डिमेलोवाडा-साळगांव येथील इवान डिसोझा यांच्या बंद घरात चोर शिरल्याचे त्यांच्या शेजार्याला कळताच शेजार्यांनी त्याला घरात कोंडून नंतर कळंगुट पोलिसांच्या ताब्यात दिले. साडेतीन लाखांचा ऐवज चोरण्याच्या बेतात तो आला होता.
कळंगुट पोलिस निरीक्षक निलेश राणे यांनी दिलेल्या माहितीनुसार काल डिमेलोवाडो-साळगांव येथील इवान डिसोझा यांच्या बंद घरात चोर शिरला असल्याचे त्यांच्या शेजार्यांना स’जल्यानंतर शेजार्यांनी त्याला घरात कोंडून ठेवले. त्यानंतर कळंगुट पोलिसांना या घटनेची माहिती देताच त्यांनी घटनास्थळी येऊन गोपाळ गणेश नदार (३०) याला अटक केली. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने १३ सप्टेंबर २०१३ रोजी साळगाव येथेच ऍडॉल्फ डिसोझा यांच्या घरी चोरी करून एक सोनी कंपनीचा कॅमेरा, एक जेवीसी हॅन्डीकॅम, रुपये ६ हजार रुपये किंमतीचे चांदीच्या वस्तू, ५०० युएस डॉलर, ३००० ऑस्ट्रेलियन डॉलर व १५०० ब्रिटिश पौंड चोरल्याचे त्यांने कबुल केले.
कळंगुट पोलिसांनी या संशयित चोरट्यास पणजी येथील सत्र न्यायालयात नेले असता त्याला जामिनावर सोडण्यासाठी एक महिला वकीलासह घुटमळत असताना तिला संशयाने ताब्यात घेतली. तिच्याकडे चौकशी केली असता ती त्याची पत्नी असल्याचे आढळले. कळंगुट पोलिसांनी तिलाही ताब्यात घेऊन चौकशी केली असता ती दोघेही कर्नाटकातील अट्टल चोरटे व खूनी असल्याची माहिती मिळाली. ते दोघेही ऑगस्ट महिन्यात गोव्यात येऊन आराडी, कांदोळी येथे राहत होते.पोलिसांनी त्या दोघांची चौकशी करीत असताना त्या दोघांविरुध्द हुबळी, शिमोगा, बंगळूर, उडपी तसेच तामिळनाडू, केरळ व आंध्रप्रदेश येथे त्यांच्या नावावर अनेक गुन्हे असल्याचे समजले. गोपाळ नदार या उडपी उपकाराग्रहामध्ये २०११मध्ये असताना विनोद शेट्टीगर नावाच्या गुन्हेगाराचा तुरुंगातच खून केला होता. या दोघाही गुन्हेगारी जोडप्यास ऑगस्ट २०१३मध्ये केरळ पोलिसांनी अटक केली असता त्यांच्या हातावर तुरी देऊन त्यांनी पळ काढून गोवा गाठले होते.
त्यापूर्वी त्यांनी शिमोगा न्यायालयात पळ काढण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. परंतु पोलिसांच्या सतर्कतेमुळेच तो फसला होता. अधिक चौकशी केली असता गोपाळ नदार याचे खरे नाव नागराज शेट्टी उर्फ सतीश असे आहे. कळंगुट पोलिसांनी त्याच्याकडून १५०० ब्रिटीश पौंड, रु. ३१ हजार, १० ऑस्ट्रेलियन डॉलर एक सोनी कॅमेरा, एक जेबीसी हॅन्डीकॅम व विदेशी चलन वटवून खरेदी केलेला टीव्ही, फ्रिज, मिक्सर, टाटा स्काय सेट टॉप बॉक्स व इंडक्शन स्टोव्ह जप्त केला आहे.
कळंगुट पोलिसांनी संशयित गोपाळ नदार ऊर्फ नागराज शेट्टी याला ७ दिवसांची पोलिस कोठडी घेतली तर त्याच्या पत्नीस पाच दिवसांची पोलीस कोठडी घेतली आहे. त्या दोघांनी गोव्यात आणखी कोठे चोरी केली आहे का याचा तपास कळंगुट पोलिस स्थानकाचे निरीक्षक निलेश राणे करीत आहेत.