सत्संगावेळी चेंगराचेंगरी; 116 जणांचा मृत्य

0
17

>> उत्तरप्रदेशच्या हाथरसमधील घटना; मृतांमध्ये महिलांची संख्या अधिक; दीडशेहून अधिक जखमी; अनेकांची प्रकृती चिंताजनक

उत्तरप्रदेशच्या हाथरस जिल्ह्यात आयोजित एका सत्संगादरम्यान काल चेंगराचेंगरीची घटना घडली. त्यामध्ये 116 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये महिलांची संख्या अधिक असून, या घटनेत तीन लहान मुलांनाही आपला प्राण गमवावा लागला. या घटनेत 150 हून अधिक जखमी झाले असून, अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी सत्संग आयोजकांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
सविस्तर माहितीनुसार, उत्तर प्रदेशाच्या हाथरस येथील फुलरई गावात ही चेंगराचेंगरीची घटना घडली. या गावात काल नारायण साकार हरी भोले बाबा यांचा संत्सग आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला जवळपास हजारो नागरिक उपस्थित होते. त्यामध्ये प्रामुख्याने महिलांचा समावेश होता. या कार्यक्रमाला स्थानिक प्रशासनाने परवानगीदेखील दिली होती.

भोले बाबांचे प्रवचन ऐकण्यासाठी हाथरस एटा सीमेजवळील रतिभानपूर येथे मोठ्या संख्येने लोक जमले होते. या सत्संगासाठी हजारो लोक उपस्थित होते. हे लोक मथुरा, आग्रा, फिरोजाबाद, एटा येथील असल्याची माहिती समोर येत आहे.

ही चेंगराचेंगरी नेमकी कशी घडली, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. मात्र काही प्रत्यक्षदर्शींनी त्याची वेगवेगळी कारणे सांगितली आहेत. त्यानुसार, भोले बाबाचे सत्संग झाल्यानंतर आरती झाली आणि माघारी येताना रस्त्यावर चिखल होता. त्या चिखलात पाय घसरून काही महिला मुलांसह पडल्या आणि गोंधळ सुरू झाला. त्यानंतर लोक एकमेकांच्या अंगावर पडले आणि मागून येणाऱ्या मोठा जमाव खाली पडलेल्या लोकांच्या अंगावरून चालत पुढे जाऊ लागला, त्यात अनेकांना आपले प्राण गमवावे लागल्याचे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले. अन्य काही प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, सत्संग मंडपातील गर्मीमुळे लोक बाहेर पडण्याच्या प्रयत्नात असताना चेंगराचेंगरी झाली आणि ही घटना घडली, असे समोर आले आहे.

घटनास्थळी अनेकांचे मृतदेह विखुरलेले होते. अपघातानंतर कसेबसे जखमी आणि मृतांना बस आणि टेम्पोमध्ये भरून रुग्णालयात नेण्यात आले. या घटनेत जखमी झालेल्यांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
ही घटना नेमकी कशी घडली, याची चौकशी करण्यासाठी उत्तरप्रदेश सरकारने एका विशेष समितीची स्थापना केली आहे. चौकशीअंतीच या घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

कोण आहेत भोले बाबा?
भोले बाबा यांचे खरे नाव नारायण हरी असे आहे. ते एटा येथील रहिवासी आहेत. सुमारे 25 वर्षांपासून ते सत्संग करत आहेत. पश्चिम उत्तर प्रदेश व्यतिरिक्त राजस्थान आणि हरियाणामध्येही त्यांचे अनुयायी आहेत.

मृतांच्या नातेवाईकांना मदत जाहीर
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. पंतप्रधान मोदींनी देखील सहाय्यता निधीतून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपये, तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

पंतप्रधान, राष्ट्रपतींकडून शोक व्यक्त
या घटनेवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, माजी मुख्यमंत्री मायावती, काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव आदींनी शोक व्यक्त केला आहे.