समंजस-असमंजस

0
388
  •  दत्ताराम प्रभू-साळगावकर

घरच्यांनी असल्या मोहजालात न पडण्याचा सल्ला त्याला दिला, पण हा ऐकेल तर शपथ! मांत्रिकाने त्याच्या गळ्यात मोठ्या रकमेची एक ‘रत्न’जडित अंगठी मारली. बोटात घालून ‘रूप पाहता लोचनी’ केलं आणि ‘सुख झाले हो साजणी’ म्हणत त्याने घरचा रस्ता धरला…

माणसांच्या स्वभावाविषयी मला विलक्षण कुतूहल व आकर्षण आहे. स्वभाव कसा असतो, कसा बनतो, का बनतो, कोण बनवतो असल्या (कदाचित खुळचट) प्रश्‍नांच्या मुळाशी जायचा माझा खास प्रयत्न असतो. शोधून काढणे फारसे कठीण नसावे. कोणी असल्या बाबतीत खोलात जाऊन विचार केला, संशोधन केलं तर त्यावर प्रबंध लिहून डॉक्टरेट मिळू शकेल. आतापर्यंत कित्येकांनी मिळवलीही असेल, कल्पना नाही. काही लोक समंजस असतात, काही असमंजस.

समंजस म्हणजे त्यांना कळतं, नसेल तर कळून घेण्याची वृत्ती, दुसर्‍याचं ऐकून घेण्याची सवय असते, विचारशक्ती असते. ‘हां’ला ‘हां’ किंवा ‘हो’ला ‘हो’ म्हणणारे कदाचित नसतीलही. थोडे लोक असमंजस असतात, त्यांना कळतही नाही, दुसर्‍याचं ऐकून घेण्याची सवय नाही, तयारी पण नाही; आपण काय करतो तेच बरोबर असं. समंजस व असमंजस यामध्ये ‘समज’ ही बाब महत्त्वाची असते. याबाबतीत लहान मुलांचा समावेश करू नये, कारण त्यांना समज यायला वयाची काही किंवा ठराविक वर्षे जावी लागतात. प्रत्येकाची कारणे वेगवेगळी असू शकतील, परिस्थितीनुसार, परिस्थितीनुरूप, परिस्थितीजन्य!
एक वयस्क मनुष्य होता. त्याचा देव, दैव, भविष्य अशांवर अतिविश्‍वास. आपण जाहिराती बघत असतो, पेपरातून वाचत असतो; नशीब तात्काळ बदलण्यासाठी तंत्र, मंत्र, यंत्र, रत्ने, खडे, दोरे, गंडे अशांची हमीपूर्वक किंवा हमीसह माहिती दिलेली असते; सर्व दुःखं दूर व सुखांचा महापूर! किती व कसली सुखं पाहिजेत त्या-त्या प्रमाणात पैसा मोजायचा म्हणजे सुखं येतील दारी व दुःख माघारी!

