सद्यस्थितीत मुख्यमंत्र्यांनी विदेशात जाणे अयोग्य

0
129

>> कॉंग्रेस : पर्यायी मुख्यमंत्री जाहीर करण्याचे आवाहन

राज्यात सद्या धार्मिक स्थळांवर बिटंबनांचे प्रकार चालूच असून धार्मिक तणाव निर्माण करण्याचाच हा प्रकार आहे. राज्यात संवदेशनशील वातावरण असताना मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी विदेश दौर्‍यावर जाणे हे चुकीचे आहे. त्यांनी आपल्या गैरहजेरीत येथील कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासाठी पर्यायी मुख्यमंत्री जाहीर करावा, असे आवाहन अखिल भारतीय कॉंग्रेस सचिव गिरिश चोडणकर यांनी काल पत्रकार परिषदेत केले.
या प्रश्‍नावर आपला पक्ष राजकारण करू पहात नाही, सरकारलाही सहकार्य करण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले. वरील प्रकरणात गुन्हेगार कोणत्याही परिवाराचा किंवा पक्षाचा असला तरी त्याला गजांआड करण्याची मागणी चोडणकर यांनी केली. राज्यातील चर्च संस्थेने नेहमीच संयम पाळून जनतेने वरील प्रकारास बळी पडून वातावरण बिघडू नये म्हणून काळजी घेतली आहे. मात्र सरकारने जनतेच्या संयमाचा अंत पाहू नये, असेही त्यांनी सांगितले. उद्यापासून वरील प्रकारचा राज्यात एकही गुन्हा घडणार नाही याची सरकारने काळजी घ्यावी, असा इशाराही चोडणकर यांनी दिला.
मुख्यमंत्री पर्रीकर विदेश दौर्‍यावर कोणत्या कारणासाठी गेले आहेत. त्यात स्वारस्य नाही, परंतु जाण्यापूर्वी त्यांनी विरोधी नेत्यांनाही कल्पना देणे आवश्यक होते, असे ते म्हणाले. राज्याची काळजी घेण्याची जबाबदारी कुणावर दिली आहे, हे पर्रीकर यांनी जाहीर करावे, असे आवाहन त्यांनी केले. उच्च न्यायालयाच्या नावांचा वापर करून सरकार तरंगत्या कॅसिनोला परवाना देत आहे. सद्या बंदर कप्तानने बंदरावरील जलवाहतूक बंद केली आहे. समुद्र खवळलेला असतानाही सरकार कॅसिनो जहाज आणता यावे यासाठी बंदर कप्तानावर दबाव आणित असल्याचा आरोप करून बंदर कप्तानानी सरकारच्या दबावाला बळी पडू नये, असे आवाहन चोडणकर यांनी केले. मांडवीच्या पात्रातून कॅसिनो जहाजे हटविण्याचे भाजपने जनतेला आश्‍वासन दिले होते. त्याला त्यांनी हरताळ फासला. खरे म्हणजे कॅसिनोच्या विरोधात सरकारने सर्वोच्च न्यायालयात जाऊन उच्च न्यायालयाच्या आदेशास आव्हान देण्याची गरज होती. पंचायतीच्या प्रश्‍नावर सरकारने जी भूमिका घेतली ती कॅसिनोच्याबाबतीत का घेतली नाही, असा प्रश्‍न चोडणकर यांनी केला.
कॉंग्रेस विधीमंडळाने सरकार
स्थापनेचा प्रयत्न केल्यास आनंदच
गोमंतकीय जनतेने सरकार स्थापन करण्यासाठी कॉंग्रेसला दिलेला कौल भाजप नेत्यांनी हिरावून घेतला. त्यामुळे सध्याचे सरकार जनतेला नको झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेस पक्षाच्या ध्येय धोरणांकडे तडजोड न करता पक्षाच्या विधीमंडळ गटाने भाजप सरकार पाडून नवे सरकार घडविण्याचा प्रयत्न केल्यास त्याचा पक्षाला आनंदच आहे, असे गिरीश चोडणकर यांनी एका प्रश्‍नावर सांगितले.
घटक पक्षांकडून अद्याप कोणताही प्रस्ताव आलेला नाही. परंतु गोंयकारपण व येथील धार्मिक सलोखा टिकविण्यासाठी त्यांनी सरकारचा पाठिंबा काढून घ्यावा, असे आवाहन चोडणकर यांनी केले. कॉंग्रेस सरकार स्थापन करण्याचे झाल्यास पक्षाचा विधिमंडळ गट पक्षाच्या धोरणाकडे तडजोड करणार नाही, यावर आपला विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले.