सरकारच्या ई-रिक्षा सेवेचा 197 दिव्यांग व्यक्तींनी घेतला लाभ

0
2

गोवा सरकारने सुरू केलेल्या व्हीलचेअर सुलभ ई-रिक्षा सेवेचा राज्यातील 197 दिव्यांग व्यक्तींनी आतापर्यंत लाभ घेतला आहे. या सेवेची मुक्तकंठाने प्रशंसा करतानाच आता सरकारने राज्यात व्हीलचेअर सुलभ ई-टॅक्सी सेवा सुरू करावी अशी इच्छाही व्यक्त केली आहे.

गोवा राज्यात दिव्यांगजन आयुक्त कार्यालयाच्या प्रयत्नांमुळे सुरू झालेल्या या सेवेचा सात महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सांवत यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला होता. ही व्हीलचेअर सुलभ ई-रिक्षा सुरू करण्याच्याकामी समाजकल्याण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनीही बरेच योगदान दिले होते. मास्तिक पक्षाघाताची समस्या असलेल्या दिव्यांग लेखिका, कवयित्री आणि कलाकार फ्रेडरिका मिनेझिस यांनी व्हीलचेअर सुलभ ई-रिक्षा सेवेविषयी आनंद व्यक्त केला असून आपल्यासारख्या एका व्हीलचेअर वापरकर्त्यांसाठी या सेवेमुळे प्रवास करणे सुलभ झाले असल्याचे म्हटले आहे. आता सरकारने व्हीलचेअर सुलभ ई-टॅक्सीसेवाही राज्यात सुरू करावी, असे त्यांनी पुढे सांगितले.

याबाबत बोलताना दिव्यांगजन आयुक्त गुरुप्रसाद पावस्कर यांनी, दिव्यांगजनासाठी विश्वासाई प्रवास सुलभ वाहतूक सेवा उपलब्ध असणे महत्वाचे आहे. या व्हीलचेअर सुलभ ई-रिक्षा सेवेचा दर या वाजवी ठेवण्यात आला असून उत्पन्नाचा स्रोत नसलेल्या दिव्यांगजनांना या सेवेसाठी मोठे शुल्क द्यावे लागणार नसल्याचे ते म्हणाले. ही सेवा सकाळी 8 ते रात्री 8 या दरम्यान उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.