केपे-सांगेत खाण वाहतुकीसाठी पुढील ऑक्टोबरपर्यंत बगलमार्ग

0
92

केपें ते सांगे या खाणपट्ट्यात खनिज वाहतुकीसाठीचा बगल मार्ग पुढील वर्षी ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले असल्याचे गोवा साधन सुविधा विकास महामंडळातील सूत्रांनी काल या प्रतिनिधीशी बोलताना स्पष्ट केले. तीन टप्प्यांत हे काम हाती घेण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात उगें ते गुड्डामळ या दरम्यान हा बगलमार्ग बांधण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

उगें ते गुड्डामळ या दरम्यानच्या बगलमार्गासाठी २०१२ साली निविधा काढण्यात आली होती. ६७ कोटी ७५ लाख रु. एवढ्या निधीची ही निविदा होती. मात्र, त्यावेळी वन खात्याने हरकत घेतल्याने हे काम अडले. आता नव्याने हे काम हाती घेण्यात येणार असून सर्व तिन्ही टप्प्यांसाठीच्या कामाची रचना तयार करण्यात आली आहे. या कामासाठी वन खात्याकडून परवानगी घेण्यासाठीची प्रक्रियाही सुरू झाली आहे.
पहिल्या टप्प्यातील उगें ते गुड्डेमळ या बगलमार्गाचे काम ऑक्टोबर २०१७ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. दुसर्‍या टप्प्यात गुड्डेमळ ते कापशें या खनिज बगल मार्गाचे काम हाती घेण्यात येणार आहे. तर तिसर्‍या टप्प्यात कावरें, मायणा व रिवणा येथील खाणींना या खनिजवाहू बगलमार्गाला जोडण्याचा प्रस्ताव असल्याचे सूत्रांनी सांगितले. यासाठीचा निधी खाण कंपन्यांकडून मिळावा यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले.