कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी 18 मे रोजी होण्याची शक्यता

0
5

>> मुख्यमंत्रीपदासाठी सिद्धरामय्या, शिवकुमारमध्ये रस्सीखेच

कर्नाटकचा पुढचा मुख्यमंत्री कोण असेल याचा निर्णय घेण्यासाठी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक बेंगळुरूमध्ये बोलवण्यात आली होती. मात्र या बैठकीत गटनेत्याची निवड करण्यात आली नाही. बैठकीत उपस्थित असलेल्या काँग्रेस आमदारांनी विधिमंडळ गटनेत्याची निवड करण्याचे अधिकार हे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना देण्याचा ठराव मंजूर केला आहे. येत्या दोन-तीन दिवसांत मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होऊ शकते, तर मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी गुरूवार दि. 18 मे रोजी होण्याची शक्यता आहे.

काल मुख्यमंत्री कोण होणार हे ठरवण्यासाठी काँग्रेस आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत काँग्रेस आमदारांनी एकमताने काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचा निर्णय सोपवला आहे. तसा ठराव संमत करण्य़ात आला आहे. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांच्यात मुख्यमंत्रीपदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे.

दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष खर्गे यांनी बैठकीपूर्वी दोघांचीही वेगळी बैठक घेऊन चर्चा केली. यामध्ये त्यांनी दोघांचीही मते जाणून घेतली. यानंतर निरीक्षकांनीही काँग्रेसच्या आमदारांची मते जाणून घेतली आहे. महाराष्ट्रातून माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे बंगळुरुला गेले आहेत.
1काल संध्याकाळी झालेल्या बैठकीत नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्याची तारीख 18 मे असेल असे ठरवण्यात आले. यावेळी सोनिया गांधीं, राहुल गांधी आणि प्रियांका गांधींसह पक्षाचे सर्व ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत.