>> मुख्यमंत्र्यांकडून कबुली, तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, आरोग्यमंत्री विश्वजित राणे, सरकारी अधिकारी, गोमेकॉचे डीन आणि आरोग्य अधिकारी यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याने सरकारी इस्पितळांत प्राणवायूची टंचाई आणि इतर समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी मान्य केले. प्राणवायूची समस्या त्वरित सोडविण्यासाठी प्राधान्यक्रम देण्यात आल्याची माहिती पत्रकारांशी बोलताना काल मुख्यमंत्र्यांनी दिली.
प्राणवायू डीनची जबाबदारी
इस्पितळाच्या कोरोना विभागात प्राणवायूचा अपुरा पुरवठा केला जात असल्याचे वृत्त वृत्तपत्रातून वाचले. त्यामुळे आपणाला पुन्हा एका इस्पितळाला भेट देऊन पाहणी करावी लागली. आपल्याकडे यापूर्वी हा विषय कुणीच मांडलेला नव्हता. आपण सोमवारी आरोग्यमंत्री राणे यांच्याशी प्राणवायूच्या विषयावर चर्चा केली होती. पण, हा विषय आपल्या नजरेस आणून देण्यात आला नाही. गोमेकॉच्या डीननी हा प्राणवायू पुरवठ्याचा विषय हाताळायला हवा होता. आपल्याकडे प्राणवायूसंबंधी जे विषय मांडण्यात आले. त्या सर्वांवर तोडगा काढण्यात येत आहे. आता इस्पितळातील वॉर्डामधील प्राणवायू पुरवठ्याचा विषय तज्ज्ञांसमोर मांडून तोडगा काढला जात आहे. प्राणवायू सिलिंडरच्या तीनऐवजी आता चार ट्रॉली उपलब्ध करण्यात येणार आहेत, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
को-मोर्बिड रुग्णांसाठी खास व्यवस्था
राज्यातील कोरोनाबाधित रुग्ण वेळेवर इस्पितळात दाखल होत नसल्याने कोरोना रुग्णांच्या मृत्यूच्या प्रमाणात वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर को-मोर्बिड कोरोना रुग्णांसाठी ताळगाव येथील श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये उपचाराची खास सोय केली जाणार आहे. इस्पितळात दाखल होण्यापूर्वी त्यांना या स्टेडियममधील खास केंद्रात दाखल केले जाणार आहे. या खास केंद्रात डॉक्टरांची नियुक्ती केली जाणार आहे. या केंद्रातून कोविड रुग्णांना इस्पितळात दाखल केले जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिली.