आधी हे करा

0
122

शांताराम नाईक यांच्यासारख्या एका जुन्या जाणत्या कॉंग्रेसजनाकडे पक्ष प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आलेली आहे. ते अनुभवी आहेत, यापूर्वी अनेकदा हे पद त्यांनी सांभाळलेले आहे, दिल्लीमध्ये राज्यसभेमध्ये गोव्याचा आवाज बुलंद करण्याचा प्रयत्नही त्यांनी वेळोवेळी केला आहे, मात्र, हे पद स्वीकारतानाच थेट सरकार पाडण्याच्या ज्या वल्गना झाल्या, तो शिताआधी मीठ खाण्याचा प्रकार वाटला. मुळात राज्यात कॉंग्रेसची पक्ष संघटना विदीर्ण झाली आहे. मागील भाजप सरकारमधील मंत्र्यांच्या अहंकाराच्या कृपेने गेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात कॉंग्रेसचे विधानसभेतील संख्याबळ अनायासे व अकल्पितपणे वाढले. खुद्द कॉंग्रेस नेत्यांनाही असे काही होईल याची तीळमात्र आशा वाटत नव्हती आणि असे संख्याबळ आले तर पुढे सरकार स्थापनेच्या दृष्टीने काय करायला हवे याचे काडीमात्र नियोजनही नव्हते. हातातोंडाशी आलेली सत्ता अंतर्गत संघर्ष आणि एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात ही मंडळी घालवून बसली आणि देशभरात कॉंग्रेसचे हसे झाले. या परिस्थितीत खुद्द कॉंग्रेस पक्षसंघटना आणि कार्यकर्त्यांची मनःस्थिती काय झाली असेल कल्पना करता येते. अशा वेळी संघटनेत नवे चैतन्य आणण्यासाठी म्हणून ‘हे सरकार पडणार’, ‘कॉंग्रेस सरकार घडवणार’ अशा अफवांना हवा दिली जात असेल तर ते एक वेळ समजण्यासारखे आहे, परंतु अशा प्रकारच्या नकारात्मक उद्दिष्टावर राज्यात कॉंग्रेसचे गाडे हाकण्याचा जर प्रयत्न होईल, तर त्यातून तोंडघशी पडण्याचाच अधिक संभव आहे. त्यामुळे उत्तर आणि दक्षिण गोवा बुथ समित्या बळकट करण्याचा जो निर्धार नाईक यांनी केला आहे, तो त्यांनी आधी तडीस न्यायला हवा. पक्ष कार्यकर्त्यांमध्ये आधी आपल्या नेतृत्वाविषयी विश्वास निर्माण करावा लागेल, कारण नाईक अनेक वर्षे दिल्लीत आहेत आणि स्थानिक कार्यकर्त्यांशी त्यांचा थेट संपर्क नाही. त्यामुळे आधी आपल्या नेतृत्वाविषयी विश्वास निर्माण करण्याकडे आणि आपल्याविषयी कार्यकर्त्यांमध्ये सर्वसहमती तयार करण्याकडे त्यांनी लक्ष द्यायला हवे. कॉंग्रेसचे मावळते प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो यांनीही जेव्हा प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली तेव्हा अपेक्षा निर्माण केल्या होत्या, परंतु नंतर त्यांच्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षेला धुमारे फुटले आणि गेल्या निवडणुकीत तर तिकीटवाटपापासून सरकारस्थापनेपर्यंत त्यांनी ज्या खटपटी, लटपटी केल्या, त्यातून त्यांची प्रतिमा पुरती डागाळली. या पार्श्वभूमीवर आता शांताराम यांच्याकडे पक्षाची धुरा आलेली आहे. सरकार पाडण्याच्या अफवांना सध्या हवा मिळाली आहे, त्याचे मुख्य कारण म्हणजे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचा अमेरिका दौरा. ही संधी साधण्याची कॉंग्रेसची वा इतर असंतुष्टांची आत्यंतिक इच्छा असू शकते, परंतु विद्यमान आघाडी सरकारमध्ये बेबनाव झाल्याचे अद्याप तरी उघड झालेले नाही. केंद्रातही भाजपचे खमके सरकार असताना गोव्याच्या सरकारमधून बाहेर पडण्याचा मूर्खपणा मगो पक्ष तरी करणार नाही. गोवा फॉरवर्ड, रोहन खंवटेंसारखे अपक्ष यांच्यासंदर्भात वावड्या उडवल्या जात असल्या तरी त्यांनीही आजवर आघाडीच्या स्थैर्यासाठी आवश्यक असलेली परिपक्वता दाखवलेली आहे. एकदा त्यांनी भाजपशी सत्तेसाठी तडजोड केली त्यात त्यांच्या प्रतिमेला तडा गेला. आता पुन्हा जर त्यांनी स्वार्थासाठी कॉंग्रेसच्या कटात सामील होण्याचा प्रयत्न केला, तर त्यांची उरलीसुरली प्रतिष्ठाही धुळीस मिळेल. त्यामुळे सरकार पाडून गोव्याला पुन्हा राजकीय अस्थैर्याच्या खाईत ढकलण्याच्या नकारात्मक प्रयत्नांत शक्ती आणि वेळ खर्च करण्यापेक्षा शांताराम यांनी पक्षसंघटनेला बळकटी आणण्यावर भर देणे शहाणपणाचे ठरेल. गटातटांत विभागलेल्या मंडळींना एकत्र आणणे हेच त्यांच्यापुढील सर्वांत मोठे आव्हान आहे.