सत्तेवर आल्यास वीज, पाणी दरात कपात

0
85

>> कॉंग्रेसचे आश्‍वासन; सरकारवर आरोपपत्र सादर

 

राज्यात कॉंग्रेसचे सरकार सत्तेवर आले तर वीज व पाण्याचे दर खाली आणले जातील, असे प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष लुईझिन फालेरो यांनी काल कॉंग्रेसने भाजप सरकारवरील आरोपपत्राचे प्रकाश करण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना सांगितले. ‘विश्‍वासघात व भ्रष्टाचार’ एक कहाणी (परिवर्तन ते यू टर्न) असे नाव दिलेल्या या आरोपपत्र पुस्तिकेचे यावेळी प्रकाशन करण्यात आले. फालेरो म्हणाले, की राज्यातील भाजप सरकारने वीज व पाणी बिलात प्रचंड वाढ केलेली असून सामान्य लोकांसाठी ते डोकेदुखी ठरलेली आहे. येत्या निवडणुकीत जर कॉंग्रेस सरकार सत्तेवर आले तर वीज व पाणी दर खाली आणले जातील असे आश्‍वासन त्यांनी दिले. गेल्या पाच वर्षांच्या काळात भाजप सरकारने जनतेचा विश्वासघात केला. निवडणुकीपूर्वी भाजपने ‘घर घर चलो अभियान’ करून परिवर्तन करण्याची भाषा केली होती. पण परिवर्तन करण्याचे सोडून सरकारने यू टर्न घेतल्याची टीका फालेरो यांनी केली.
विरोधी पक्ष नेते प्रतापसिंह राणे म्हणाले की, २०१२ साली झालेल्या निवडणुकीपूर्वी भाजपने राज्यातील जनतेला मोठमोठी स्वप्ने दाखवली होती. राज्यातील युवा वर्गाला सरकारने ५० हजार नोकर्‍यांची निर्मिती होणार असल्याचे सांगितले होते. प्रत्यक्षात मात्र युवा वर्गावर बेरोजगार होण्याची पाळी आली असल्याचे त्यांनी नमूद केले. राज्यात उद्योग आणण्यास, जातीय सलोखा सांभाळण्यासाठी सरकारला अपयशच आल्याचा आरोप यावेळी राणे यांनी केला. माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी माध्यम प्रश्‍न, प्रादेशिक आराखडा, कॅसिनो अशा सर्वच बाबतीत भाजप सरकारने लोकांची फसवणूक केल्याचा आरोप केला. रमाकांत खलप, फ्रान्सिस सार्दिन, डॉ. प्रमोद साळगांवकर यांचीही यावेळी भाषणे झाली.
काल प्रकाशित केलेल्या सरकारवरील आरोपपत्राच्या पुस्तिकेतून कॉंग्रेसने भाजपवर विशेष राज्याचा दर्जा, भ्रष्टाचार, माध्यम प्रश्‍न, महागाई, कॅसिनो, प्रादेशिक आराखडा, रोजगार, स्वच्छ प्रशासन, अमली पदार्थ आदीबाबत सरकारने जनतेची कशी फसवणूक केली त्याचा आढावा घेतला आहे. तसेच सरकारवर खनिज व्यवसाय बंद पाडल्याचा, सरकार माडासाठी कर्दनकाळ ठरल्याचा, असहिष्णुता वाढल्याचा, कुळ-मुंडकार विरोधी अशी दुरुस्ती कायद्यात केल्याचा जनतेच्या हक्कांवर गदा आणल्याचे आरोप केले आहेत.