सरकारी कार्यालयांच्या भाड्यापोटी ४ वर्षात झाले २३ कोटी खर्च

0
101

पाटो प्लाझा-पणजी येथे खासगी इमारतीमध्ये कार्यरत असलेल्या सहा सरकारी कार्यालयांच्या भाड्यापोटी मागील चार वर्षांत २३ कोटी ५९ लाख ६० हजार ०७८ रूपये खर्च करण्यात आले आहेत.

विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर यांनी विधानसभेत विचारलेल्या प्रश्‍नावर खासगी इमारतीमध्ये कार्यरत असलेल्या सरकारी कार्यालयांच्या भाड्याच्या प्रश्‍नाला मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिलेल्या लेखी उत्तरात ही माहिती दिली आहे.
सरकारी कार्यालयाच्या भाड्यापोटी महिना साधारण ४२ लाख ९२ हजार ९०५ रूपये खर्च केले जात आहेत. तसेच सरकारी कार्यालयाच्या भाड्यामध्ये वार्षिक ३.५ टक्के वाढ केली जात आहे. १ नोव्हेंबर २०१३ ते १ जानेवारी २०१८ या काळात सहा सरकारी कार्यालयाच्या भाड्यापोटी हा खर्च करण्यात आला आहे, असेही उत्तरात म्हटले आहे.

पाटो प्लाझा येथील कामत टॉवरमध्ये गोवा राज्य माहिती आयोग आणि नगर नियोजन खात्याचे एक कार्यालय कार्यरत आहे. स्पेसीस इमारतीमध्ये नगरविकास खात्याने नव्याने सुरू केलेल्या ‘रेरा’चे कार्यालय, रजिस्ट्रेशन खाते, प्रथम श्रेणी न्यायालय, डीआरडीए ही चार कार्यालये कार्यरत आहेत, अशी माहिती उत्तरात देण्यात आली आहे. संबधित खात्याने जागेची मागणी केल्याने त्यांना खासगी इमारतीमध्ये स्थलांतरीत करण्यात आली आहेत. सरकारने पाटो येथे नवीन प्रशासकीय इमारत बांधण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे, असे उत्तरात नमूद करण्यात आले आहे.