चीनची दांडगाई

0
89

जी -२० परिषदेच्या पार्श्वभूमीवर मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यातील बैठक होण्यास सध्याची परिस्थिती अनुकूल नाही असा पवित्रा चीनने घेतला असल्याचे काल स्पष्ट झाले. तत्पूर्वी ‘ब्रिक्स’ च्या बैठकीत हे दोन्ही नेते उपस्थित असतील, परंतु दोघांची स्वतंत्र भेट मात्र होणार नाही. याला भारत, भूतान आणि चीन या तीन देशांच्या सीमा एकमेकांना भिडतात त्या दोकलाममधील विवादाचे कारण देण्यात आले आहे. वास्तविक चीनला या विवादाकडे कानाडोळा करून ही भेट नियोजनानुसार आखता आली असती, परंतु भेट नाकारून चीनने हा विषय आपण उभय देशांच्या मैत्रिसंबंधांच्या दृष्टीने परमोच्च महत्त्वाचा आहे आणि त्यावरच दोन्ही देशांचे संबंध अवलंबून असतील हेच जणू भारतावर ठसवले आहे. शी जिनपिंग यांची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या ‘वन बेल्ट, वन रोड’ किंवा ‘ओबोर’ महायोजनेवर भारताने टाकलेल्या बहिष्काराने दुखावलेल्या जिनपिंग यांनी दोकलाम घटनेचे निमित्त करून भारताविरुद्ध दंड थोपटल्याचे त्यावरून दिसते. दोन्ही देशांदरम्यान मैत्रीचे जे देखावे एवढा काळ चालले होते, त्याचे रंग एव्हाना पुरते उडून गेले आहेत. अणुपुरवठादार देशांच्या गटातील भारताच्या प्रवेशाला विरोध, संयुक्त राष्ट्रांकडून मसूद अजहरला दहशतवादी घोषित करण्यास विरोध, काश्मीर प्रश्नात नाक खुपसण्याचा प्रयत्न, दलाई लामांच्या अरुणाचल प्रदेश भेटीला विरोध, लडाखमधील घुसखोरी, अशा एकेक प्रकारे भारताविरुद्ध उभे राहात आलेल्या चीनने दोकलाममध्ये पुन्हा एकदा भारताची कळ काढली. विवादित भूमीत रस्ता उभारण्याचा त्यांनी प्रयत्न चालवला. त्याला भारतीय सैनिकांनी आक्षेप घेतल्यानंतर त्यावर एवढे अकांडतांडव चीन सरकार आणि तेथील सरकारी माध्यमांनी चालवले आहे की पाहात राहावे! ग्लोबल टाइम्स हे तेथील वृत्तपत्र सत्ताधारी चिनी कम्युनिस्ट पक्षाचे मुखपत्र. त्यात काल सिक्कीमच्या ‘स्वातंत्र्या’चा विषय उकरून काढला आणि सिक्कीमचे भारतात सामिलीकरण झाले तसे भूतानचेही करण्याचा भारताचा प्रयत्न राहील असा भयगंड निर्माण करण्याचाही प्रयत्न केला. चीनमधील भारतविरोधी अपप्रचार कोणत्या थराला गेलेला आहे याचा हा नवा दाखला आहे. चीनचे विदेश मंत्रालय दोकलाम विवाद निर्माण झाल्यापासून दररोज पत्रके काढून भारताविरुद्ध एकेक टीकास्त्र सोडत राहिले आहे. या विवादामुळे ‘‘द्विपक्षीय संबंधांचा राजकीय पाया’’ कमकुवत झाल्याचा पवित्रा आता चीनने घेतला असल्याने आणि तेच कारण देत मोदी – जिनपिंग भेट नाकारली असल्याने चीनला हा विवाद चिघळवायचा आहे आणि भारताकडून तो देश सपशेल माघारीचीच अपेक्षा ठेवत आहे हे स्पष्ट होते. एका अर्थाने ही धमकीच आहे. द्विपक्षीय मैत्रिसंबंध वगैरे नंतर, आधी आम्ही एक महासत्ता आहोत आणि तुमची आमची बरोबरी होऊ शकत नाही असा दम या कृतीतून देण्यात आला आहे. ज्या प्रकारे ‘ओबोर’ महाप्रकल्पाचा घाट चीनने घातला आहे ते पाहता आणि त्याचा एकूण विस्तारवाद पाहता चीनच्या महत्त्वाकांक्षांना नाना पंख फुटलेले आहेत. अशा वेळी भारतालाही न जुमानण्यामागे हीच मस्तवाल वृत्ती आहे. चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचे अधिवेशन यंदा ऑक्टोबरमध्ये आहे. जिनपिंग यांच्यावर त्यात पुन्हा मोहोर उठणार आहे. आपण एक सर्वशक्तिमान नेते आहोत आणि असे असूनही भारताने आपल्याला ‘ओबोर’वर बहिष्कार टाकून अपमानित केले आहे हे शिनपिंग सहजासहजी विसरू इच्छित नसावेत. त्यामुळे दोकलामच्या विवादाला टोकापर्यंत ताणण्याचे धोरण चीनने अवलंबिलेले आहे. या ताणलेल्या संबंधांची इतिश्री कशी होणार हे आता पाहावे लागेल. चीन आणि भारत यांच्यातील संबंधांना संघर्षाची येऊ लागलेली धार हितावह नक्कीच नाही.