या गृहस्थाला असाच एक मांत्रिक भेटला व त्यानं याच्यावर अशी काही मोहिनी घातली की हा भुलला. त्याच्या घरच्याना जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा त्यांनी असल्या मोहजालात व फंदात न पडण्याचा सल्ला त्याला दिला, पण हा ऐकेल तर शपथ! मांत्रिकाने त्याच्या गळ्यात मोठ्या रकमेची एक ‘रत्न’जडित अंगठी मारली. बोटात घालून ‘रूप पाहता लोचनी’ केलं आणि ‘सुख झाले हो साजणी’ म्हणत त्याने घरचा रस्ता धरला. घरी येताना वाटेत नदी लागायची व पूल नसल्यामुळे पार करण्यासाठी वल्हवायची होडी हाच पर्याय होता. येऊन होडीत बसला. होडीत इतर लोक पण होते. पुरेसे लोक झाल्यावर नावाड्याने होडी सोडली. हा तर ‘सर्व सुखाचे आगर’ आता घरी येणार अशा स्वप्नरंजनात रंगला होता. त्याची मस्त तंद्री लागली. अंगठी घातलेला हात होडीच्या डेकला धरला होता. बोटानं होडीच्या डेकवर ठेका धरला. तंद्री भंग झाली तेव्हा लक्षात आलं की बोटात अंगठी नाही! तोपर्यंत होडी नदीचं अर्धं पात्र पार करून गेली होती. होडीत बसल्या ठिकाणी शोधाशोध केली पण व्यर्थ. शेवटी मोठ्यानं ओरडला, ‘‘होडी थांबव, होडी थांबव.’’ नावाड्याला व इतर प्रवाशांना झालं काय तेच कळेना. नावाड्यानं विचारलं, ‘‘झालं काय?’’
म्हणाला, ‘‘अतिमहत्त्वाची किमती चीज पाण्यात पडली.’’
‘‘कसली?’’
‘‘बोटातील अंगठी!’’
नावाडी आपल्या सर्वशक्तीनिशी होडी वल्हवत होता. नदीच्या पात्रात होडी थांबवणार कसा? त्यानं विचारायचं म्हणून विचारलं, ‘‘कुठे पडली?’’ हात ज्या ठिकाणी होडीला धरला होता ती जागा ‘इथेच’ म्हणून दाखवू लागला. वर म्हणायला लागला, ‘‘आत्ताच पडली.’’
‘आत्ताच पडली, इथेच पडली’ हेच तुणतुणे चालू! तोपर्यंत होडी किनार्‍याला लागली. नदीच्या पात्रात शोध कोण व कसा घेणार? कोणीच मदत केली नाही म्हणून सर्वांना शिव्या-शाप मोजले. नावाड्याच्या नावाने थोडे जास्त! कोणाचं ऐकूनच घ्यायला तयार नाही. होडीला हात धरलेली जागा दाखवून उपयोग काय? सर्वांनी समजावण्याचा फार प्रयत्न केला पण व्यर्थ. सुख दारी यायचा उपाय करूनही दैव फिरलं ते फिरलंच! पैसेही गेले व अंगठीही गेली; चक्क पाण्यात! व्यर्थ जाण्याला ‘पाण्यात जाणे’ म्हणतात त्या उक्तीप्रमाणे! स्वतःला अक्कल नाही, घरच्यांचा सल्ला मानला नाही. परिणामी पश्‍चात्ताप. हाच तो असमंजसपणा!
मी एका ठिकाणी नोकरीनिमित्त राहत होतो. ठिकाण खेडेगाव होते. एका मोठ्या घराचा दोन खोल्यांचा भाग मी भाड्यानं घेतला होता व तिथे राहत होतो. व्यवसायानुरूप बर्‍याच लोकांशी संबंध यायचा. एका साधारण समवयस्काशी ओळख झाली. त्याना विविध विषयांवर चर्चा करायची आवड होती. घरच्या परिस्थितीमुळे जास्त शिक्षण घेऊ शकला नव्हता, पण विचार, आचार, भाषा चांगली होती. एक दिवस त्यानं मला विचारलं, ‘‘मी तुमच्या खोलीवर येऊ शकतो का?’’
ऐकून मी थोडा पेचात पडलो.

गावात जातीपातीचं स्तोम होतं. मला त्याची जाणीव झाली होती. त्याच्या प्रश्‍नावर मी थोडा निरुत्तर झाल्यासारखा झालो. माझ्या अनुत्तरित चेहर्‍याकडे बघून त्याला त्याविषयी जाणीव झाली असावी. मी म्हटलं, ‘‘मी व माझे दोन-तीन मित्र सायंकाळच्या वेळी एका निवांतशा जागी जाऊन बसतो. तिकडे येत जा. घरात बसून बोलण्यापेक्षा अशा निवांत व नैसर्गिक वातावरणात बसायला मजा येते, ती आपण अनुभवू.’’

त्याला पटलं! पटलं म्हणण्यापेक्षा त्याने पटवून घेतलं! तो त्या ठिकाणी येऊ लागला. मी काढलेल्या या ‘पळवाटेची’ त्याला कल्पना आलीच असावी. आदमी समंजस होता. मी माझ्या रूमवर त्याला बोलावू शकत नव्हतो हे शल्य मात्र मला टोचत राहायचं!
‘समंजस’पणा ही काळाची गरज!