सरकारी कर्मचार्‍यांना गृहकर्जासाठी बँकांची निवड

0
11

>> मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय, मुख्यमंत्र्यांची माहिती

गोवा सरकारच्या कर्मचार्‍यांना २ टक्के व्याजदरावर गृहकर्ज देण्यासाठी जी योजना तयार करण्यात आलेली आहे त्या योजनेतर्ंगत सरकारी कर्मचार्‍यांना कर्ज वितरित करण्यासाठी गोवा राज्य सहकारी बँक व अन्य ४ राष्ट्रीयकृत बँकांची निवड करण्यात आली असल्याची माहिती काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती त्यांनी या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
अजूनही काही बँकांना या योजनेखाली आणण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

दिशा फाऊंडेशनची निवड
राज्यातील आदिवासींसाठी असलेल्या विविध योजनांची अमंलबजावणी करण्यासाठी गोवा सरकारने दिशा फाऊंडेशनची निवड केली आहे. त्यासंबंधीचा निर्णय काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. भारत सरकारच्या आदिवासी खात्यातर्फे ज्या विविध योजना राबवण्यात येत आहेत त्यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे.

दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळासाठी कोविड काळात जी खरेदी करण्यात आली होती त्या खरेदीला बैठकीत पूर्वलक्षी मान्यता देण्यात आल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. त्याचबरोबर कोविड काळात सरकारने सुरू केलेल्या स्वयंपूर्ण गोवा योजनेसाठीच्या खर्चालाही पूर्वलक्षी मान्यता देण्यात आल्याचे सावंत यांनी स्पष्ट केले.

खाणपट्ट्यांच्या लिलावाची
मुख्यमंत्र्यांकडून ग्वाही

राज्यातील खाणपट्ट्यांचा लिलाव करण्याचा सरकारने निर्णय घेतला असल्याच्या वृत्ताचा काल मुख्यमंत्र्यांनी पुन:रुच्चार केला व त्याबाबत कुणीही संशय बाळगण्याचे कारण नसल्याचे ते म्हणाले. हा लिलाव करण्यासाठी सरकारने शंभर टक्के पावले उचलली असल्याचे सांगतानाच त्यासंबंधी अधिक माहिती देण्यात त्यांनी नकार दिला.