पुन्हा एकदा गरुडभरारी घेऊ…

0
136
  •  मीना समुद्र

अचानक उद्भवलेल्या आणि वाढतच जाणार्‍या आजच्या संकटकाळात थोडी निर्भयता, आशावाद, आधार आणि सहकार्याची व माणुसकीची भावना ठेवली तर नक्कीच या कोरोनाच्या मृत्युभयापासून आपण दूर जाऊ शकू आणि पुन्हा एकदा निर्भरपणाने गरुडभरारी घेऊ शकू.

माणसं एकदा गप्पा मारत बसली की चोराचिलटांच्या, भुताखेतांच्या, नागसापांच्या गोष्टी अशा काही रंगतात की सांगून सोय नाही. हा गप्पांचा अड्डा मग घरात जमलेला असो, झाडाच्या पारावर असो, गच्चीवर असो की स्टेशनवर गाडीची वाट पाहताना किंवा गाडीत बसल्यावर असो. प्रत्येकाच्या गाठीला कसला ना कसला अनुभव जमा असतोच; आणि त्यातला अनुभव कथेचं रूप घेऊन आकारतो, वाढतो.

विशेषतः नागपंचमीच्या सुमारास नागासापाच्या गोष्टी फारच रंगतात आणि त्यांची लांबी ‘मियॉं मूठभर आणि दाढी हातभर’ अशी वाढतच जाते. त्याबरोबरच गोष्टींची लज्जतही! सर्पोद्यान पाहिलेली लहान लहान मुलंही- ‘सापाला दगड मारायचा नसतो’, ‘सापाला भ्यायचं नसतं’, ‘सापाचे मित्र त्याला पकडून जंगलात सोडून देतात’, ‘नुसतेच खड्‌ड्यात पडून राहिलेले शेणाचा पो घातल्यासारखे छान नाही दिसत; नागमोडी चालत फणा काढणारे, डोलणारे छान दिसतात’, ‘अंगावर किती छान नक्षी असते’ असे सांगतात. त्यांची माहिती पुरवितात. कुणी साप चावून तोंडाला फेस येऊन माणूस मेल्याचं वर्णन करतो, तर कुणी दवाखान्यात वेळेवर पोचवल्यामुळे माणूस औषध-इंजेक्शनाने वाचल्याचे सांगतो. सापाचं विष जालीम औषध असल्याची माहिती कुणी पुरवतं. शेतावावरात काम करणार्‍या माणसांना तर या गोष्टींना नेहमीच सामोरे जावे लागते. त्यामुळे ग्रामीण भागात या कथा जास्त रंगतात. शहरी भागातही वेगळ्या कारणांमुळे नागसापांचं दर्शन होतंच.

त्यांची वारुळं, वस्तीची जागा खणून, उकरून आपण मोठमोठ्या इमारती बांधल्या तेव्हा थोडीफार माती, झाडंझुडपं असतील तिथे त्यांनी आसरा घेतला आणि थंडाव्यासाठी कधीकधी घरांची सावली शोधली. तेव्हा माणसाची भीतीने त्रेधातिरपीट उडाली. पण परवाच एका धीट कोंबडीची झुंज व्हिडिओवर पाहिली आणि श्‍वास काही क्षण रोधला गेला.

आज कोरोनाच्या काळात वारुळातून मुंग्या बाहेर पडाव्या तसे व्हिडिओज व्हायलर होत आहेत. त्यांपैकीच हाही एक नागामुळे आठवलेला. बहुधा एका इमारतीचं बांधकाम चालू आहे. विटांमध्ये सिमेंट भरलेल्या दोन भिंती आणि समोर एक सिमेंटची भिंत अशा एका बोळकंडवजा जागेत पाचसात पिल्लांसमवेत एक कोंबडी क्लक् क्लक् करीत फिरत होती आणि तिची मुठीएवढी पिल्लं तिच्या आसपास खेळत होती. आपल्याच नादात तुरूतुरू फिरत, बागडत होती. नुकतेच पाय फुटल्यावर किती हिंडू आणि काय काय करू असं त्यांना होऊन गेलं होतं. सुरक्षित जागा शोधल्यामुळे कोंबडी थोडी मोकाटपणे फिरत होती आणि बहुधा कामगारांनी जेवून फेकलेले अन्नाचे कण टिपत होती. तेवढ्यात मोकळ्या बाजूने एक नाग सरपटत भिंतीच्या बाजूने आला आणि त्यांच्या दिशेने जाऊ लागला. कोंबडीने त्याची नागमोडी चाल ओळखली. भिंतीच्या कोपर्‍यात निर्धास्तपणे फिरणार्‍या आजाण पिल्लांचा घास घेण्याचा त्याचा विचार तिने तात्काळ ओळखला आणि पंख फडफडवून जोरात कलकलाट केला. काळजाचा ठाव सुटल्यासारखी ती ओरडली तेव्हा घाबरीघुबरी होऊन तिच्या पंखाखाली लपण्यासाठी जाणार्‍या पिल्लांना तिने हुसकत हुसकत भिंतीच्या दुसर्‍या बाजूने दूर नेले आणि खूप लांब हुसकावून लावले. एक पिल्लू मागेच राहिलेलं म्हणून ती परत फिरली तेवढ्यात नागाने फणा काढला. मग ती त्याच्यावर चाल करून गेली. नाग फणा उंच करून तिला दंश करू बघत होता आणि ती उडून त्याच्या फण्याला चोच मारून जोराचा आवाज करून त्याला दूर हाकलू बघत होती. दोनतीनदा असा प्रयत्न झाल्यावर ती पिल्लांपाशी आली. पटकन् त्याला पळवत पळवत सावधपणे सुरक्षित अंतरावर पोचली. मग सगळ्या पिल्लांना घेऊन निघून गेली.

