध्यक्ष विनय तेंडूलकर यांच्या नावाला पक्षाच्या संसदीय मंडळाने मंजुरी दिली आहे. श्री. तेंडूलकर यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून दि. ११ जुलै रोजी उमेदवारी अर्ज सादर करणार असल्याचे त्यांनी काल सांगितले. विधानसभेत ४० सदस्य असून भाजप आघाडी सरकारला गोवा फॉरवर्ड, मगो व तीन अपक्ष आमदारांचा पाठिंबा आहे. मात्र, पणजी व वाळपई या दोन जागा रिक्त आहेत. राज्यात भाजप सत्तेवर आल्यानंतर श्री. तेंडूलकर यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती.