सरकारी नोकरीसाठी वयोमर्यादा आता ४५

0
177

>> मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयावर शिक्कामोर्तब : मुख्यमंत्री

 

काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारी नोकरीत रूजू होण्यासाठीची वयोमर्यादा ४० वरून ४५ वर नेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याची माहिती मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.

ज्या काही विशिष्ट वर्गातील कर्मचार्‍यांसाठीची वयोमर्यादा ४० पेक्षा अधिक होती किंवा ४० पेक्षा कमी होती, अशा पदांसाठी वरील निर्णय लागू होणार नाही. परंतु सर्वसाधारण कर्मचार्‍यांच्या पदांसाठी हा निर्णय काल दि. १६ पासून लागू होईल, असे त्यांनी सांगितले. मुलाखतीच्या प्रक्रिया पूर्ण केलेल्या उमेदवारांची वयोमर्यादा चाळीस असल्यास ज्या पदांसाठी सरकारने जाहिराती प्रसिध्द केलेल्या आहेत, त्यात दुरुस्ती करून अर्ज करण्यासाठी आणखी ८ ते १० दिवसांची मुदत वाढविली जाईल, असे पार्सेकर यांनी सांगितले. बेरोजगारी दूर करण्याच्या हेतूनेच वयोमर्यादेत वाढ करण्याचा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले.
सध्याच्या जीवनमानात काम करण्याची वयोमर्यादाही वाढली आहे, असेही त्यांनी सांगितले. प्रशासनातील काही पदे पुनर्जिवीत करण्याचा निर्णयही बैठकीत घेतल्याची माहिती पार्सेकर यांनी दिली.
व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी
जीसीईटी आधारेच प्रवेश
व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश फेर्‍या जुलैमध्ये सुरू होणार असून यावेळी जीसीईटी चाचणी परीक्षेच्या आधारेच वरील अभ्यासक्रमांसाठी प्रवेश दिला जाईल, याचा पुनरुच्चार पार्सेकर यांनी केला.
पालकांचा मुख्यमंत्र्यांना घेराव
पत्रकार परिषद आटोपून मुख्यमंत्री परिषद गृहाबाहेर पडताच विद्यार्थ्यांच्या काही पालकांनी मुख्यमंत्र्यांना साकडे घातले व व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेश फेर्‍या लांबणीवर टाकण्यासंबंधी जाब विचारला. यावेळी पालकांबरोबर पणजीचे आमदार सिध्दार्थ कुंकळकर होते. या पालकांना मुख्यमंत्र्यांनी जुलैमध्ये फेर्‍या सुरू होईल, असे सांगितले.
माध्यम प्रश्‍नावर बोलणे टाळले
शिक्षण माध्यम प्रश्‍नावर भारतीय भाषा सुरक्षा मंचने आज दि. १८ जून पासून मंत्र्यांच्या विरोधात निदर्शने सुरू करण्याचे जाहीर केल्याचे त्यांच्या निदर्शनास आणले असता, त्यावर विशेष भाष्य करणे पार्सेकर यांनी टाळले.
आंतरराष्ट्रीय योगदिन पाळणार
येत्या दि. २१ रोजी आंतरराष्ट्रीय योगदिन पाळण्यात येणार असून तो ग्राम, तालुका व राज्य पातळीवर असेल. राज्य पातळीवरील योगदिनाचा कार्यक्रम डॉ. शामा प्रसाद मुखर्जी स्टेडियमवर सकाळी ८.३० वाजल्यापासून सुरू होऊन तो संध्याकाळी ७ वाजेपर्यंत चालेल अशी माहिती मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी
दिली.