हात-दीडहात लांबीच्या आणि चांगला मोठा पंजाएवढा फणा काढलेल्या त्या नागाच्या तोंडून आपल्या सगळ्या पिल्लांना वाचवून, त्याला झुकांडी देऊन पळणारी कोंबडी मला अगदी समर्थ माता वाटली. तिची मायेची पाखर आणि वत्सलता किती खरी होती. त्यामुळेच ती जेमतेम ओंजळभर आकाराचीच असणारी कोंबडी खूप धीट आणि शूरवीर वाटली अन् तिचे कौतुकही वाटले.

एका धीट मातेची- हत्तिणीची- ममता सांगणारा असाच आणखी एक व्हिडिओ-
कुठलासा एक हायवे. दोन्ही बाजूंना हिरवीगार झाडी. रस्त्यावरून जाणारा एक ट्रक. मध्येच चालकाने ब्रेक लावला आणि समोरचे आश्‍चर्य तो पाहत राहिला. हत्तीचं एक कुटुंब रांगेनं उजवीकडून डावीकडे चाललं होतं. अगदी नाकासमोर सरळ रेषेत. पिल्लू आईला खेटून न चालता मागून चाललं होतं. दोघांनी डाव्या बाजूचा दगडी कठडा ओलांडला आणि झाडीत ते निघून गेले. त्यांच्या मागोमाग हत्तिणीनेही कठडा ओलांडला. मग तो बालहत्ती पाय कठड्यावरून टाकून आईपाठोपाठ जाण्याचा प्रयत्न करू लागला. पण त्याला तो ओलांडणे जमले नाही. मग थोडा मागे येऊन थोडा डावीकडे जाऊन तिथून जायचा प्रयत्न करू लागला, पण तेही त्याला जमेना. तोपर्यंत हत्तिणीला मागून कोणी येत नाही याची जाणीव झाली असावी. पूर्णपणे वळून तिने पिल्लाची खटपट पाहिली आणि ती तो कठडा ओलांडून पुन्हा अल्याड आली. मग तिने पिल्लाला सोंडेने ढकलत एका जागेपर्यंत नेले आणि त्याने एक पाय टाकल्यावर मागून आधार देऊन कठड्यापलीकडे उतरवले आणि मग ती दोघे त्या हिरवाईत निघून गेली. हे नवल पाहत थांबलेल्या ट्रक ड्रायव्हरने मग हसत हसत ट्रक चालू केला.

पशूंतल्या- पक्ष्यांतल्या ममतेच्या, वात्सल्याच्या जाणिवाही माणूसजातीसारख्याच असतात. माया, आधार, संरक्षण, शिकवण हे सारे त्यांचेही कधी अबोलपणे तर कधी मुखर होत चालू असते. कधीकधी फक्त आपल्याच अपत्याविषयी वा पिल्लापुरते ते मर्यादित नसते तर प्राणिजातीतली ही जाणीव दुसर्‍यांच्या पिल्लांविषयीही असते हे दुर्गाबाई भागवतांनी लिहिलेल्या एका लेखात दिसून येते.

मांजरीचं एक अनाथ पिल्लू माकडिणीने आपल्या छातीशी धरून झाडावर पोचले आणि त्याला आपला माकडमेवा खाण्यासाठी दिला. ते काही खाईना तेव्हा चापट्याही मारल्या. शेवटी ते पिल्लू मेले पण तिला ते कळलेच नाही. जेव्हा जाणीव झाली तेव्हा मात्र तिने खूप विलाप केला. राहतं झाड सोडून चुकून दुसर्‍या झाडावर गेलेलं एक नव्यानं उडायला शिकलेलं साळुंखीचं पिल्लू कावळ्यांच्या घेर्‍यात सापडलं तेव्हा त्याच्या आईने कर्कश ओरडून आरडून पिल्लाला सावध करण्याचा आणि कावळ्यांना हाकलण्याचा व्यर्थ प्रयत्न केला.
घिरट्या घालून कावळ्यांना चोच मारण्याचा प्रयत्न केला पण शेवटी एक आदिवासी मुलगी त्याला घेऊन गेली आणि साळुंकी विलाप करत राहिली. नजरेर्‍या कॅमेर्‍याने दुर्गाबाईंनी टिपलेली ही सुंदर ऋतुचित्रे आणि परिसरातील प्राणिजातांचे निरीक्षण पाहून-वाचून असे वाटते की त्याकाळी व्हिडिओसारखे तंत्रज्ञान हवे होते.
अचानक उद्भवलेल्या आणि वाढतच जाणार्‍या आजच्या संकटकाळात थोडी निर्भयता, आशावाद, आधार आणि सहकार्याची व माणुसकीची भावना ठेवली तर नक्कीच या कोरोनाच्या मृत्युभयापासून आपण दूर जाऊ शकू आणि पुन्हा एकदा निर्भरपणाने गरुडभरारी घेऊ शकू.