राज्यात पर्यटन मोसम सुरू होऊन जवळ-जवळ अर्धा महिना पूर्ण होत आलेला असतानाच अजून किनार्यांवर सरकारी जमिनीत उभारण्यात येणारी शॅक्स उभारण्यासाठी पर्यटन खात्याकडून परवानगी न मिळाल्याने शॅक्स उभारण्याचे काम अडून पडले आहे. परिणाम किनार्यांवर जाणार्या पर्यटकांचीही शॅक्स अभावी गैरसोय झाली आहे.
शॅक्स वितरणाच्या मुद्द्यावरून एक शॅक्स मालक उच्च न्यायालयात गेला असल्याने शॅक वितरणाचे काम अडून पडले असल्याचे पर्यटन खात्यातील सूत्रांनी सांगितले. दर वर्षी सप्टेंबर महिन्यातच शॅक वितरणाचे काम पूर्ण करण्यात येत असते. यंदाही ते सप्टेंबर महिन्यात करता यावे यासाठी सरकारने सप्टेंबर महिन्यातच शॅक धोरण निश्चित केले होते. पण एक शॅक मालक न्यायालयात गेल्याने हे वितरणच आता अडून पडले आहे.
किनारपट्टीवरील सरकारी जमिनीत सुमारे ३०० ते ३५० शॅक्स उभारण्यात येत असतात. शिवाय खासगी जमीन मालकही मोठ्या संख्येने आपल्या जमिनीत शॅक्स उभारत असतात. यंदा खासगी जमिनीत यापूर्वीच शॅक्स उभारण्यात आलेले असले तरी किनार्यावर वाळूत उभारण्यात येणारे शॅक्स मात्र उभे होऊ शकलेले नाहीत. शिवाय प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने शॅक्स वितरणाचे काम नेमके कधी सुरू होऊ शकेल, हे सांगणे कठीण असल्याचे पर्यटन खात्यातील सूत्रांनी स्पष्ट केले.
पहिले चार्टर विमान दाखल
दरम्यान, नुकत्याच सुरू झालेल्या पर्यटन मोसमातले पहिले चार्टर विमान काल दाबोळीत उतरले. मॉस्को शहरातून हे विमान आलेले असून त्यात २३५ पर्यटक होते. दाबोळी विमानतळावर या विमानातून आलेल्या पर्यटकांचे स्वागत करण्यात आले. चालू वर्षी १५०० चार्टर विमाने गोव्यात येणार असल्याचे सूत्रानी सांगितले.